Search This Blog

Monday, January 11, 2021

अतरंगी डावला

    विशाल...अथांग...गहन...गूढ... यांसारख्या अनेक विशेषणांसाठी डोळ्यांसमोर येणारा एक समर्पक शब्द म्हणजे ‘समुद्र’. त्याच्या किनाऱ्यावर पसरलेल्या रुपेरी वाळूत बसून त्याचे विशाल रुप न्याहाळताना सागराच्या न दिसणाऱ्या तळाशी काय दडलंय, याचे कुतूहल सर्वांनाच वाटत असते. हा नजरेआडचा विचार करता करता, आपल्या नजरेसमोरही अशाच काही गोष्टी समुद्र उपलब्ध करून देत असतो हे मात्र आपण विसरतो. सागरकिनाऱ्यावर सहज आढळून येणारी आणि तितक्याच सहजपणे दुर्लक्षिली जाणारी जीवसृष्टी पसरलेली असते. सागराचे अंतरंग शोधणारी नजर इकडे वळवली तर इथेही सजीवसृष्टीचे अनोखे रंग पहायला मिळतील.

      


मुंबई-कोकणच्या समुद्रकिनाऱ्यांवर, खाडीलगतच्या दलदलयुक्त प्रदेशात एक ‘अतरंगी’ वनस्पती आढळते.  गुळगुळीत, मांसल आणि चमकदार लहान पानांची, जांभळ्या- गुलाबी फुलांची किनारी भागात विखुरलेली ही वनस्पती आपल्याला एखाद्या सामान्य तणाप्रमाणेच भासेल. तिच्या आडव्या पसरलेल्या रोपांची लांबी जेमतेम फुटभर भरते. बाहेरून फार लक्षवेधी नसणाऱ्या या वनस्पतीच्या अंगभूत वेगळ्या गुणधर्मामुळे तीला अतरंगीच म्हणावे लागेल.  बंगाली भाषेत ‘जादू पलंग’ असा उल्लेख असणारी ही वनस्पती म्हणजे ‘डावला’. काही भागांत तिला ‘घात’ असेही म्हटले जाते. या वनस्पतीला इंग्रजीमध्ये ‘सी पर्सलेन (Sea  Purslane)’ असे नाव आहे.  या आकाराने लहान वनस्पतीचे शास्त्रीय नाव मात्र ‘सेसुवियम पोर्तुलाकास्ट्रम (Sesuvium portulacastrum)’ असे तिच्या विस्तारासारखेच मोठे आहे. खुद्द कार्ल लिनियसने वर्गीकरण केलेल्या या वनस्पतीच्या नावातील सेसुवियम हा शब्द ‘सेसुवी’ या गॅलिक जमातीपासून घेतला आहे, तर पोर्तुलाका म्हणजेच पर्सलेन.  ‘घोळ’ प्रजातीशी साम्य असणारी ही वनस्पती.
(इथे ‘घोळ’ या पालेभाजीबाबत उल्लेख केलाय, पुन्हा ‘घोळ’ नावाच्या माशाशी संबंध जोडण्याचा घोळ करू नका.)
“तुझा नी माझा गडे, एकच वंश आहे,
माझिया अंगात थोडा खारेपणाचा अंश आहे!”
असे म्हणत डावला आपला वेगळेपणा जपते.

