Search This Blog

Friday, October 12, 2018

दल-दलपरी हू मै!

दल-दल परी हू मै!
(सकाळ, मुंबई आवृत्ती 12 ऑक्टोबर 2018)

       “ना ना मुझे छूना ना दूर ही रहना, परी हूँ मैं
        मुझे ना छूना..हां परी हूँ मै!”
    सुनिता रावच्या सुंदर आवाजातलं हे गाणं आठवत असेलच. नसेल आठवत तर ‘रास-दांडीया’ आठवून पहा, तिथे या गाण्याशिवाय कोणाचेही ‘पाय’ हलत नाहीत. मुंबई सारख्या उत्सवप्रेमी शहरामध्ये एखाद्या कार्यक्रमात जेव्हा हे गाणं सुरू होतं तेव्हा त्याच्या तालावर थिरकणाऱ्यांची एक वेगळीच रंगीबेरंगी दुनिया निर्माण होते. या दुनियेत ‘बरी हू मै’ वाले सुद्धा परी असल्याच्या थाटात अभिनय करताना दिसतात. याच मुंबईपासून काही अंतरावर असलेल्या समुद्रकिनाऱ्यावर एक अशीच अनोखी दुनिया वसलेली आहे. या दुनियेत कित्येक रंगीबेरंगी जीव थिरकत असतात. फाल्गुनी पाठकच्या ‘परी हूँ मै’ या गाण्याची आठवण करून देणारी एक मासोळी इथे आहे. दिसायला ती सुद्धा ‘बरी हू मै’ अशीच असली, तरी ‘ना ना मुझे छूूना दूर ही रहना’ करत जलपरी असल्याच्या थाटातच ती वावरत असते.


         ‘पेरिओथॅल्मस’ कुटूंबातील ही परी म्हणजे ‘निवटा’ या माशाची चुलत बहीण. स्थानिक नाव ‘भाडुळकी’. मड स्किपर (Mud Skipper) म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या निवटे या प्रजातीशी पूर्णत: साधर्म्य असूनही स्वत:चे वेगळेपण जपणारी ही भाडुळकी. आपल्या भाईबंदांप्रमाणेच किनारपट्ट्यांवरील रेतीयुक्त व दलदलीच्या भागात, तिवरांच्या वनात आणि उथळ पाण्याच्या डबक्यात हे प्राणी आढळतात. या परीसरात स्वत: खणलेल्या बिळांमध्ये राहतात. या प्राण्यांची बिळेही फसवी आणि एकापेक्षा अधिक तोंडांची असतात. इंग्रजीतल्या व्ही, यू आणि जे अक्षरांसारखी रचना त्यांच्या बिळांची असते. काही बिळांचे एक तोंड जमिनीवर उघडणारे तर दुसरे पाण्यात अशी वेगळी रचनाही इथे पहायला मिळते. या बिळांमुळे त्यातील जीवांना स्वत:चे तापमान  नियंत्रित ठेवण्यास मदत होते. भाडुळकीची जीवनशैली उभयचर प्राण्यांशी मिळतीजुळती असते. त्यामुळे ‘मछली जल की रानी है’ प्रमाणे ‘बाहर निकालो तो मर जाएगी’ असं काही या जीवाच्या बाबतीत घडत नाही. याऊलट हा मासा जास्त काळ पाण्यात राहीला तर मरून जाईल अशी अवस्था.  खरंतर हवा खाण्यासाठी हा जीव बऱ्याचदा पाण्याबाहेर ये जा करत असतो. सजीवांना जगण्यासाठी आवश्यक असणारा ऑक्सिजन मिळवण्याचे विविध मार्ग या माशाला उपलब्ध होतात. पाण्यात असताना कल्ल्यांद्वारे आणि जमिनीवर त्वचा व तोंडातील स्रावाच्या साह्याने ते ऑक्सिजन मिळवतात. तोंडातील स्रावाने त्वचा ओलसर ठेवण्याच्या वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मामुळेच पाण्याबाहेरही ते कित्येक काळ तग धरू शकतात. समुद्रकिनाऱ्यावरील भरती-ओहोटी क्षेत्रात आपले अस्तित्व टिकवण्यासाठी सजीवांना अशाच वैशिष्ट्यांची गरज असते. पेरिओथॅल्मस कुळातील प्रजातींना पाण्यात पोहणे, चिखलावर सरपटणे, दगडावर चढणे, झाडावर चढणे आणि हवेत उडी मारता येणे अशी विविधांगी कामे जमतात. पण इंग्रजीतील “Jack of all, Master of None!”  म्हणींसारखं हे सगळंच थोडं थोडं जमतं. आपल्या आवडीच्या विषयात भरमसाठ गुण मिळवणारा विद्यार्थी एखाद्या विषयात नापास व्हावा आणि सर्व विषयात काठावर पास होणाऱ्याचा पहीला क्रमांक यावा अशी परिस्थिती या माशाची आहे.

