डावखुरे असण्यात डावं काहीच नाही!

“अरे थांब! डाव्या हाताने का लिहितोस? उजव्या हाताने लिही!” 

   हे वाक्य आपल्या बालपणीच्या आठवणींमध्ये कुठेतरी नक्कीच सापडेल. मुलाने डाव्या हाताने पेन्सिल पकडली की लगेच हात बदलण्याचा प्रयत्न, डाव्या हाताने जेवायला घेतले की सूचना, डाव्या हाताने एखादी वस्तू दिली की त्यावरही संस्कार! डावा हात जणू काही घरातला नकोसा पाहुणाच. गंमत म्हणजे त्या मुलाला त्याचा डावा हात चुकीचा आहे हे माहीतही नसते. तो फक्त त्याला नैसर्गिक वाटणारा हात वापरत असतो. म्हणूनच १३ ऑगस्ट हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय डावखुरा दिन म्हणून साजरा केला जातो. जगातील साधारण दहा टक्के लोक डावखुरे आहेत. म्हणजे शंभर माणसांच्या गर्दीत जवळपास दहा जणांचा हात आपल्यापेक्षा वेगळा असू शकतो. मात्र जगातील बहुतांश वस्तू आणि व्यवस्था उजव्या हाताचा विचार करून तयार झाल्यामुळे डावखुऱ्यांना रोजच्या आयुष्यात अनेक छोट्या मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. कात्री, लेखनाची पद्धत, डेस्कची रचना, काही उपकरणांची बटणे अशा साध्या गोष्टीही त्यांच्यासाठी कधी कधी गैरसोयीच्या ठरतात. म्हणजे जगाने बहुसंख्य लोकांसाठी सोय केली आणि उरलेल्या लोकांना त्यात जुळवून घ्यायला सांगितले!

    पण माणूस डावखुरा होतो तरी का?

 याचे उत्तर अजूनही पूर्णपणे सापडलेले नाही. डावखुरेपणामागे एकच कारण नसून आनुवंशिकता, गर्भावस्थेतील विकास, मेंदूची रचना आणि इतर जैविक घटक यांचा गुंतागुंतीचा सहभाग असतो. “आई डावखुरी म्हणून मूल डावखुरे” किंवा “वडील उजव्या हाताचे म्हणून मूल उजव्या हाताचे” असे सरळ गणित निसर्गाला मान्य नाही. डावखुरेपणासाठी एकच ठरावीक जनुक जबाबदार आहे असेही म्हणता येत नाही. आणि इथेच आणखी एक लोकप्रिय गैरसमज समोर येतो. “डावखुऱ्यांचा उजवा मेंदू जास्त चालतो, म्हणून ते अधिक कलात्मक आणि सर्जनशील असतात” किंवा “उजव्या हाताचा म्हणजे डावा मेंदू जास्त कार्यक्षम” अशी मांडणी ऐकायला आकर्षक असली तरी ती वैज्ञानिकदृष्ट्या अतिसुलभ आहे. आपल्या मेंदूचे दोन्ही अर्धगोल अनेक कामांमध्ये एकमेकांशी सतत संवाद साधत असतात. हाताच्या प्राधान्याचा मेंदूतील काही कार्यांच्या बाजूकेंद्रीकरणाशी संबंध आहे, पण डावखुरा म्हणजे उजवा मेंदू अधिक शक्तिशाली असे सरळ समीकरण नाही.

      डावखुरेपणाभोवती आणखी काही मजेदार समजुती आहेत. डावखुरे लोक अधिक बुद्धिमान असतात, अधिक सर्जनशील असतात, कला आणि संगीतामध्ये त्यांची कामगिरी चांगली असते, ते प्रत्येक क्षेत्रात सर्वोत्तम असतात, असे अनेकदा सांगितले जाते. काही प्रसिद्ध डावखुऱ्या व्यक्तींची उदाहरणे देऊन या समजुतीला आणखी बळ मिळते. पण विज्ञानाला एखाद्या यादीपेक्षा मोठा पुरावा हवा असतो. मोठ्या प्रमाणातील संशोधनातून डावखुरेपणा आणि बुद्धिमत्ता यांच्यात ठोस सार्वत्रिक संबंध सिद्ध झालेला नाही. सर्जनशीलतेबाबतही डावखुरे लोक आपोआप अधिक सर्जनशील असतात असे म्हणता येत नाही. मात्र खेळाच्या मैदानावर डावखुऱ्यांना काही परिस्थितीत रणनीतिक फायदा मिळू शकतो. क्रिकेटच्या मैदानावर हे आपल्याला अनेकदा दिसले आहे. वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लारा, भारतातील सौरव गांगुली, युवराज सिंग हे तिघेही डावखुरे फलंदाज. त्यांच्या फलंदाजीने डावखुऱ्या खेळाडूंकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला. डावखुरा असल्यामुळे यश मिळते असे नाही, पण डावखुरेपणामुळे खेळातील काही कोन, गोलंदाजीविरुद्धची जुळवाजुळव आणि प्रतिस्पर्ध्याची रणनीती नक्कीच वेगळी होऊ शकते. त्यामुळेच डावखुरा फलंदाज अनेकदा गोलंदाजासाठी वेगळे कोडे ठरतो. पण डावखुरा जन्माला आला म्हणजे ट्रॉफी घरपोच येते असे मात्र नाही. सराव तिथेही करावाच लागतो!

