Search This Blog

Monday, September 11, 2017

मातीतून भरारी घेणारा फिनीक्स

नदाल पुन्हा जिंकला. यावेळेस हार्डकोर्टवर त्याने बाजी मारली. एखाद्या अव्वल मानांकीत खेळाडूने अमेरिकन ओपनसारख्या ग्रँडस्लॅम स्पर्धेचे विजेतेपद मिळवणे ही काही विशेष बाब नाही. पण ही कामगिरी जेव्हा ‘राफा’ करतो तेव्हा माझ्यासारख्या चाहत्यांसाठी ती विशेष बाबच ठरते. या विजयासह 31 वर्षीय नदालने आपल्या कारकिर्दीतले 16वे ग्रँडस्लॅम पदक मिळवले.
राफेल नदाल परेरा म्हणजेच राफा हा क्रीडासंस्कृती जोपासलेल्या स्पेन या लहानशा देशाचा टेनिसपट्टू, पण त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण खेळामुळे संपूर्ण जगभर त्याचा चाहतावर्ग अाहे. 2005 साली एका वृत्तवाहिनीवर उपांत्य सामन्यात रॉजर फेडररला  हरवून पुढे फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकणाऱ्या नदालची बातमी पाहिली. मानेवर रूळणारे लांब केस, उंच आणि शीडशीडीत शरीरयष्टीचा एक किशोरवयीन मुलगा रॅकेट उंचावून आनंद व्यक्त करत होता.  तेव्हापासून आजतागायत याच पद्धतीने दोन्ही हात उंचावून आनंद व्यक्त करताना त्याला पाहतोय. 
काय आहे राफामध्ये ज्यामुळे त्याचे चाहते कामधंदे सोडून खेळ पाहण्यासाठी टी.व्ही. समोर बसतो?
इतकं काय विशेष आहे त्याच्या खेळात?
टेनिस खेळण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेली ‘सर्व्हीस’ नदालच्या बाबतीत ‘सुमार’ म्हणता येईल इतपत वाईट होती. फेडररसारखी नजाकत त्याच्या खेळात नाही. बँकहँड वापरताना खालून मारता येणारे (Down the line) फटके त्याला जमत नाहीत. समोरून येणाऱ्या जमिनीलगतच्या चेंडूंचे (Grassy Forehand साठी) काय करावे हे त्याला बऱ्याचवेळा कळत नाही. इतक्या सर्व कमकुवत बाजू असतानाही महान म्हणता येईल अशी जबरदस्त कामगिरी तो कसा काय करू शकतो?
याचे कारण म्हणजे या ‘सुमार’ कौशल्याच्या बदल्यात त्याच्याकडे असलेली ‘बेसुमार’ ताकद! घोडा, बैल आणि उंट यांच्यातील ताकदीचा काही अंश घेऊन त्यात चित्त्याची चपळता मिसळली तर जे रसायन तयार होईल ते म्हणजे राफा. एखाद्याकडे नुसती दैवी गुणवत्ता असून चालत नाही, तर त्याचा योग्य वापरही व्हावा लागतो. आपल्याकडील ‘कांबळी’ आणि ‘कुंबळे’चा विचार केला तर निसर्गदत्त गुणवत्ता लाभलेला विनोद कांबळी एक महान फलंदाज व्हावा इतक्या उच्च दर्जाचा होता, परंतु अंगभूत कौशल्याचा विवेकाने वापर न केल्याने स्वत:च्या गुणवत्तेला त्याला न्याय देता आला नाही. याऊलट अनिल कुंबळेचं म्हणता येईल. रूढार्थाने ना तो मध्यमगती गोलंदाज-ना लेगस्पिनर, पण आपल्यातील वैशिष्ट्यपूर्ण शैलीला बुद्धीची जोड देऊन यशस्वी ठरला.