वसुबारस आणि धेनूगळ
वसुबारस आणि धेनूगळ सणवार आले की आपल्या संस्कृतीतील काही जुन्या परंपरा पुन्हा नव्याने उजळून निघतात. वसुबारस हा त्यातलाच एक सण. दिवाळीच्या आगमनाची चाहूल देणाऱ्या या दिवशी घराघरांत गाय आणि वासराची पूजा केली जाते. त्यांच्या पायांवर पाणी घातले जाते, हळदकुंकू लावले जाते आणि औक्षण करून कृतज्ञता व्यक्त केली जाते. भारतीय ग्रामीण जीवनात गायीचे स्थान किती महत्त्वाचे होते, हे सांगण्यासाठी फार मोठ्या व्याख्यानाची गरज नाही. शेतीसाठी बैल, दूधदुभत्यासाठी गाय, शेणखतासाठी गोवंश आणि त्यातून उभे राहणारे अर्थकारण, अशा अनेक धाग्यांनी गावगाड्याचे चक्र फिरत असे. पण आपल्या पूर्वजांनी या गोवंशाचे महत्त्व केवळ सण आणि श्रद्धेपुरते मर्यादित ठेवले नव्हते. ते त्यांनी चक्क दगडात कोरून ठेवले होते. याच परंपरेची साक्ष देणारी शिल्पे म्हणजे धेनूगळ! नवी मुंबई लगतच्या उरण तालुक्यातील रानसई धरणाकडे जाणाऱ्या रस्त्यावर अशीच एक धेनूगळ आजही मूळ जागी उभी आहे. रस्त्याच्या कडेला निसर्गाच्या सान्निध्यात असलेल्या या दगडाकडे सहज नजर टाकली तर गाय आणि वासराचे शिल्प दिसते. वरच्या भागात सूर्य आणि चंद्र कोरलेले आहेत, तर खालच्या भाग...