सह्याद्रीच्या जखमा : माळीणपासून इर्शाळवाडीपर्यंत...

    ३० जुलै २०१४. पावसाची एक साधी सकाळ. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीण गावात दिवस उगवण्याची चाहूल लागली होती. घराघरांत चुली पेटण्याआधीच डोंगराने एक भीषण उसासा टाकला आणि काही क्षणांत संपूर्ण गाव मातीच्या प्रचंड ढिगाऱ्याखाली गाडले गेले. शेकडो जीव, स्वप्ने आणि आठवणी एका क्षणात काळाच्या पडद्याआड गेल्या.

       या दुर्घटनेला आता बारा वर्षे होत आली. पण प्रत्येक पावसाळ्यात सह्याद्री पुन्हा पुन्हा तोच प्रश्न विचारतो.


आपण माळीणकडून काही शिकलो का?

दुर्दैवाने उत्तर समाधानकारक नाही.


       माळीणपूर्वी महाड जवळील दासगाव आणि माळीणनंतर तळीये, इर्शाळवाडी आणि सह्याद्रीतील अनेक भागांत दरडी कोसळण्याच्या घटना घडतच राहिल्या. प्रत्येक वेळी आपण काही दिवस हळहळ व्यक्त करतो, मदतकार्य करतो आणि नंतर सर्व काही विसरून जातो. मात्र सह्याद्री विसरत नाही. तो आपल्या जखमा दरवर्षी पावसाच्या रूपाने पुन्हा उघड करतो.

दरड कोसळणे ही केवळ नैसर्गिक घटना नाही. ती निसर्ग आणि मानवी हस्तक्षेप यांच्यातील बिघडलेल्या संतुलनाची प्रतिक्रिया आहे. लाखो वर्षांपूर्वीच्या ज्वालामुखीच्या उद्रेकातून निर्माण झालेला दख्खनचा बेसॉल्ट खडक वरून भक्कम दिसतो. पण सततचा पाऊस, तापमानातील बदल आणि नैसर्गिक झीज यामुळे त्यामध्ये सूक्ष्म भेगा तयार होतात. मुसळधार पावसात या भेगांमध्ये पाणी शिरते. मातीचे वजन वाढते, घर्षण कमी होते आणि संपूर्ण उतार अचानक खाली घसरतो. यालाच आपण भूस्खलन किंवा दरड कोसळणे म्हणतो.

      पण आज केवळ निसर्गालाच दोष देता येणार नाही. डोंगर कापून रस्ते बांधणे, उतारांवर अनियोजित बांधकामे, जंगलतोड, खाणकाम, पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहात अडथळे आणि वाढता मानवी हस्तक्षेप यामुळे सह्याद्रीची धरून ठेवण्याची ताकद कमी होत आहे. झाडांची मुळे मातीला घट्ट पकडून ठेवतात. जंगल नाहीसे झाले की डोंगरही हळूहळू असुरक्षित होऊ लागतो.

      हवामान बदलामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. पूर्वी पावसाळाभर पडणारा पाऊस आता काही तासांत कोसळतो. अतिवृष्टीचे प्रमाण वाढत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणातील पाणी माती झेलू शकत नाही. परिणामी भूस्खलनाचा धोका अनेकपटींनी वाढतो. सह्याद्रीतील अनेक गावे आज या बदलत्या हवामानाची मोठी किंमत मोजत आहेत.

      २०२३ मधील इर्शाळवाडीची दुर्घटना हे त्याचेच विदारक उदाहरण आहे. रायगड जिल्ह्यातील हा छोटासा आदिवासी पाडा एका रात्रीत उद्ध्वस्त झाला. बचाव पथके पोहोचेपर्यंत अनेक कुटुंबे मातीखाली गाडली गेली होती. माळीण आणि इर्शाळवाडी यांच्यामध्ये जवळजवळ दशकभराचे अंतर असले, तरी दोन्ही दुर्घटना एकच संदेश देतात. निसर्गाच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करण्याची किंमत अत्यंत महाग असते.

        प्रश्न एवढाच नाही की दरड का पडते. खरा प्रश्न असा आहे की ती पडण्यापूर्वी आपण तिची चिन्हे का ओळखत नाही? डोंगरावर पडलेल्या भेगा, झुकणारी झाडे, अचानक बदललेले झरे, माती सरकण्याच्या खुणा आणि सततची अतिवृष्टी ही सर्व धोक्याची संकेतस्थळे आहेत. त्यांचे वैज्ञानिक निरीक्षण, धोकाग्रस्त गावांचे नकाशे, पूर्वसूचना व्यवस्था आणि वेळेवर पुनर्वसन यांना आज सर्वोच्च प्राधान्य देण्याची गरज आहे.

     सह्याद्री हा केवळ पर्वत नाही. तो महाराष्ट्राच्या नद्यांचा उगम आहे, जैवविविधतेचा खजिना आहे आणि असंख्य गावांचा जीवनदाता आहे. त्याला केवळ संसाधन म्हणून नव्हे तर जिवंत परिसंस्था म्हणून पाहण्याची वेळ आता आली आहे.

      माळीणची आठवण ही केवळ श्रद्धांजली वाहण्यासाठी नसावी. ती प्रत्येक विकासकामाला प्रश्न विचारणारी असावी. प्रत्येक डोंगर कापण्यापूर्वी, प्रत्येक रस्ता खोदण्यापूर्वी आणि प्रत्येक झाड तोडण्यापूर्वी आपण स्वतःला विचारले पाहिजे; या बदलाची किंमत सह्याद्रीला किती मोजावी लागणार आहे?

    कारण सह्याद्री कधीच अचानक कोसळत नाही. तो आधी अनेक वर्षे वेदना सहन करतो. आपण त्या वेदना ऐकत नाही, तेव्हा त्या एका भीषण दरडीच्या रूपाने आपल्या समोर उभ्या राहतात.

      माळीणपासून इर्शाळवाडीपर्यंतचा प्रवास हा केवळ दोन दुर्घटनांचा इतिहास नाही. तो निसर्गाने दिलेल्या इशाऱ्यांचा इतिहास आहे. हे इशारे आजही सुरू आहेत. प्रश्न एवढाच आहे की, यावेळी तरी आपण ते ऐकणार आहोत का?


-. तुषार म्हात्रे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पाचवीला पुजलेली सटी

चुलीवरचे जेवण!

शिलाखंडांचे ताम्रपट