सिद्धेश्वरातील सृष्टीकर्ता ब्रम्हा
सिद्धेश्वरातील सृष्टीकर्ता ब्रम्हा
ठाण्याच्या गर्दीतून थोडं बाजूला वळलं की शहराचं रूप शांत होतं. सिग्नल आणि ट्रॅफिक मागे टाकत सिद्धेश्वर तलावाजवळ पोहोचलं की, वातावरणात एक वेगळी निवांतता जाणवते. त्या तलावालगत असलेलं सिद्धेश्वर राम मंदिर दिसतं आणि मंदिराच्या एका काचेच्या पेटीत एक दुर्मिळ शिल्प उभं आहे, चतुर्मुख ब्रह्मदेवाचं.१९९५ मध्ये हे शिल्प सिद्धेश्वर तलावाजवळ सापडलं. साधारण आठव्या शतकातील ही मूर्ती शिलाहारकालीन कलाशैलीचा उत्तम नमुना मानली जाते. शिल्पाची उंची साधारण साडेचार फूट असून ते काळ्या दगडात कोरलेले आहे. समोर तीन आणि मागे एक अशी ही चतुर्मुख मूर्ती आज भग्न अवस्थेत असली, तरी तिच्या प्रत्येक रेषेत त्या काळातील कलाकौशल्य जाणवतं.
मूर्तीचं चेहरं शांत आणि गंभीर आहे. तीन मुखांतील प्रत्येक भाव वेगळा. एक ज्ञानमग्न, एक स्मितहास्यपूर्ण आणि एक स्थिर. पाठीमागे कोरलेलं चौथं मुख थोडं झिजलेलं आहे, पण त्या झिजेतूनही काळाचा ठसा उमटलेला जाणवतो. शिरावर कोरलेला जटा-मुकुट, कपाळावर रेषा, आणि अंगावरील अलंकार या सर्व गोष्टींमध्ये शिलाहारकालीन दगडी शिल्पकलेची मृदु लय स्पष्ट दिसते.
पायाजवळ कोरलेले हंस ब्रह्मदेवाचे वाहन म्हणून परिचित आहेत. हे दोन्ही हंस नक्षीकामाने सजलेले आहेत आणि मूर्तीला संतुलन देतात. तुटलेल्या हातांमुळे मूळ शस्त्र-आभूषणांची ओळख आज शक्य नाही; तरी मूर्तीची स्थिरता आणि समभंगता या तिच्या मूळ सौंदर्याची झलक देतात.
पुराणांमध्ये ब्रह्मदेवाचे रूप पुढीलप्रमाणे वर्णिले आहे—
“ब्रम्हा कमंडलुधर: कर्तव्य: स चतुर्मुख।
हंसारूढ: क्वचित् कार्य: क्वचिच्च कमलासन:।।
वर्णत: पद्मगर्भाभश्चतुर्बाहु: शुभेक्षण:।
कमंडलुं वामकरे स्रुवं हस्ते तु दक्षिणे।।”
या वर्णनानुसार चतुर्मुख, चतुर्भुज ब्रह्मदेव वामहस्तात कमंडलू, दक्षिणहस्तात स्रुवा (आहुती देण्यासाठीची पळी), आणि उर्वरित दोन हातात वेद व माला धारण करणारा दाखवला जातो. सामान्यत: ब्रह्मदेवाच्या मूर्तींना जटा-मुकुट किंवा किरीटमुकुट असतो, पायाशी हंस, आणि बाजूला सावित्री किंवा ऋषी दाखवले जातात.
ठाण्यातील सिद्धेश्वरातील मूर्ती भग्न असल्याने ही सर्व वैशिष्ट्ये आज स्पष्टपणे दिसत नाहीत. तरी तिच्या आकृतीत, मुखरचनेत आणि आभूषणातील नाजूकतेत त्या पुराणवर्णनातील ‘निर्मात्या’चा भाव उमटतोच. दाढीचा हलकासा आकार, उंच मुकुट आणि लयबद्ध अंगरचना ही वैशिष्ट्ये मात्र अजूनही स्पष्ट जाणवतात.
भारतात ब्रह्मदेवाची मंदिरे अत्यल्प आहेत. पुष्कर (राजस्थान), ब्रह्मा कर्मळी (गोवा), कुंभकोणम, कुल्लू आणि तिरुपत्तूर ही काही थोडकी ठिकाणे. महाराष्ट्रात अशा मूर्ती फार विरळ सापडतात. नालासोपाऱ्याच्या चक्रेश्वर मंदिराजवळची ब्रम्हदेवाची अपूर्ण मूर्तिही खूप सुंदर आहे.
त्याचबरोबर अंबरनाथच्या शिवमंदिरावर अनेक ठिकाणी ब्रम्हदेवाचे अंकन आहे. या सर्व शिल्पकृतीचा विचार पाहता ठाण्यातील ही मूर्ती विशेष ऐतिहासिक आणि कलात्मक महत्त्वाची ठरते.
या शिल्पाकडे पाहताना जाणवतं की सृष्टीचा निर्माता दगडात स्थिर झाला आहे, पण त्याची निर्मिती अजूनही जिवंत आहे. या मूर्तीच्या चेहऱ्यावरचं शांत स्मित, जटांतील गुंफण, आणि पायाशी विसावलेले हंस हे सर्व सांगतात की सृष्टी आणि शांती यांचा मिलाफ हाच खरी निर्मितीची ओळख आहे.
काचेआड उभी असलेली ही मूर्ती फक्त पुरातन काळाचा पुरावा नाही, तर ठाण्याच्या सांस्कृतिक चेतनेचा आरसा आहे. झीजलेली असली तरी ती अजूनही काहीतरी सांगते
की सृष्टीची निर्मिती थांबत नाही, ती सतत रूपांतर घेत राहते.
— तुषार म्हात्रे
संदर्भ: भारताची मूर्तीकला – पं. महादेवशास्त्री जोशी
या शिल्पाकडे पाहताना जाणवतं की सृष्टीचा निर्माता दगडात स्थिर झाला आहे, पण त्याची निर्मिती अजूनही जिवंत आहे. या मूर्तीच्या चेहऱ्यावरचं शांत स्मित, जटांतील गुंफण, आणि पायाशी विसावलेले हंस हे सर्व सांगतात की सृष्टी आणि शांती यांचा मिलाफ हाच खरी निर्मितीची ओळख आहे.
काचेआड उभी असलेली ही मूर्ती फक्त पुरातन काळाचा पुरावा नाही, तर ठाण्याच्या सांस्कृतिक चेतनेचा आरसा आहे. झीजलेली असली तरी ती अजूनही काहीतरी सांगते
की सृष्टीची निर्मिती थांबत नाही, ती सतत रूपांतर घेत राहते.
— तुषार म्हात्रे
संदर्भ: भारताची मूर्तीकला – पं. महादेवशास्त्री जोशी






टिप्पण्या