निऑनच्या लखलखीत दुनियेत
निऑनच्या लखलखीत दुनियेत
नवी मुंबईत रात्री फिरताना एक गंमत लक्षात येते. दिवसा अगदी साधं दिसणारं दुकान रात्री अचानक ‘स्टार’ बनतं. वाशीच्या एखाद्या सेक्टर मधली पाटी असो, सीवूड्समधलं एखादं दुकान असो किंवा बेलापूरच्या रस्त्यावरची एखादी चमचमणारी जाहिरात असो… अंधार पडला की शहराचा स्वभावच बदलतो. दिवसा माणसं दुकान शोधतात आणि रात्री दुकानं माणसांचं लक्ष शोधत फिरतात! लाल, निळा, हिरवा, गुलाबी अशा रंगांत चमकणारी अक्षरं आपल्याला खुणावत असतात. आपण त्याला सहज म्हणतो, ‘निऑन लाईट’. पण या एका शब्दामागे रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि एका फ्रेंच संशोधकाची भन्नाट जिज्ञासा दडलेली आहे. त्या संशोधकाचं नाव जॉर्जेस क्लाऊड. २४ सप्टेंबर १८७० रोजी जन्मलेल्या क्लाऊड यांच्या जन्मदिनानिमित्त या चमचमाटाकडे जरा विज्ञानाच्या चष्म्यातून पाहायला काय हरकत आहे?
सुरुवातीला एक गोंधळ दूर करूया. निऑनचा शोध क्लाऊड यांनी लावलेला नाही. १८९८ मध्ये विल्यम रॅम्झे आणि मॉरिस ट्रॅव्हर्स यांनी या मूलद्रव्याचा शोध लावला. म्हणजे निऑन आधीच पृथ्वीवर होतं; क्लाऊड यांनी त्याला ‘नोकरी’ दिली! हवेचं द्रवीकरण करताना मिळणाऱ्या वायूंच्या अभ्यासातून निऑन वेगळा करण्यात आला. हा वायू निष्क्रिय, रंगहीन आणि वातावरणात अत्यल्प प्रमाणात असतो. पण त्याच्यात एक भारी गुणधर्म होता. बंद काचेच्या नळीत निऑन वायू भरून त्यातून विद्युत्प्रवाह सोडला, की तो लालसर नारिंगी प्रकाशाने उजळतो. क्लाऊड यांनी हाच गुण पकडला. १९१० मध्ये त्यांनी निऑन दिव्याचं सार्वजनिक प्रदर्शन केलं. प्रयोगशाळेत चमकणारी काचेची नळी पाहणाऱ्यांना तेव्हा कदाचित फारसं काय घडलंय असं वाटलं नसेल; पण पुढे याच प्रकाशाने शहरांच्या रात्रीचा चेहरामोहरा बदलला.
क्लाऊड यांची खरी कमाल इथेच होती. ‘नळी चमकते’ एवढ्यावर ते थांबले नाहीत. त्या काचेच्या नळीला अक्षराचा आकार देता येईल का? एखादं नाव लिहिता येईल का? एखादं चिन्ह बनवता येईल का? आणि मग जाहिरातीसाठी त्याचा उपयोग करता येईल का? या प्रश्नांनी प्रयोगाला नवं वळण दिलं. काचेच्या नळ्या वाकवल्या गेल्या, त्यांना अक्षरांचे आकार दिले गेले आणि रात्रीच्या अंधारात दुकानांची नावं चमकू लागली. विज्ञानाने जाहिरातीला उजेड दिला आणि जाहिरातीने विज्ञानाला बाजार दिला! नंतर जगभर निऑन साईन लोकप्रिय झाले. ‘निऑन’ हा शब्दच पुढे चमकदार जाहिरातींचा समानार्थी बनला. अर्थात आज आपण पाहतो त्या प्रत्येक रंगीत पाटीत निऑनच असेल असं नाही. एल.ई.डी.तंत्रज्ञानाने तर या प्रकाशविश्वात मोठीच उलथापालथ केली आहे. तरीही निऑन म्हणजे काय, असं विचारलं की आपल्या डोळ्यांसमोर येतो तो लालसर, चमकता, थोडासा सिनेमॅटिक प्रकाश.
नवी मुंबईत हा प्रकाश पाहताना आणखी एक गंमत जाणवते. ही शहररचना मुळातच नियोजनातून उभी राहिलेली. रुंद रस्ते, सेक्टर, उंच इमारती, मॉल्स, हॉटेल्स आणि रात्री उशिरापर्यंत जाग्या असलेल्या बाजारपेठा. दिवसभराच्या धावपळीनंतर अंधार पडला की या शहराची दुसरी बाजू उजळते. वाशीच्या गर्दीत एखादी चमकती पाटी, पाम बीच रोडवरून जाताना दूरवर दिसणारी इमारतींची रोषणाई किंवा सीवूड्सकडचा रात्रीचा झगमगाट… या सगळ्यात क्लाऊड यांच्या प्रयोगाची आठवण काढावीशी वाटते. आज एलईडीने निऑनची जागा बऱ्याच प्रमाणात घेतली आहे, पण ‘निऑन’ हा शब्द अजूनही प्रकाशाच्या एका विशिष्ट शैलीचं नाव बनून राहिला आहे. अंधारात एखादं पांढरं अक्षर अल्ट्रा व्हॉयलेट प्रकाशात चमकलं तरी आपण त्यालाही निऑन म्हणतो. प्रत्यक्षात अल्ट्रा व्हॉयलेट आणि निऑन यांचं विज्ञान वेगळं आहे. म्हणजेच, प्रकाश दिसतो तो एक; पण त्यामागची गोष्ट अनेक!
२४ सप्टेंबरला जॉर्जेस क्लाऊड यांच्या जन्मदिनी नवी मुंबईच्या रात्रीत चमकणाऱ्या एखाद्या पाटीकडे पाहा. आज तिच्यात एलईडी असेल, आधुनिक तंत्रज्ञान असेल; पण तिच्या मुळाशी आहे तोच प्रश्न… वायूला वीज दिली तर तो प्रकाश देईल का? क्लाऊड यांनी त्या प्रश्नाचं उत्तर शोधलं आणि अंधाराला अक्षरं मिळाली. म्हणून निऑनची खरी ओळख फक्त त्याच्या लखलखाटात नाही; एका साध्या प्रश्नाला प्रयोगाची जोड दिली, की अंधारही उजळतो… ही क्लाऊड यांची खरी देणगी.
_तुषार म्हात्रे



टिप्पण्या