वीरगळांचे कोडे

 वीरगळांचे कोडे

.            २९ जानेवारी, भारतीय कोडे दिन!
शब्दांच्या खेळातून विचारांना दिशा देणारा, आणि प्रश्न विचारण्याची कला साजरी करणारा हा दिवस. शाळांमध्ये मुलं कोडी सोडवतात, हसतात, विचार करतात, आणि नकळत एक मोठं शिक्षण घेतात. ‘प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधणं म्हणजेच जगण्याची कला शिकणं.’ आपल्या संस्कृतीत कोड्यांचा उगम खूप जुना आहे. संत ज्ञानेश्वरांनी, तुकारामांनी, अगदी लोककवितांमधील स्त्रियांनीही कोड्यांच्या माध्यमातून गूढ विचार मांडले. कोड्याचं सौंदर्य हे असतं की ते उलगडलं की आनंद मिळतो, आणि न उलगडलं तरी विचार मिळतो.
     पण आज मी एका वेगळ्या कोड्याबद्दल बोलू इच्छितो, दगडात कोरलेल्या कोड्याबद्दल.
नवी मुंबईलगतच्या परिसरात तळोजा, उरण, पिरकोन, दिघोडे, पुनाडे आणि आवरे या गावांमध्ये काही शांत, उभट शिळा दिसतात. गावाच्या वेशीजवळ, एखाद्या मंदिराच्या कोपऱ्यात किंवा झाडांच्या सावलीत त्या उभ्या असतात. कोणाचं लक्ष नसलेली ही शिळा म्हणजेच वीरगळ.

दगडावर कोरलेले योद्ध्यांचे आकृतीबंध, धनुष्य, तलवारी, घोडे आणि आकाशात कोरलेला सूर्य–चंद्र यांच्यात एक कथा दडलेली असते. पण त्या कथेला शब्द नसतात. म्हणूनच, प्रत्येक वीरगळ म्हणजे एक न उलगडलेलं कोडं. ‘वीर’ (संस्कृत) आणि ‘कल्लू’ (कन्नड) या दोन शब्दांपासून ‘वीरगळ’ हा शब्द तयार झाला. कल्लू म्हणजे दगड. म्हणजेच वीराचा दगड. पूर्वी जेव्हा एखाद्या गावावर शत्रूचा हल्ला होत असे, तेव्हा गावाचा तरुण एखादा वीर आपल्या जीवावर खेळून लढत असे. गाई–गुरांचं, स्त्रियांचं आणि गावाचं रक्षण करताना तो वीर धारातीर्थी पडला, तर त्याच्या स्मरणार्थ अशी शिळा उभारली जात असे. उभट, आयताकृती दगड, चारही बाजूंना चौकट कोरलेल्या, वर घुमटी आणि घुमटीवर सूर्य–चंद्र कोरलेले, अशी या शिळांची ओळख.
पिरकोन गावात अशा काही वीरगळ आजही आहेत. काहींवर घोड्यावर बसलेला योद्धा दिसतो, तर काहींवर तलवारी उगारलेल्या युद्धदृश्यांची मांडणी आहे. दिघोडे आणि आवरे गावांमध्येही अशा शिळा जुन्या मंदिरांच्या भिंतीलगत दिसतात. पुनाडे गावाच्या बहिरी देवाच्याजवळ उभी असलेली एक वीरगळ विशेष आकर्षक आहे, नौकयुद्धाचे अंकन असलेली. त्यावर तीन स्तरांत युद्धाचे, प्राणार्पणाचे आणि स्वर्गारोहणाचे प्रसंग कोरलेले आहेत. या सर्व शिळा शिलाहार आणि यादव काळातील असल्याचा संशोधकांचा अंदाज आहे.

    या दगडांच्या नक्षींकडे पाहताना मनात प्रश्न उभे राहतात
कोण होता हा वीर?
कोणत्या शत्रूशी लढला?
त्याचं नाव का कोरलं नाही?
हीच तर त्या वीरगळांची सुंदर गूढता आहे. इतिहासाच्या ओघात नावं हरवली, पण शौर्य शिळेत कायम राहिलं. शब्दांच्या कोड्यांप्रमाणेच इतिहासालाही कोडं आहे, जे संशोधन, संवेदनशीलता आणि कल्पकतेने उलगडावं लागतं. आज विज्ञान, संगणक, कृत्रिम बुद्धिमत्ता यांचा काळ आहे. पण विचार करायला शिकवणारी कोडी आणि विचार करायला लावणाऱ्या या वीरगळ, दोन्ही आपल्या संस्कृतीचे दोन टोक आहेत. एक बुद्धीला चालना देतं, दुसरं भावनांना गहिवर देतं.
जेव्हा आपण मुलांना शब्दकोडी सोडवायला शिकवतो, तेव्हा त्याचबरोबर आपल्या मातीतील या दगडी कोड्यांचाही अर्थ सांगायला हवा. कारण त्यात विचारही आहे आणि इतिहासही.
भारतीय कोडे दिनाच्या निमित्ताने या वीरगळांकडे नव्या दृष्टीने पाहावं असं वाटतं. ते फक्त दगड नाहीत, तर आपल्या मातीतील प्रश्न आहेत. त्यांचं उत्तर शोधणं म्हणजे आपल्या इतिहासाशी संवाद साधणं.
कधी तरी या वाटेवर चालताना एखादी जुनी शिळा दिसेल. थांबा, तिच्याकडे नीट बघा. ती तुम्हाला काही विचारेल. कदाचित तीच असेल भारताच्या सर्वात सुंदर कोड्यांपैकी एक.

- तुषार म्हात्रे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पाचवीला पुजलेली सटी

चुलीवरचे जेवण!

शोले आणि ‘सांभा’ दगड