डावल्याच्या पानांची आणि देठांची भाजी करता येते. कच्च्या स्वरूपात ही वनस्पती खारट आणि कडवट चवीची असते. शिजवण्यापूर्वी चांगले रगडून अथवा शिजवताना एक दोन वेळा पाणी बदलून  हा कडवटपणा कमी करता येतो. स्वतंत्र भाजी करण्याबरोबरच इतर अन्नपदार्थांमध्येही त्याचा वापर होतो. अमेरिका, फिलापाईन्स यांसारख्या काही देशांत डावल्याच्या देठांचे लोणचे बनवले जाते. तसेच काही प्रदेशांत मुरांब्यासारखे पारंपरिक गोड लोणचे तयार होते. भारताच्या किनारी भागांत बारमाही आढळणारा डावला कधीकाळी इथल्या  लोकांच्या नेहमीच्या अन्नातील भाग होता. परंतु जबरीच्या विकासाने नैसर्गिक अधिवासांचा ऱ्हास केला आणि स्थानिकांच्या तोंडातला हा नेहमीचा घासही गेला.
       या वनस्पतीला ‘अतरंगी’ म्हणण्याचे कारण तिच्या  अंतरंगातील रसायनांमध्ये दडले आहे. डावला हा एक्डीस्टेरॉन (Ecdysterone) या स्टेरॉईडसचा समृद्ध स्रोत आहे. शास्त्रीय पद्धतीने या वनस्पतीपासून हे स्टेरॉईड मिळविले जाते. कात टाकणाऱ्या प्राण्यांना उपयुक्त असणारे हे रसायन मनुष्याच्या स्नायूंचेही मजबूतीकरण करते. त्यामुळे अॅथलेटिक्समधील खेळाडूंसाठी ते पोषक ठरू शकते. डावल्यामध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल अशी जंतुरोधक तत्वे आढळतात. भारतासह हैती, झिंबाब्वे, दक्षिण आफ्रिका या देशांत मूत्रविकार, तापासाठी या वनस्पतीपासून तयार केलेली औषधे वापरतात. स्कर्व्ही रोगावरील उपचाराचा एक भाग म्हणून डावला उपयुक्त ठरतो.
      किनारी भागातील शेतीमध्ये समुद्राचे खारे पाणी घुसून जमिन नापिक होण्याचे प्रकार सातत्याने घडत असतात. समुद्रकिनाऱ्यावरील या वनस्पतीच्या वैशिष्ट्यांमुळे हे नुकसान टाळण्यास मदत होते.वाऱ्यामुळे किनाऱ्यावरील वाळूचे कण  उडून जात असताना तिथे सर्वत्र पसरलेल्या  वनस्पतीमध्ये अडकून पडतात. कालांतराने तिथे वाळूचा लहानसा ढीग तयार होतो. तयार झालेला हा लहान टेकडीवजा भाग इतर वनस्पतींच्या वाढीसाठी पोषक ठरतो. या सर्व कारणांमुळे समुद्राच्या पाण्याला जमिनीवर येताना नैसर्गिकरित्या अटकाव होतो. यातून जमिनीचे होणारे संभाव्य नुकसान टाळता येते. आंध्रप्रदेशातील शेतकरी डावल्याकडे नैसर्गिक सूचक म्हणून पाहतात. आपल्या जमिनीत उगवलेल्या डावल्याची फुले ‘गडद गुलाबी’ आढळली तर त्याचा अर्थ जमिनीची क्षारता वाढली असा होतो. या फुलांकडून मिळालेला धोक्याचा ‘पिंक सिग्नल’ ओळखून शेतकऱ्यांना पुढील उपाययोजना करता येते.
           

सर्वदूर पसरलेल्या विशाल जीवसृष्टीतील ही लहानशी वनस्पती आपले अस्तित्व टिकवत असताना इतर  जीवांनाही जगण्यास आधार देते. पण झटपट विकासाच्या मानवी प्रयत्नांत मोठी मोठी जंगले नाहीशी होतात, तिथे डावल्यासारख्या लहान वनस्पतींचा विचार कोण करणार? आपणसुद्धा या वनस्पतीप्रमाणेच निसर्गाशी हातमिळवणी करायला शिकलो तरच भविष्यात टिकलो, असे समजण्यास हरकत नाही.

- तुषार म्हात्रे

No comments:

रायगडची लोहयुगीन संस्कृती

रायगडची लोहयुगीन संस्कृती मँडागोरा! ‘पेरिप्लस ऑफ इरिथ्रीयन सी’ या अत्यंत पुरातन आणि महत्त्वपूर्ण दस्ताऐवजांमध्ये नोंदवले गेलेले एक बंद...