        खरा प्रश्न मात्र डाव्या हाताचा नाही, आपल्या सवयींचा आहे. एखादे मूल डाव्या हाताने लिहित असेल तर “उजव्या हाताने लिही” असे सांगण्याऐवजी “तुला कोणता हात सोयीचा वाटतो?” असे विचारणे अधिक योग्य. विशेषतः शाळेत शिक्षकांनी डावखुऱ्या विद्यार्थ्याला त्याच्या नैसर्गिक हाताने लिहू द्यावे आणि बसण्याची जागा, वहीची ठेवण, डेस्कची रचना किंवा लेखनाची पद्धत यामध्ये आवश्यक ते छोटे बदल करावेत. मुलाच्या हाताला जबरदस्तीने बदलण्यापेक्षा त्याच्या शिकण्याला मदत करणे महत्त्वाचे आहे. कारण सतत “तुझा हात चुकीचा आहे” असे सांगितले तर प्रश्न हातापुरता राहत नाही; मुलाच्या मनात “मी जसा आहे तसा बरोबर नाही” अशी भावना निर्माण होऊ शकते. डाव्या हाताने जेवणे किंवा लिहिणे अशुभ आहे, अशा सांस्कृतिक समजुती असू शकतात; पण डावखुरेपणा हा वैज्ञानिकदृष्ट्या दोष किंवा अपशकुन नाही. त्याच्या हातात काही अशुभ नसते, त्याच्या हातात फक्त पेन्सिल असते. आणि त्या पेन्सिलने तो कदाचित उद्या एखादे सुंदर चित्र काढेल, कविता लिहील, गणित सोडवेल किंवा जग बदलणारी एखादी कल्पना कागदावर उतरवेल.

         निसर्गाला सगळे माणसे एकसारखी बनवता आली असती, पण त्याने तसे केले नाही. कुणी उंच, कुणी ठेंगणे, कुणाला गणित पटकन समजते, कुणाला कविता; कुणाला उजवा हात सोयीचा वाटतो, कुणाला डावा. ही विविधता निसर्गाची चूक नाही, तीच निसर्गाची गंमत आहे. म्हणून १३ ऑगस्टला डावखुऱ्या व्यक्तींचा दिवस साजरा करताना केवळ “लेफ्टी लोक किती भारी!” एवढे म्हणण्यापेक्षा आपल्या दृष्टीत थोडासा बदल करायला हवा. क्रिकेटच्या मैदानावर लाराची शान, युवराजचा फटकारा आणि गांगुलीची ऑफसाइडवरील दादागिरी पाहताना आपण त्यांच्या डाव्या हाताकडे केवळ एक वेगळेपणा म्हणून पाहत नाही; आपण त्यांच्या कौशल्याला दाद देतो. मग आपल्या वर्गातील एखाद्या डावखुऱ्या मुलाकडे पाहताना वेगळा चष्मा का? त्याचा हात पकडून बदलण्याऐवजी त्याची वही थोडी वेगळी ठेवूया, त्याला सोयीचे साधन देऊया आणि त्याच्या नैसर्गिक पद्धतीला स्वीकारूया. कारण मुलाच्या हाताची दिशा बदलण्यापेक्षा त्याच्या कल्पनांना दिशा देणे अधिक महत्त्वाचे आहे. शेवटी हात डावा असो किंवा उजवा, काम चांगले असणे महत्त्वाचे. हात कोणता आहे यापेक्षा त्यातून आपण काय निर्माण करतो हे महत्त्वाचे. आणि म्हणूनच, डावखुरे असण्यात डावं काहीच नाही! डाव्या हाताने पुढे केलेला मदतीचा हातही उजव्या हाताइतकाच माणुसकीचा असतो.

 - तुषार म्हात्रे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पाचवीला पुजलेली सटी

चुलीवरचे जेवण!

शिलाखंडांचे ताम्रपट