पिठोरी: मातृत्व, स्त्रीशक्ती आणि योगिनी
पिठोरी: मातृत्व, स्त्रीशक्ती आणि योगिनी
श्रावणाची हिरवीगार अमावस्या... अंगणात रांगोळी, समईचा मंद प्रकाश, तांदळाची छोटीशी रास, त्यावर मांडलेल्या सुपाऱ्या आणि पूजेसाठी आणलेली तेरड्याची फुले. घरातील आई आपल्या लेकरांच्या दीर्घायुष्यासाठी मनोभावे पूजा करत असते. बाहेर पावसाच्या सरी कोसळत असतात आणि घराच्या उंबरठ्याआड मातृत्वाची एक वेगळीच प्रार्थना सुरू असते. हीच पिठोरी अमावस्या. लेकरांचे आरोग्य चांगले राहावे, त्यांना दीर्घायुष्य लाभावे, घरात सुखसमृद्धी नांदावी आणि वंशवेल अखंड फुलत राहावी, या भावनेतून अनेक माता या दिवशी उपवास करून पिठोरीची पूजा करतात. काही ठिकाणी जिवतीचीही पूजा केली जाते. पिठोरीशी जोडलेल्या धार्मिक कथांमध्ये आपल्या लेकरांसाठी व्याकूळ झालेल्या मातेची श्रद्धा आणि भक्ती दिसते. या कथा इतिहास म्हणून नव्हे, तर पिढ्यान् पिढ्या जपल्या गेलेल्या लोकश्रद्धा म्हणून पाहिल्या तर त्यांच्या मागची भावनिक शक्ती अधिक चांगली समजते.
पिठोरीच्या पूजेत चौसष्ट योगिनींना विशेष स्थान आहे. तांदळाच्या राशीवर चौसष्ट सुपाऱ्या मांडून किंवा कणकेच्या छोट्या प्रतिमा करून योगिनींचे आवाहन केले जाते. काही परंपरांमध्ये आठ कलश मांडले जातात आणि विविध शक्तिरूपांची पूजा केली जाते. या पूजेत तेरड्याची पात्री ही एक विशेष लोकपरंपरा आहे. तेरड्याची वनस्पती किंवा त्याची फुले आवर्जून आणून ती देवीला अर्पण केली जातात. श्रावणात सर्वत्र पसरलेली हिरवाई, शेतशिवारातील बहर आणि निसर्गाची सर्जनशीलता यांचा या छोट्याशा पात्रीशी एक सुंदर सांस्कृतिक संबंध जाणवतो. आपल्या पूर्वजांनी पूजेत वापरण्यासाठी निसर्गातील वनस्पती निवडल्या आणि त्या धार्मिक परंपरेचा भाग बनल्या. त्यामुळे पिठोरीची पूजा ही केवळ देवपूजा न राहता निसर्गाशी संवाद साधणारी लोकपरंपराही ठरते. खीरपुरी, पुरणपोळी, साटोरी, वडे, वालाचं बिरड, माठाची भाजी अशा घरगुती पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. उत्तर कोकण आणि नवी मुंबई परिसरातील काही कुटुंबांमध्ये आजही या पूजेला एक वेगळाच कौटुंबिक रंग दिसतो. आई नैवेद्याची परडी खांद्यावर घेऊन ‘अतीत कोण?’ असा प्रश्न विचारते आणि मुले आपापली नावे सांगतात. त्या क्षणी विधीपेक्षा आई आणि लेकरांमधील नात्याची ऊब अधिक मोठी वाटते.
चौसष्ट योगिनींची परंपरा भारतीय शाक्त उपासनेतील स्त्रीशक्तीच्या विविध रूपांशी जोडलेली आहे. मात्र चौसष्ट योगिनींची सर्व ठिकाणी तंतोतंत एकच नामावली आढळते, असे म्हणणे योग्य ठरणार नाही. वेगवेगळ्या प्रदेशांतील योगिनी मंदिरांमध्ये त्यांच्या नावांमध्ये, रूपांमध्ये आणि शिल्पशैलीमध्ये फरक दिसतो. ओडिशातील हिरापूरचे चौसष्ट योगिनी मंदिर वर्तुळाकार आणि खुले आहे. तेथील योगिनींची स्वतंत्र देवकोष्ठांमध्ये मांडणी करण्यात आली आहे. मध्य प्रदेशातील भेडाघाट येथील मंदिरातील शिल्परचना वेगळी आहे, तर रणिपूर झरियाल येथे नृत्यमुद्रेतील योगिनींची शिल्पे पाहायला मिळतात. या प्राचीन मंदिरांच्या स्थापत्यातून योगिनी उपासनेचे महत्त्व आणि तिच्यामागील शक्तिसंकल्पना स्पष्ट होते. त्यामुळे पिठोरीच्या दिवशी तांदळाच्या राशीवर मांडलेल्या चौसष्ट सुपाऱ्या पाहताना त्या केवळ पूजेतील वस्तू न राहता भारतीय संस्कृतीत विविध रूपांनी व्यक्त झालेल्या स्त्रीशक्तीचे प्रतीक म्हणूनही पाहता येतात.
पिठोरी अमावस्या म्हणजे म्हणूनच एका आईची आपल्या लेकरांसाठीची प्रार्थना आहे. पण त्याच वेळी ती निसर्गाशी जोडलेली, स्त्रीशक्तीचा सन्मान करणारी आणि कुटुंबातील नात्यांना घट्ट करणारी लोकपरंपरा आहे. तेरड्याच्या नाजूक फुलापासून चौसष्ट योगिनींच्या व्यापक संकल्पनेपर्यंत आणि आईच्या ओठांवरील लेकरांच्या दीर्घायुष्याच्या प्रार्थनेपासून श्रावणाच्या हिरवाईपर्यंत या सणात अनेक अर्थ एकत्र आले आहेत. काळ बदलला, घरांची रचना बदलली, शहरांचे स्वरूप बदलले, तरी या परंपरेतील मायेचा ओलावा अजूनही तसाच आहे. नवी मुंबईसारख्या आधुनिक शहरातही एखाद्या घराच्या छोट्याशा कोपऱ्यात तेरड्याची पात्री ठेवून, समई पेटवून, चौसष्ट योगिनींचे स्मरण करत आई आपल्या लेकरांकडे प्रेमाने पाहते. तेव्हा जाणवते, परंपरा केवळ भूतकाळाची खूण नसते; ती वर्तमानाला आपल्या मुळांशी जोडणारी एक जिवंत नाळ असते. आणि पिठोरी अमावस्या म्हणजे त्या नाळीतून आजही वाहत असलेली मातृत्वाची, निसर्गाची आणि स्त्रीशक्तीची पवित्र भावना.
-. तुषार म्हात्रे
टिप्पण्या