पावसाचा थेंब : साडेचार अब्ज वर्षांची वैश्विक ठेव!
पावसाचा थेंब : साडेचार अब्ज वर्षांची वैश्विक ठेव!
पावसाळा आला की आभाळाकडे डोळे लावून बसण्याची आपली सवय काही नवी नाही. शेतकऱ्यांसाठी पाऊस म्हणजे पेरणीची आशा, शहरवासीयांसाठी पाण्याच्या टाक्या भरण्याची खात्री आणि निसर्गासाठी नव्या सृजनाची चाहूल! पण यंदा पावसाने अपेक्षेप्रमाणे साथ दिली नाही. महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसाची कमतरता आणि दुष्काळाचे सावट आहे. पाण्याचा नळ उघडला आणि पाणी आले नाही, की आपल्याला त्याचे महत्त्व लगेच कळते. पण कधी विचार केला आहे का, आभाळातून पडणाऱ्या पावसाच्या थेंबाचा जन्म नेमका कसा झाला असेल? या एका थेंबामागे साडेचार अब्ज वर्षांची विलक्षण वैश्विक कहाणी दडलेली आहे.
सुमारे साडे चार अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वी आकाराला आली, तेव्हा आजच्यासारखे निळेशार आकाश, हिरवीगार वनराई किंवा अथांग महासागर नव्हते. पृथ्वीचा पृष्ठभाग प्रचंड उष्ण होता. सर्वत्र वितळलेल्या खडकांचे लाव्हारसाचे समुद्र पसरले होते. वातावरणात कार्बन मोनॉक्साईड, मिथेन, नायट्रोजन आणि हायड्रोजन यांसारख्या वायूंचे मिश्रण होते. ज्वालामुखी सतत लाव्हा आणि वायू बाहेर फेकत होते. त्याच काळात उल्का आणि लघुग्रहांच्या माध्यमातूनही पृथ्वीवर पाणी आणणारे घटक पोहोचत होते. या उल्कांमधील बर्फ आणि पृथ्वीच्या अंतर्गत प्रक्रियांतून बाहेर पडणारी वाफ यांनी पाण्याच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावली. पृथ्वी हळूहळू थंड होऊ लागली, वातावरणातील पाण्याची वाफ संघनित होऊन पावसाच्या रूपाने बरसू लागली. लाखो वर्षे चाललेल्या या प्रक्रियेत पृथ्वीवर पहिले महासागर तयार झाले. आज आपल्या समुद्रात, नद्यांत आणि घरातील नळांतून वाहणाऱ्या पाण्यामागे निसर्गाच्या अब्जावधी वर्षांच्या प्रवासाचा वाटा आहे.
पावसाची निर्मिती समजून घ्यायची तर जलचक्र समजून घ्यावे लागेल. सूर्य हा या चक्राचा ऊर्जास्रोत आहे. समुद्र, नद्या, तलाव आणि धरणांमधील पाण्याचे सूर्याच्या उष्णतेमुळे बाष्पीभवन होते. वनस्पतीही पानांमधून पाण्याची वाफ वातावरणात सोडतात. ही वाफ वर जाताना थंड होते आणि तिचे सूक्ष्म पाण्याच्या थेंबांत रूपांतर होते. अशा असंख्य थेंबांपासून ढग तयार होतात. ढगांतील थेंब एकमेकांना धडकून मोठे आणि जड होत जातात. हवेचा वर जाणारा प्रवाह त्यांना आधार देऊ शकत नाही, तेव्हा ते पावसाच्या रूपाने जमिनीवर कोसळतात. हे पाणी पुन्हा नद्या, तलाव, धरणे आणि भूगर्भात साठते. काही समुद्रात पोहोचते आणि पुन्हा बाष्पीभवन होते. म्हणजेच पाऊस हा पाण्याच्या प्रवासाचा शेवट नसून अखंड चालणाऱ्या जलचक्रातील एक महत्त्वाचा टप्पा आहे.
