डावखुरे असण्यात डावं काहीच नाही!
“अरे थांब! डाव्या हाताने का लिहितोस? उजव्या हाताने लिही!” हे वाक्य आपल्या बालपणीच्या आठवणींमध्ये कुठेतरी नक्कीच सापडेल. मुलाने डाव्या हाताने पेन्सिल पकडली की लगेच हात बदलण्याचा प्रयत्न, डाव्या हाताने जेवायला घेतले की सूचना, डाव्या हाताने एखादी वस्तू दिली की त्यावरही संस्कार! डावा हात जणू काही घरातला नकोसा पाहुणाच. गंमत म्हणजे त्या मुलाला त्याचा डावा हात चुकीचा आहे हे माहीतही नसते. तो फक्त त्याला नैसर्गिक वाटणारा हात वापरत असतो. म्हणूनच १३ ऑगस्ट हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय डावखुरा दिन म्हणून साजरा केला जातो. जगातील साधारण दहा टक्के लोक डावखुरे आहेत. म्हणजे शंभर माणसांच्या गर्दीत जवळपास दहा जणांचा हात आपल्यापेक्षा वेगळा असू शकतो. मात्र जगातील बहुतांश वस्तू आणि व्यवस्था उजव्या हाताचा विचार करून तयार झाल्यामुळे डावखुऱ्यांना रोजच्या आयुष्यात अनेक छोट्या मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. कात्री, लेखनाची पद्धत, डेस्कची रचना, काही उपकरणांची बटणे अशा साध्या गोष्टीही त्यांच्यासाठी कधी कधी गैरसोयीच्या ठरतात. म्हणजे जगाने बहुसंख्य लोकांसाठी सोय केली आणि उरलेल्या लोकांना त्यात ...