          निवटे आणि भाडुळकी यांच्यातील महत्त्वपूर्ण फरक म्हणजे त्यांचा आकार आणि पाण्यातला संचार. भाडुळकीची रचना निवट्यासारखीच असली तरी आकार लहान असतो. खाडीच्या अरूंद प्रवाहातील वाहत्या पाण्यातून मार्गक्रमण करताना भाडुळकी ज्या वेगाने पोहते त्याला तोड नाही. गरजेच्या वेळी अगदी प्रवाहाच्या विरूद्धही पोहू शकते. पोहताना पाण्याला स्पर्शही न करता हवेतून गेल्यासारखा भास होतो. आपल्या पोटाजवळील आणि छातीजवळील परांचा सुयोग्य वापर करून ‘छूना ना मुझे’ म्हणत ही जलपरी आपल्या समोरून नाहीशी होते. हीच चपळता दलदलीतही कायम राहते. गुळगुळीत ती अंगामुळे भक्षकाच्या तावडीतून सहजपणे निसटू शकते. आपल्या कुळातील इतर प्राण्यांसारखेच डोक्याच्या पुढच्या भागात बटबटीत डोळे भाडुळकीला असतात. चौफेर नजर असणे ही बाब शब्दश: या जीवाला लागू पडते. दोन्ही नेत्रगोल एकाच वेळेस वेगवेगळ्या दिशांना फिरू शकत असल्याने एक व्यापक दृष्टीकोन या प्राण्यांना मिळतो. पाण्यातून संचार करताना पाण्याच्या पृष्ठभागाखालचे दृश्य एका डोळ्याने तर पृष्ठभागावरील दृश्य एका डोळ्याने पाहण्यामुळे भाडुळकी सहसा हाती लागत नाही.

           वेगवान, चपळ, चलाख असणारे हे प्राणी दलदलीचे राजे आहेत. या दलदलीच्या राज्यात भाडुळकी म्हणजे दल-दलपरी. परंतु संपूर्ण निसर्गावर आमचाच हक्क आहे असे मानणारा एक वसाहतवादी प्राणी आपल्या वसाहतींसाठी भराव टाकून हे दलदलीचे राज्य खालसा करत सुटला आहे. यातून आतापर्यंत बऱ्यापैकी टिकाव धरणाऱ्या पऱ्यांची गणना दुर्मिळ जीवांमध्ये होऊ लागली आहे. तिचा ‘ना ना मुझे छूना ना, दूर ही रहना!”चा मूक आवाज या ‘वसाहतवादी प्राण्यापर्यंत’ पोहोचत नाही, या लेखाच्या निमित्ताने तो पोहोचावा- हीच अपेक्षा!

-  तुषार म्हात्रे, पिरकोन (उरण)

#सागरकिनारे #भाडुळकी #sagarkinare #mudskipper

No comments:

रायगडची लोहयुगीन संस्कृती

रायगडची लोहयुगीन संस्कृती मँडागोरा! ‘पेरिप्लस ऑफ इरिथ्रीयन सी’ या अत्यंत पुरातन आणि महत्त्वपूर्ण दस्ताऐवजांमध्ये नोंदवले गेलेले एक बंद...