यंदाच्या पावसाच्या कमतरतेने या चक्राचे महत्त्व पुन्हा अधोरेखित केले आहे. महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने शेती, पिण्याचे पाणी आणि भूजलसाठ्यांवर परिणाम झाला आहे. दुष्काळ म्हणजे केवळ पाऊस कमी पडणे नव्हे. पावसातील खंड, जमिनीतील ओलावा कमी होणे, धरणांमधील साठा घटणे आणि भूजलपातळी खालावणे या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणजे दुष्काळ. पावसाची एखादी मोठी सर येऊन गेली म्हणून पाण्याचे संकट संपत नाही. पाऊस किती पडला याबरोबरच तो कधी आणि किती काळ पडला, हेही महत्त्वाचे असते.
नवी मुंबईसारख्या नियोजनबद्ध शहरात राहणाऱ्यांना पाण्याची कमतरता कदाचित लगेच जाणवत नाही. सकाळी नळाला पाणी येते, सोसायटीच्या टाक्या भरतात आणि शहराचे व्यवहार सुरू राहतात. मात्र, या पाण्याचा प्रवास समजून घेतला तर शहराचे पावसावर असलेले अवलंबित्व लक्षात येते. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रासाठी रायगड जिल्ह्यातील मोरबे धरण हा पाणीपुरवठ्याचा महत्त्वाचा स्रोत आहे. धरणातील पाणी भोकरपाडा येथील जलशुद्धीकरण केंद्रात आणून त्यावर प्रक्रिया केली जाते. शहरातील तलाव, विहिरी आणि अन्य स्थानिक जलस्रोतही महत्त्वाची भूमिका बजावतात. वाढती लोकसंख्या, उंच इमारती, उद्योग, रुग्णालये आणि घरगुती वापर यांमुळे पाण्याची मागणी सातत्याने वाढत आहे. समुद्रकिनारी राहूनही आपल्याला पिण्यासाठी गोड्या पाण्याचीच गरज असते. त्यामुळे समुद्राचे पाणी असूनही पावसावरचे आपले अवलंबित्व कमी होत नाही.
नवी मुंबईत पावसाळ्यात रस्त्यांवर पाणी साचते आणि उन्हाळ्यात पाण्याची चिंता निर्माण होते, हा विरोधाभास विचार करायला लावणारा आहे. सिमेंटची जंगले, मोकळ्या जागांचा अभाव, नैसर्गिक नाल्यांवरील अतिक्रमणे यांमुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरण्याऐवजी वाहून जाते. म्हणूनच छतावरील पाणी संकलित करणे, विहिरींचे पुनर्भरण करणे, तलाव आणि पाणथळ जागांचे संवर्धन करणे आवश्यक आहे. प्रत्येक सोसायटीने पावसाचे पाणी साठवण्याची व्यवस्था करावी. घरातील नळाची गळती थांबवणे आणि पाण्याचा पुनर्वापर करणे यांसारख्या छोट्या कृतीही महत्त्वाच्या आहेत.
पृथ्वीवरील एकूण पाण्यापैकी केवळ अडीच टक्के पाणी गोडे आहे. त्यातीलही मोठा भाग हिमनद्या आणि भूगर्भात साठलेला आहे. म्हणजे सहज उपलब्ध होणारे पाणी अत्यंत मर्यादित आहे. अब्जावधी वर्षांपूर्वी पृथ्वीवर आलेला पाण्याचा थेंब आजही जलचक्रातून प्रवास करत असावा; पण त्याची गुणवत्ता आणि उपलब्धता आपण नक्कीच बिघडवू शकतो. म्हणून पाऊस पडण्याची वाट पाहण्याबरोबरच पडलेल्या प्रत्येक थेंबाला जमिनीवर थांबवणे, साठवणे आणि जपणे ही आपली जबाबदारी आहे. शेवटी, पाऊस पडणे ही निसर्गाची कृपा असेल; पण त्या पावसाचे पाणी पुढच्या पिढ्यांसाठी राखून ठेवणे हे माणसाचे कर्तव्य आहे!
- तुषार म्हात्रे

टिप्पण्या