Search This Blog

Wednesday, January 24, 2018

पिरकोनमधील वीरगळ (भाग-1)


नवी मुंबईलगतच्या उरण तालुक्यातील पिरकोन हे एक सामान्य गाव. पिरकोनच्या दक्षिणेला लोकवस्तीपासून दूर पण लोकांची ये-जा असलेले ‘शिव मंदिर’ आहे. काही दशकांपूर्वी जीर्णोद्धार केलेल्या या नेटक्या मंदिराचे ‘शंकर-विष्णू देवस्थान’ म्हणून नामकरणही झाले आहे.
शैव’ आणि ‘वैष्णव’ अशा दोन्ही परंपरांचे एकत्रिकरण या मंदिरात आहे.सिमेंटीकरणाच्या काळातही आपला नैसर्गिकपणा टिकवलेल्या शांत परिसरात हे मंदिर उभे आहे.
मंदिराच्या समोरील बाजूस झीज झालेल्या रुपातील दोन दगडी नंदी आहेत. या मंदिराच्या चौथऱ्याखाली उतरल्यावर दोन शिळा आधाराने ठेवलेल्या दिसतात.
तशीच एक भग्न शिळा समोरील बोडणीच्या(छोटा तलाव) कडेला ठेवल्याचे आढळते. गेली कित्येक वर्षे उन-पाऊस झेलत या शिळा मंदिराबाहेर पडून आहेत. नाही म्हणायला कधी कधी त्यांच्यावर एखादा शेंदूरतिलक अथवा चुना फासून या दुर्लक्षित शिळांवरील अन्याय दूर करण्याचा प्रयत्न केला जातो. पण ते तेवढ्यापुरतेच.
पण या दुर्लक्षित शिळांकडे इतके लक्ष वेधण्याची गरजच काय?
काय वैशिष्ट्य आहे या दगडांचे?




चला महत्त्व जाणून घेऊया, पिरकोन मधील या ऐतिहासिक पाऊलखुणांचे...



