देवतांच्या सोबतीला आलेले वन्यजीव
आज वन्यजीव सप्ताहाचा अखेरचा दिवस. वन्यजीव सप्ताह म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर जंगल उभं राहतं. वाघ, बिबट्या, हत्ती, अस्वल, गरुड, मोर... पण एखाद्या जुन्या मंदिराच्या गाभाऱ्यात किंवा सभामंडपात जाऊन देवतेच्या हाताकडे, पायाशी किंवा मुकुटाकडे जरा बारकाईने पाहिलं, तर जंगलाची एक वेगळीच दुनिया तिथे सापडते. वाघ, सिंह, हत्ती, वानर यांसारख्या परिचित प्राण्यांबरोबरच मुंगूस, गोधा, विंचू, मेष आणि हरिण यांसारखे जीवही देवतांच्या प्रतिमेत महत्त्वाची भूमिका बजावताना दिसतात. गंमत अशी की हे प्राणी आपल्याला ओळखीचे असले, तरी त्यांच्या मूर्तिशास्त्रीय अर्थाकडे आपलं लक्ष क्वचितच जातं.
कुबेराच्या हातातील मुंगूस, गौरीसोबतची गोधा, चामुंडेच्या पोटावरचा विंचू, अग्निदेवाचा मेष आणि शिवाच्या हातातील चपळ हरिण! जंगलात स्वतंत्रपणे जगणारे हे जीव मंदिरात पोहोचले आणि प्रत्येकाला एक नवा अर्थ मिळाला. काही देवतांची वाहनं झाले, काही हातातील आयुधासारखे प्रतीक झाले, तर काहींनी देवतेच्या गुणधर्माचीच आठवण करून दिली. म्हणजे भारतीय मूर्तिशास्त्रात प्राणी केवळ सजावटीसाठी आले नाहीत; ते स्वतःची एक प्रतीकात्मक भाषा घेऊन आले.
कुबेराच्या हातातील मुंगूस हे त्याचं रंजक उदाहरण. धनदेव कुबेराच्या काही प्रतिमांमध्ये हातात मुंगूस दाखवला जातो आणि त्याच्या तोंडातून रत्ने बाहेर पडताना कोरलेली असतात. जंगलात सापाशी दोन हात करणारा हा छोटासा सस्तन प्राणी इथे संपत्तीच्या वर्षावाचं प्रतीक बनतो. सापावर विजय आणि धनरक्षण यांच्याशी त्याची प्रतिमा जोडली गेली. म्हणजे जंगलात नागाला भिडणारा मुंगूस मंदिरात आला आणि थेट धनाचा कारभारी बनला!
गौरीसोबतची गोधाही कमी रंजक नाही. महाराष्ट्रात घोरपड म्हणून परिचित असलेला मॉनिटर लिझर्ड ना मोराइतका देखणा, ना हत्तीइतका भव्य. तरीही भारतीय मूर्तिशास्त्रात गौरीला गोधेवर आरूढ दाखवण्याची परंपरा आढळते. दहाव्या शतकातील गोधेसह गौरीची प्रतिमा न्यूयॉर्कच्या मेट्रोपॉलिटन म्युझियममध्ये जतन करण्यात आली आहे. देवतेच्या पायाशी दिसणारा हा सरपटणारा जीव एक वेगळीच गोष्ट सांगतो. देवतेचं वाहन होण्यासाठी प्राणी देखणा किंवा भव्य असण्याची गरज नव्हती. निसर्गातील वैशिष्ट्यपूर्ण जीव म्हणून त्यालाही धार्मिक प्रतिमेत स्थान मिळू शकत होतं.
चामुंडेच्या प्रतिमेतला विंचू मात्र वातावरणच बदलून टाकतो. कृश शरीर, बाहेर आलेले दात, कवट्यांची माळ आणि भयचकित करणारी मुद्रा यामध्ये पोटावर चढलेला छोटासा विंचू प्रथमदर्शनी दुर्लक्षित होतो. मात्र काही मध्ययुगीन चामुंडा प्रतिमांमध्ये तो स्पष्टपणे दाखवला आहे. हा विंचू चामुंडेची भूक दर्शवतो. मेट्रोपॉलिटन म्युझियममधील एका चामुंडा प्रतिमेच्या वर्णनात विंचवाचा संबंध आजार आणि मृत्यूशी जोडला आहे. घराच्या कोपऱ्यात दिसला की आपण ज्याच्यापासून चार हात लांब राहतो, तोच जीव इथे जीवनाच्या नश्वरतेचं प्रतीक बनतो. मूर्तिशास्त्र कधी कधी इतकं चुरचुरीत असतं!
अग्निदेवाच्या सोबतीला येणारा मेषही असाच लक्षवेधी. अग्नी म्हणजे ज्वाला, धूर आणि प्रकाश. पण शिल्पात अग्नीची ओळख करून द्यायची असेल तर त्याला एक दृश्य संकेत हवा. भारतीय मूर्तिशास्त्रीय परंपरेत मेष हा अग्नीचा वाहन मानला जातो. यज्ञकुंडातील अग्नी आणि त्याच्या सोबतचा मेष यामुळे शिल्पकाराने अग्नीला एक स्पष्ट दृश्य ओळख दिली. आपल्यासाठी मेष कदाचित साधा पाळीव प्राणी असेल; पण देवतेच्या प्रतिमेत तो अग्नीचा साथीदार बनतो.
