वीरगळांचे कोडे
वीरगळांचे कोडे . २९ जानेवारी, भारतीय कोडे दिन! शब्दांच्या खेळातून विचारांना दिशा देणारा, आणि प्रश्न विचारण्याची कला साजरी करणारा हा दिवस. शाळांमध्ये मुलं कोडी सोडवतात, हसतात, विचार करतात, आणि नकळत एक मोठं शिक्षण घेतात. ‘प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधणं म्हणजेच जगण्याची कला शिकणं.’ आपल्या संस्कृतीत कोड्यांचा उगम खूप जुना आहे. संत ज्ञानेश्वरांनी, तुकारामांनी, अगदी लोककवितांमधील स्त्रियांनीही कोड्यांच्या माध्यमातून गूढ विचार मांडले. कोड्याचं सौंदर्य हे असतं की ते उलगडलं की आनंद मिळतो, आणि न उलगडलं तरी विचार मिळतो. पण आज मी एका वेगळ्या कोड्याबद्दल बोलू इच्छितो, दगडात कोरलेल्या कोड्याबद्दल. नवी मुंबईलगतच्या परिसरात तळोजा, उरण, पिरकोन, दिघोडे, पुनाडे आणि आवरे या गावांमध्ये काही शांत, उभट शिळा दिसतात. गावाच्या वेशीजवळ, एखाद्या मंदिराच्या कोपऱ्यात किंवा झाडांच्या सावलीत त्या उभ्या असतात. कोणाचं लक्ष नसलेली ही शिळा म्हणजेच वीरगळ. दगडावर कोरलेले योद्ध्यांचे आकृतीबंध, धनुष्य, तलवारी, घोडे आणि आकाशात कोरलेला सूर्य–चंद्र यांच...