महाराष्ट्रातील शेतीचा प्रवास
महाराष्ट्राच्या इतिहासात किल्ले, लेणी, राजे आणि युद्धांची जितकी चर्चा होते, तितकीच चर्चा शेतीची व्हायला हवी. कारण महाराष्ट्राचा इतिहास समजून घ्यायचा असेल, तर तो शेताच्या बांधावर उभे राहिल्यास अधिक चांगल्या रीतीने समजू शकतो. आज आपल्या ताटात येणाऱ्या प्रत्येक घासामागे हजारो वर्षांचा अनुभव, प्रयोग आणि संघर्ष दडलेला आहे.
मानवाने आयुष्याची सुरुवात शेतकरी म्हणून केलेली नव्हती. तो जंगलात भटकणारा, शिकार करणारा आणि कंदमुळे, फळे गोळा करून जगणारा होता. त्या काळात निसर्ग उदार होता. लोकसंख्या कमी असल्यामुळे जंगलातून मिळणारे अन्न पुरेसे होते. पण हळूहळू लोकसंख्या वाढू लागली. उपलब्ध अन्न कमी पडू लागले. तेव्हा माणसाला एक मोठा प्रश्न पडला. अन्न शोधत फिरायचे की अन्न स्वतः निर्माण करायचे? या प्रश्नातूनच शेतीचा जन्म झाला असावा. जगात सुमारे दहा ते आठ हजार वर्षांपूर्वी नवाश्मयुगात शेतीची सुरुवात झाली, असे पुरातत्त्वीय पुरावे सांगतात.
शेतीचा शोध हा एका दिवसात लागलेला नव्हता. सर्वप्रथम माणसाने प्राणी पाळायला सुरुवात केली. मेंढ्या, शेळ्या, गायी, बैल आणि नंतर इतर प्राणी पाळले गेले. शिकारीसाठी उपयोगी पडणारे प्राणी हळूहळू कुटुंबाचा भाग बनले. त्यानंतर जंगली गवतांपासून गहू, बार्ली आणि इतर धान्यांची लागवड सुरू झाली. बियाणे जमिनीत पडले की पुन्हा रोपे उगवतात, हा साधा पण क्रांतिकारक शोध मानवाच्या आयुष्याला कायमचा बदलून गेला.
शेतीमुळे माणूस एका ठिकाणी स्थिर झाला. भटकंती कमी झाली. गावांची निर्मिती झाली. धान्य साठवण्याची गरज निर्माण झाली. सुरुवातीला वाळलेल्या भोपळ्यांचा, टोपल्यांचा वापर झाला. नंतर मातीची भांडी तयार झाली. झोपड्या उभ्या राहिल्या. दगडी आणि नंतर घासून धारदार केलेली अवजारे तयार झाली. कुऱ्हाड, छिन्नी, विळ्यासारखी साधने निर्माण झाली. या साधनांमुळे जंगल साफ करणे, शेती करणे आणि घरे बांधणे सोपे झाले.
हा बदल फक्त पश्चिम आशियापुरता मर्यादित राहिला नाही. त्याचे पडसाद भारतातही उमटले. महाराष्ट्रात नवाश्मयुगीन आणि ताम्रपाषाणकालीन अनेक स्थळांमधून शेतीचे पुरावे मिळतात. गोदावरी, भीमा, कृष्णा, तापी, वैनगंगा आणि त्यांच्या उपनद्यांच्या खोऱ्यांत मानवी वस्ती वाढू लागली. नदीकाठची सुपीक जमीन लागवडीसाठी निवडली गेली. पावसावर आधारित शेती ही महाराष्ट्राची ओळख बनली.
महाराष्ट्रातील शेतीचा पुरातत्त्वीय इतिहास नेवासा, इनामगाव, दायमाबाद, सोनगाव, चांडोली, जोर्वे अशा अनेक उत्खननांतून स्पष्ट होतो. येथे गहू, बार्ली, बाजरी, ज्वारी, कडधान्ये आणि कापूस यांच्या लागवडीचे पुरावे मिळाले आहेत. बैलांच्या साहाय्याने शेती केली जात होती. धान्य साठवण्यासाठी कोठारे, मातीची मोठी रांजणे आणि दळणासाठी जाती यांचाही वापर होत होता. या सर्व गोष्टींमुळे महाराष्ट्रातील शेती हजारो वर्षांपासून विकसित होत गेल्याचे दिसून येते.
पुढे सातवाहनांच्या काळात शेती आणि व्यापार यांचे नाते अधिक मजबूत झाले. अतिरिक्त उत्पादनामुळे बाजारपेठा विकसित झाल्या. कापूस, धान्य, तीळ आणि इतर कृषीमालाचा व्यापार देशांतर्गतच नव्हे तर परदेशांशीही होत होता. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी केवळ स्वतःचे पोट भरले नाही, तर संपूर्ण अर्थव्यवस्थेला आधार दिला.
मध्ययुगात तलाव, विहिरी, बंधारे आणि पाट यांमुळे सिंचन वाढले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात रयतेच्या हिताला प्राधान्य देणारी धोरणे राबवली गेली. शेतकऱ्यांचे संरक्षण आणि शेतीचे संवर्धन हे राज्यकारभाराचे महत्त्वाचे उद्दिष्ट मानले गेले. पुढे ब्रिटिश काळात महसूल व्यवस्था बदलली, पण त्याचा सर्वाधिक परिणाम शेतकऱ्यांवर झाला.
आजचा महाराष्ट्र आधुनिक तंत्रज्ञान, ठिबक सिंचन, सुधारित बियाणे, यांत्रिकीकरण आणि कृषी संशोधनामुळे बदलत आहे. मात्र या आधुनिक शेतीची मुळे त्या आदिमानवाच्या जिज्ञासेत आहेत, ज्याने हजारो वर्षांपूर्वी एक बी जमिनीत टाकले आणि त्यातून उगवलेले रोप पाहून भविष्याचा मार्ग शोधला.
म्हणूनच महाराष्ट्रातील शेतीचा इतिहास हा केवळ पिकांचा इतिहास नाही. तो माणसाच्या जिद्दीचा, निरीक्षणशक्तीचा आणि निसर्गाशी जुळवून घेत जगण्याच्या बुद्धीचा इतिहास आहे. आजही शेतकरी मातीत बी पेरताना हजारो वर्षांची तीच परंपरा पुढे नेत असतो. बदलली आहेत अवजारे, बदलले आहे तंत्रज्ञान, पण मातीवरचा विश्वास आणि नव्या उमेदीने उगवणाऱ्या अंकुराची आशा आजही तितकीच जिवंत आहे. तीच महाराष्ट्राच्या कृषीसंस्कृतीची खरी ओळख आहे.
- तुषार म्हात्रे




टिप्पण्या