रवी शास्त्री, अजय जडेजा यांसारखे स्वत:चे सामर्थ्य (Strong Points) ओळखून यशस्वी झालेल्या अनेक खेळाडूंची नावे सांगता येतील. नदालने नेमके हेच केले. आपल्यातील ताकदीचा व डावखुऱ्या शैलीचा त्याने पुरेपूर वापर केला. एखादे मांजर ज्याप्रमाणे उंदराला खेळवत-खेळवत मारते, त्याप्रमाणे नदालही प्रतिस्पर्ध्याला खेळवत-खेळवत हरवतो.बातमी देणाऱ्यांना राफेल नदालचा सामना पाचव्या सेटमध्ये गेलाय इतकीच माहिती पुरेशी असते. इतका वेळ सामना चालल्यानंतर तोच जिंकणार हे नक्की.  फोरहँडच्या फटक्यांना टॉपस्पिनची जोड देत प्रतिस्पर्ध्याला चुका (forced errors)  करण्यास भाग पाडणे हे त्याचे आणखी एक कौशल्य. बेसलाईनवरून दोन्ही हातांनी बॅकहँडचे क्रॉस कोर्ट फटके मारणे हे त्याच्या भात्यातील ब्रम्हास्त्र. असे फटके पाहणे हा नेत्रसुखद अनुभवच. राफा यशस्वी का होतो याचे आणखी एक कारण म्हणजे ‘ताकद राखून ठेवण्याची’ पद्धत. कोर्टच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकाकडे चपळाईने स्लाईड करत चेंडू परतवून लावण्याचे कौशल्य अद्वितीय आहे. पण हे कौशल्य तो नेहमीच वापरत नाही. एखादा गेम पॉईंट हातातून निसटत असताना फारसे प्रयत्न न करता तो प्रतिस्पर्ध्याला सहजपणे गुण बहाल करतो. पण गरज असताना तो जे काही प्रयत्न करतो त्यामुळे समोरच्या खेळाडूच्या आणि प्रेक्षकांच्याही तोंडाचा एक अख्खा टेनिसचा चेंडू मावू शकेल इतका मोठ्ठा ‘आ’ वासला जातो. मातीचे मैदान (Clay Court) म्हणजे त्याच्यासाठी विजयाची रेड कार्पेट. ‘रोलँड’ गॅरोसला भविष्यात ‘राफेल’ गॅरोस म्हटले जावे इतका तो फ्रेंच ओपनमध्ये यशस्वी ठरलाय.
शारिरीक तंदुरूस्तीच्या बळावर भल्याभल्यांना मात देणाऱ्या या खेळाडूलाही दुखापतींचे ग्रहण लागले. टेनिस म्हणजे रॉजर फेडरर आणि राफेल नदाल अशी ओळख असताना दोघांचीही कामगिरी खालावली. इतके दिवस विजेतेपदाच्या जवळ येऊनही यश न मिळालेले खेळाडू ग्रँडस्लॅम गाजवू लागले. नोवाक जोकोविच, अँडी मरे यांनीही वाहत्या गंगेत हात धुवून घेतले. जवळपास तीन वर्षांच्या निराशाजनक कालावधीनंतर रॉजर आणि राफा दोघांनीही अविश्वसनीय कामगिरी केली. रॉजरने विम्बल्डनचे तर राफेलने फ्रेंच पाठोपाठ अमेरिकन ओपनचे विजेतेपद मिळवले. राखेतून भरारी घेणाऱ्या फिनीक्स पक्षाची कथा नेहमी ऐकवली जाते. ही कथा खरी की काल्पनिक माहीत नाही. माझ्यासाठी तरी ‘राफेल नदाल’ हाच फिनीक्स आहे, मातीतून भरारी घेणारा.

-तुषार म्हात्रे, पिरकोन (उरण)

No comments:

रायगडची लोहयुगीन संस्कृती

रायगडची लोहयुगीन संस्कृती मँडागोरा! ‘पेरिप्लस ऑफ इरिथ्रीयन सी’ या अत्यंत पुरातन आणि महत्त्वपूर्ण दस्ताऐवजांमध्ये नोंदवले गेलेले एक बंद...