...आणि मग येतो हरिण. कारण शिवाच्या हातातील हरिण हे केवळ वाहनाच्या कल्पनेशी जोडलेलं नाही. पारंपरिक भारतीय शिल्पांमध्ये शिवाला एका हातात छोटंसं उड्या मारणारं हरिण धरलेलं दाखवलं जातं. हाताची ही मुद्रा ‘हरिणी मुद्रा’ म्हणून ओळखली जाते. हरिणाचा स्वभावच चपळ. क्षणभर इथे, क्षणभर तिथे. सतत सावध नजर, अचानक बदलणारी दिशा आणि क्षणार्धात उडी घेण्याची त्याची प्रवृत्ती यामुळे तो मानवी मनाच्या चंचलतेचं प्रतीक मानला गेला. शिवाच्या हातात स्थिर झालेलं हरिण म्हणजे चंचल मनावर मिळवलेलं नियंत्रण, अशी या प्रतिमेची पारंपरिक प्रतीकात्मक व्याख्या केली जाते. इथेच या शिल्पाची खरी गंमत आहे. एका बाजूला सतत उड्या मारणारं, चंचल हरिण आणि दुसऱ्या बाजूला त्याला सहज हातात धारण करणारा स्थिर शिव. चंचलता आणि स्थैर्य यांचा विरोधाभास शिल्पकाराने एका हाताच्या मुद्रेत पकडला आहे. काही परंपरांमध्ये हरिणाचे चार पाय चार वेदांचे प्रतीक मानले जातात. शिवाचा ‘पशुपती’ हा निसर्गाशी असलेला संबंधही या प्रतिमेतून अधोरेखित होतो. या प्रतिमेची अप्रतिम उदाहरणं चोलकालीन कांस्यशिल्पात दिसतात. दक्षिण भारतातील चोल शिल्पकारांनी शिवाच्या प्रतिमांमध्ये एका हातात छोटं हरिण आणि दुसऱ्या हातात परशूसारखं आयुध दाखवलं आहे. सुमारे दहाव्या शतकातील चोलकालीन चंद्रशेखर शिवाची प्रसिद्ध कांस्यप्रतिमा ब्रुकलिन म्युझियमच्या संग्रहात आहे. त्या छोट्याशा कांस्य हरिणाकडे पाहिलं की धातूमध्येसुद्धा प्राण्याची चपळता पकडण्याचा शिल्पकाराचा प्रयत्न जाणवतो. दगडातही हीच परंपरा दिसते. कर्नाटकातील नवव्या शतकातील भोगानंदीश्वर मंदिरातील शिव आणि गौरीच्या शिल्पांमध्ये हरिणमुद्रेचा संदर्भ आढळतो. म्हणजे हरिण एखाद्या एका प्रदेशापुरता किंवा एका शिल्पमाध्यमापुरता मर्यादित नव्हता. उत्तर ते दक्षिण भारतीय शिल्पपरंपरेत त्याने स्वतःची प्रतीकात्मक जागा निर्माण केली.
यात आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे. शिल्पकाराने हे प्राणी केवळ कल्पनेतून कोरलेले नाहीत. त्याने निसर्गाचं निरीक्षण केलं आणि त्या निरीक्षणाला सांस्कृतिक अर्थ दिला. चपळ हरिण मनाशी जोडला, विषारी विंचू नश्वरतेशी जोडला, सापाशी झुंजणारा मुंगूस धनरक्षणाच्या कल्पनेशी जोडला आणि सरपटणाऱ्या गोधेलाही देवतेच्या प्रतिमेत स्थान दिलं. ही केवळ धार्मिक कल्पनाशक्ती नव्हे; निसर्गाकडे बारकाईने पाहण्याची ही एक सांस्कृतिक दृष्टी होती. म्हणूनच वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने एखाद्या जुन्या मंदिरात गेल्यावर फक्त देवाची मोठी मूर्ती पाहू नका. तिच्या हातात काय आहे, पायाशी काय आहे, मुकुटावर कोणता जीव आहे, भिंतीच्या कोपऱ्यात कोणता प्राणी कोरलेला आहे, हेही पाहा. कदाचित शेकडो वर्षांपूर्वीचा एखादा शिल्पकार त्या छोट्याशा प्राण्यामधून तुमच्याशी संवाद साधत असेल.
आज आपण वन्यजीव संरक्षणाची भाषा अधिवास, जैवविविधता, परिसंस्था आणि संवर्धन अशा वैज्ञानिक शब्दांत करतो. ती अर्थातच गरजेची आहे. पण आपल्या पूर्वजांनी याच निसर्गाला देवांच्या प्रतिमेत स्थान दिलं होतं, हेही विसरता कामा नये. दगडातला हरिण आजही शिवाच्या हातात स्थिर आहे. पण जंगलातला खरा हरिण मोकळेपणाने उडी मारत राहण्यासाठी त्याचं जंगलही जिवंत राहायला हवं.
देवाच्या हातातला हरिण आपण शतकानुशतकं जपला. आता देवाच्या हातात नसलेला, पण आपल्या जंगलात धावणारा हरिण जपण्याची वेळ आपली आहे. कारण मूर्तीतील वन्यजीव आपल्याला निसर्गाची आठवण करून देतात; पण जिवंत वन्यजीव आपल्याला सांगतात की ती आठवण केवळ दगडात नको, तर जंगलातही जिवंत राहायला हवी.
- तुषार म्हात्रे






टिप्पण्या