       शिवमंदिरासमोर असणाऱ्या या शिळा म्हणजे दुसरे तिसरे काही नसून ‘वीरगळ’ आहेत.
महाराष्ट्राच्या खेडोपाड्यात वेशीजवळ किंवा शंकराच्या देवळाजवळ गेल्यावर वीरगळ दिसून येतात. हे वीरगळ प्राचीन व मध्ययुगीन इतिहासाचे बोलके पुरावे आहेत. वीरगळ म्हणजे काय ते आधी समजून घेऊ या. “एखाद्या शूरवीरास कोणत्या कारणास्तव वीरगती प्राप्त झाली आहे त्याचे चित्रण ज्या शिळेवर कोरले जाते तीला ‘वीरगळ’(Hero Stone) म्हणतात.” वीरगळांचा काळ दुसरे शतक ते अठरावे शतक असा गणला जातो. युद्धात कामी आलेल्या योद्ध्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ अशा वीरगळ उभारल्या गेल्या आहेत. स्तंभरूपी वीरगळावर चौकटींमध्ये वीराच्या आयुष्यातील प्रसंग कोरलेले असतात. साधारणत: खालच्या चौकटीत मरून पडलेला वीर तर मधल्या खणात अप्सरा ह्या वीराला सन्मानाने घेऊन जाताना दिसतात. त्याच्या वरच्या कप्प्यात नंदी, शिवलिंग, पूजा विधी सांगणारा ब्राम्हण व शिवलिंगाची पूजा करणारा वीर, तर सर्वात वरच्या खणात कलश म्हणजे वीराचे कैलाश गमन दाखवलेले असते. कलशाच्या दोन्ही बाजूस चंद्र-सूर्य कोरलेले असून याचा अर्थ जो पर्यंत चंद्र-सूर्य उगवत आहेत तो पर्यंत ह्या वीराची किर्ती कायम राहील हे यातून सांगायचे असते.
      शिवमंदिराच्या चौथऱ्यासमोर ज्या दोन वीरगळ ठेवलेल्या आहेत, त्यातील आकाराने मोठ्या वीरगळीकडे पाहूया.
विरगळ क्र. 1
यातील वीरगळीचा तळाचा भाग गाडला गेला आहे. त्यामुळे सर्वात खालच्या चौकटीतील मृत वीर स्पष्टपणे दिसत नाही. मधल्या खणात मात्र लढाईचा प्रसंग स्पष्टपणे दिसतो. दोन लढवय्ये एकमेकांशी झुंजत असून त्यातील एकाच्या हातात ढाल तलवार दिसत आहे. याचा अर्थ ज्या वीराच्या स्मरणार्थ हे स्मारक आहे, त्याचा मृत्यू जमिनीवरील युद्धात झाला आहे. त्याच्या वरच्या चौकटीतील कोरलेल्या प्रसंगाची झीज झाल्याने सुरूवातीस काहीच अंदाज बांधता येत नाही, परंतु इतर विरगळांशी तुलना केल्यावर या चौकटीतील शिवलिंग व त्याची पूजा करणारा वीर असल्याचे लक्षात येते.
      आकाराने मोठ्या वीरगळाच्या बाजूला त्रिकोणी माथा असलेला दुसरी लहान वीरगळ आणखी वैशिष्ट्यपूर्ण आहे. ही  वीरगळ तीन चौकटींमध्ये बनलेली असल्याचे दिसून येते.
वीरगळ क्र.2 (सतीशिळा)
यातील तळाची चौकट गाडली गेल्याने मृत वीराचा भाग स्पष्ट दिसत नाही. मधल्या कप्प्यात घोडेस्वार लढताना दाखवला आहे. यातील घोड्यावर बसलेला वीर स्पष्टपणे दिसत आहे. हे बहुधा एखाद्या शूर सरदाराचे स्मारक असावे. त्यावरील भागातील माहिती या युद्धप्रसंगाला आणि पर्यायाने पिरकोनच्या इतिहासाला एका वेगळ्याच वळणावर नेऊन ठेवते. या भागात दोन मानवी आकृत्या असून या सर्व आकृत्यांपेक्षा मोठा असणारा आणि ही चौकट व्यापणारा एक हात दिसत आहे. हा हात कोपऱ्यात दुमडलेला असून हाताचा पंजा कोरलेला आहे. हातामध्ये चूडा भरलेला आहे. अशा प्रकारच्या वीरगळाला ‘सतीशिळा’ किंवा ‘सतिचा दगड’ म्हणतात.  सतीशिळा किंवा सतीचे दगड यावर एकच चित्र कोरलेले असते, त्रिकोणी माथा असलेल्या सपाट दगडावर काटकोनात दुमडलेला हाताचा कोपरा आणि हाताचा पंजा दाखवलेला असतो. दंडावर नक्षीदार चोळी, मनगटापर्यंत चूडा भरलेला हात आणि बाजूला दोन मानवी आकृत्या असतात. या शिळेचा अर्थ असा की ज्या घोडेस्वाराने युद्धात वीरमरण पत्करले आहे त्याच्या मृत्यूनंतर त्याची पत्नी त्याच्यासोबत सती गेलेली आहे. एका वीरपत्नीचे हे स्मारक आहे. वीरांच्या इतिहासाला ‘सतीपरंपरेची’ एक काळी किनार यानिमित्ताने दिसून येत आहे.
     याच वीरगळांसमोरील भागात आणखी एक वीरगळ भग्न अवस्थेत पडून आहे.
वीरगळ क्र. 3
दगडाची झीज अधिक प्रमाणात झाल्याने यावरील कोरलेले प्रसंग ओळखू येत नाहीत. मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या शेताच्या पलिकडे एका उंच भागावर आणखी दोन कोरीव शिल्पे पडून आहेत. या शिल्पांमध्ये ध्यानस्थ स्थितीतील मानवी आकृतीभोवती दोन आकर्षक आणि कलापूर्ण हत्ती कोरलेले आहेत.
शिवमंदिराच्या मागील बाजूचे शिल्प
 परंतु त्या शिळा विरगळ असल्याचे वाटत नाही. त्याबरोबरच आणखी पुढे गेल्यास एका जांभळाच्या झाडाखाली एक भग्न शिवलिंगही आहे.  सध्यातरी केवळ तीनच वीरगळ शंकर मंदिरासमोर आढळल्या आहेत. कदाचित आणखी शोध घेतल्यास या परिसरातील नवा ऐतिहासिक ठेवा समोर शकेल. वरील माहिती वाचून मंदिर भागातील या तीन वीरगळींव्यतिरिक्त उर्वरीत पिरकोन परिसरात काही असू शकेल का? असा प्रश्न जर तुम्हाला जर पडला असेल तर त्याचे उत्तर "होय” असेच आहे. आता उर्वरीत परिसरातील स्मृतीचिन्हांकडे वळू या. सध्या ‘धोंडूकाका मैदान’  म्हणून नावारुपाला आलेल्या मैदानाजवळील ‘यताल देव’ म्हणजे ‘वेताळ देव’ मंदिराबाहेर एक वेगळ्या शैलीतील  ‘वीरगळ’ आहे.
वेताळदेव परिसरातील वीरगळ

