दोन हातांची दुर्गा

 दोन हातांची दुर्गा

       नवरात्रात देवीची मूर्ती पाहताना सर्वात आधी लक्ष वेधून घेतात ते तिचे अनेक हात. प्रत्येक हातात वेगळे आयुध, वेगळी जबाबदारी आणि वेगळी शक्ती. कुठे त्रिशूळ, कुठे चक्र, कुठे तलवार, तर कुठे कमळ! देवीच्या या अनेक हातांतून तिच्या सामर्थ्याची कल्पना केली जाते. पण आपल्या आजूबाजूला नजर टाकली तर एक वेगळंच दृश्य दिसतं. ग्रामीण महिलेच्या हातात ना त्रिशूळ असतो, ना चक्र. असतात फक्त दोन हात. आणि त्या दोन हातांनी ती दिवसभरात एवढी कामं करते की, देवीचे अनेक हातही कमी पडावेत!

         १५ ऑक्टोबर हा आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिन. ग्रामीण महिलांच्या सामाजिक, आर्थिक आणि कृषी क्षेत्रातील योगदानाची दखल घेण्याचा हा दिवस. भारतासारख्या कृषिप्रधान देशात या दिवसाचं महत्त्व अधिक आहे. कारण शेतीच्या प्रत्येक टप्प्यावर ग्रामीण महिलेचे हात लागलेले असतात. पेरणीपूर्वीची तयारी, रोपांची लागवड, तण काढणे, कापणी, धान्याची स्वच्छता आणि साठवणूक, जनावरांची देखभाल अशी कामांची मोठी यादी तिच्या दिवसात असते. शेतातून परतल्यानंतरही तिचा दिवस संपत नाही. स्वयंपाक, पाणी भरणे, मुलांची आणि ज्येष्ठांची काळजी या जबाबदाऱ्या तिची वाट पाहत असतात.

          नवी मुंबईच्या चकचकीत शहराला लागून असलेल्या पनवेल, उरण आणि परिसरातील गावांकडे पाहिलं की या श्रमांचं वास्तव अधिक स्पष्ट दिसतं. एका बाजूला उंच इमारती, मॉल्स आणि वेगवान शहरजीवन; तर दुसऱ्या बाजूला भातशेती, खाडी, मासेमारी आणि गावाकडचं जीवन. उरणच्या भातशेतीत लावणीपासून कापणीपर्यंत महिलांचे हात राबताना दिसतात. खाडीकिनाऱ्याच्या अर्थव्यवस्थेत मासे निवडणे, स्वच्छ करणे, वाळवणे, साठवणे आणि विक्रीसाठी तयार करणे अशा कामांतही महिलांचा सहभाग असतो. पुरुष समुद्रात गेला म्हणून मासेमारीची गोष्ट तिथे संपत नाही; किनाऱ्यावर त्या व्यवसायाला पुढे नेणारे हातही तितकेच महत्त्वाचे असतात.

         मात्र या श्रमांची विडंबना अशी की, कामाची जबाबदारी मोठी आणि ओळख अनेकदा छोटी. शेतात प्रत्यक्ष राबणारी महिला ‘शेतकरी’ म्हणून किती वेळा ओळखली जाते? घर चालवण्यासाठी ती करत असलेल्या विनामूल्य कामाची किंमत किती वेळा मोजली जाते? जनावरांची देखभाल, शेतमालाची प्राथमिक प्रक्रिया, बचतगटातील आर्थिक व्यवहार किंवा बाजारपेठेशी जोडलेली कामे, ही ‘मदत’ नसून ग्रामीण अर्थव्यवस्थेतील प्रत्यक्ष श्रम आहेत.

       देवीच्या अनेक हातांपैकी प्रत्येक हात एखाद्या शक्तीचं प्रतीक मानला जातो. ग्रामीण स्त्रीचे ते दोन हातही तितकेच सामर्थ्यवान आहेत. एका हाताने ती शेतात रोपं लावते, तर दुसऱ्या हाताने घराचा संसार सांभाळते. एका हाताने जनावरांना चारा देते, तर दुसऱ्या हाताने मुलांच्या भविष्याची चिंता करते. संकट आलं की हेच दोन हात कुटुंबाला सावरतात. म्हणून देवीची शक्ती शोधण्यासाठी केवळ मंदिरात जाण्याची गरज नाही; गावच्या शेतात, अंगणात आणि बाजारात राबणाऱ्या स्त्रीकडे पाहिलं तरी ती दिसते. म्हणून महिलांचा सन्मान केवळ शब्दांत किंवा एका दिवसापुरता नको. तिच्या श्रमाला योग्य मूल्य मिळालं पाहिजे, तिच्या नावावर जमीन आणि मालमत्तेचे हक्क बळकट झाले पाहिजेत, शिक्षण व आरोग्याच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत आणि गावाच्या निर्णयप्रक्रियेत तिचा आवाज समान ताकदीने ऐकू आला पाहिजे. विकासाच्या नकाशावर रस्ते, उद्योग आणि इमारती दिसतात; पण त्या विकासाच्या प्रक्रियेत ग्रामीण स्त्रीच्या उपजीविकेचा आणि हक्कांचा विचारही दिसला पाहिजे.

       देवीसमोर फुलं वाहणं सोपं आहे; पण तिच्या रूपात जगणाऱ्या स्त्रीच्या हक्कांसाठी उभं राहणं ही खरी शक्तीपूजा आहे. घरात समानता, शेतात तिच्या श्रमाची ओळख, अर्थकारणात तिचा हक्क आणि निर्णयप्रक्रियेत तिचा समान वाटा, हीच नवरात्रीची खरी शिकवण.

    देवीचे अनेक हात तिच्या शक्तीचं प्रतीक आहेत; कष्टकरी महिलेचे दोन हात त्या शक्तीचं जगतं रूप आहेत. त्या दोन हातांना बळ देणं, त्यांच्या श्रमाला मान्यता देणं आणि त्यांच्या हक्कांसाठी उभं राहणं, हाच खरा देवीचा सन्मान. कारण महिलांचा सन्मान झाला, तरच देवीची पूजा पूर्ण होते.


  - तुषार म्हात्रे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पाचवीला पुजलेली सटी

चुलीवरचे जेवण!

शिलाखंडांचे ताम्रपट