चौकोनी स्तंभरूपातील या वीरगळीवर केवळ एकच मानवी आकृती कोरलेली आहे. तळाचा भाग रूंद व वरील भाग निमुळता, तसेच त्यावर शिवलिंगाप्रमाणे गोलाकार भाग अशी रचना या वीरगळीची आहे. अशाच स्वरूपाची रचना असणारे आणखी दोन वीरगळ याच मार्गाने पुढे गेल्यास पाणदिवे येथील हुतात्मा स्मारकाजवळ आढळतात. पाणदिवे स्मारकाजवळील एका वीरगळीवर वीराची मोठी प्रतिमा कोरण्यात आली आहे.
पाणदिवे येथील वीरगळ
तर दुसरी वीरगळ झीज झाल्याने अस्पष्ट दिसत आहे. तरीही त्या शिळेवर एक मानवी आकृती ध्यानमुद्रेत बसलेली आढळते, तर तिच्याच बाजूला एक लहान मानवी आकृती असल्याचे जाणवते. कदाचित ही दुसरी वीरगळ एखाद्या साधु किंवा तशा व्यक्तिमत्वाच्या वीराची असू शकेल. या मार्गातील तिन्ही वीरस्मारकांवर ‘कमळपुष्प’ कोरलेले आहे. कमळपुष्प हे चिन्ह समृद्धीचे प्रतिक मानले जाते. कदाचित हे सर्व वीर एक समृद्ध वारसा असणाऱ्या राज्यातील आहेत, असेच या स्मारकांच्या निर्मात्यांना सुचवायचे असेल.भारतातील बहुतांशी वीरगळांवर लेखन आढळत नाही, परंतु पिरकोन गावातील मारुती मंदिराच्या समोरील एका शिळेवर मात्र देवनागरी लिपीतील अक्षरे कोरलेली आहेत. हे लिखाण थोडे अलिकडच्या काळातील वाटते.
मारूती मंदिरासमोरील लिखित विरगळ
वीरगळ जुने आणि त्यावरील लेखन नवे असेही असू शकेल. या शिळेवर एखाद्या व्यक्तीचे नाव कोरल्यासारखे वाटते. या वीरगळावरील अक्षरांचा अर्थ लागल्यास या इतिहासात मोलाची भर पडू शकेल.
गेल्या कित्येक शतकांपासून इतिहासाचे हे मूक साक्षीदार उपेक्षित अवस्थेत पडून आहेत. यापूर्वी पिरकोन व आवरे या शेजारील दोन गावांचा उल्लेख ठाणे येथे सापडलेल्या ताम्रपटात आढळला होता. आता प्रत्यक्षात पिरकोन परिसराचा समृद्ध वारसा या वीरगळांच्या निमित्ताने समोर आला आहे. आता गरज आहे ती या ऐतिहासिक वारशाच्या जतनाची. या अनाम वीरांनी दाखवलेल्या शौर्याची जाणीव ठेवून समाजाप्रती आपली बांधिलकी ठेवून असेच समाजकार्य पुढे चालू ठेवण्याची. हे दगड यापुढेही आपल्याला प्रेरणा देतील, समाजविघातक प्रवृत्तींविरूद्ध लढण्याची.
चला सर्वांनी मिळून या ऐतिहासिक आणि समृद्ध वारशाला जपूया... आपल्या भूमीसाठी, आपल्या लोकांसाठी वीरमरण पत्करलेल्या या अनाम वीरांना आठवणीत ठेवूया...

- तुषार म्हात्रे, पिरकोन (उरण)

संदर्भ:  महाराष्ट्रातील वीरगळ- सदाशिव टेटविलकर, इतिहासाचे मूक साक्षीदार- आषुतोष बापट, विकीपीडीया - https://en.m.wikipedia.org/wiki/Hero_stone

(पिरकोनमधील वीरगळ भाग-2 लवकरच येत आहे...)

5 comments:

Unknown said...

तुझ्या सूक्ष्म निरिक्षणाला आणि ऐतिहासिक माहितीला सलाम.......

Unknown said...

अगदी स्पष्ट आणि मुद्देसूद माहिती

Usha Rane said...

अत्यंत माहितीपूर्ण लेखन। मुंबईच्या इतक्या जवळ असलेल्या या आईतूहसिक वारश्याची सचित्र दिलीत त्याबद्दल आभार। मागे आपणांस मिळालेल्या पुरस्काराबद्दल आपले अभिनंदन।

Tushar Mhatre said...

धन्यवाद!

Tushar Mhatre said...

लेख वाचल्याबद्दल आभार!
आणि शुभेच्छांबद्दल धन्यवाद!

रायगडची लोहयुगीन संस्कृती

रायगडची लोहयुगीन संस्कृती मँडागोरा! ‘पेरिप्लस ऑफ इरिथ्रीयन सी’ या अत्यंत पुरातन आणि महत्त्वपूर्ण दस्ताऐवजांमध्ये नोंदवले गेलेले एक बंद...