उत्खनन : मातीच्या थरांत दडलेला इतिहास
माणसाची स्मरणशक्ती मर्यादित असते. पण मातीची स्मरणशक्ती विलक्षण असते. ती हजारो वर्षांच्या घटना, संस्कृती, व्यापार, राजकारण आणि माणसांच्या जीवनपद्धती आपल्या थरांमध्ये जपून ठेवते. या स्मृती वाचण्याचं काम उत्खनन करतं. त्यामुळे उत्खनन म्हणजे केवळ खणकाम नव्हे, तर भूतकाळाशी साधलेला वैज्ञानिक संवाद आहे.
आज पुरातत्त्वशास्त्रात उत्खनन ही अत्यंत शिस्तबद्ध प्रक्रिया मानली जाते. परंतु सुरुवातीच्या काळात उत्खननाचा उद्देश अनेकदा केवळ मौल्यवान वस्तू मिळवणे इतकाच होता. बॅबिलोनचा राजा नबोनिडस याने इ.स.पूर्व सहाव्या शतकात मंदिराच्या पायाचे उत्खनन केल्याची नोंद इतिहासात आढळते. पुढे इजिप्त, मेसोपोटेमिया, ग्रीस आणि भारतातील उत्खननांनी पुरातत्त्वशास्त्राला नवी दिशा दिली. भारतात सर जॉन मार्शल यांनी हडप्पा आणि मोहेंजोदडोच्या उत्खननातून सिंधू संस्कृती जगासमोर आणली आणि भारतीय इतिहासालाच नवं परिमाण मिळालं.
उत्खननाची सुरुवात कुदळ किंवा फावड्याने होत नाही. ती नियोजनाने होते. कोणते स्थळ निवडायचे, किती क्षेत्रात उत्खनन करायचे, प्रत्येक स्तराची नोंद कशी ठेवायची, सापडलेल्या वस्तूंचे दस्तऐवजीकरण कसे करायचे, याचा सविस्तर आराखडा आधी तयार केला जातो. कारण उत्खनन ही अशी प्रक्रिया आहे की एकदा मातीचा थर बाजूला गेला की तो पुन्हा पूर्ववत करता येत नाही. म्हणून प्रत्येक क्षण, प्रत्येक स्तर आणि प्रत्येक पुरावा अत्यंत काळजीपूर्वक नोंदवावा लागतो.
. पुरातत्त्वशास्त्रात एक महत्त्वाचं तत्त्व मानलं जातं. मातीचा प्रत्येक थर म्हणजे इतिहासाचं एक स्वतंत्र पान. वरचा थर अलीकडच्या काळाचा असतो, तर खालचे थर अधिक प्राचीन काळाचे असतात. या स्तरांचा अभ्यास करून संशोधक एखाद्या वस्तीचा विकास, तिचे बदलते स्वरूप आणि विविध कालखंड निश्चित करतात. त्यामुळे उत्खननात सापडणाऱ्या वस्तूपेक्षा ती कोणत्या स्तरात सापडली, हे अधिक महत्त्वाचं असतं.याच वैज्ञानिक दृष्टिकोनाची प्रचीती अलीकडे घारापुरी अर्थात एलिफंटा बेटावरील उत्खननात आली. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (ASI) आणि डेक्कन कॉलेज यांनी नोव्हेंबर २०२५ ते जून २०२६ दरम्यान केलेल्या उत्खननात दोन महत्त्वाचे ताम्रपट सापडले. त्यापैकी एक त्रैकुटक राजघराण्याशी संबंधित असून दुसरा नवसारीच्या चालुक्यकालीन दानपत्राचा आहे. या ताम्रपटांवरील नोंदींमुळे घारापुरीचा संबंध विविध राजसत्तांशी होता, तसेच हे बेट दुसऱ्या किंवा तिसऱ्या शतकापासून विकसित झालेलं महत्त्वाचं व्यापारी बंदर असल्याच्या मताला नवा आधार मिळाला आहे. अजूनही एका ताम्रपटाचं वाचन सुरू आहे. म्हणजेच माती अजूनही आपली रहस्यं हळूहळू उलगडत आहे.
उत्खननाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यातून मिळणारा प्रत्येक पुरावा स्वतंत्रपणे महत्त्वाचा नसतो; अनेक पुरावे एकत्र आले की इतिहास घडतो. एखादं नाणं, मृद्भांडाचा तुकडा, भिंतीचा पाया, मानवी सांगाडा, ताम्रपट किंवा शिलालेख हे सारे मिळून एका काळाचं वास्तव समोर आणतात. म्हणूनच उत्खननात संयम हा संशोधकाचा सर्वात मोठा गुण मानला जातो.
आज विकासाच्या नावाखाली अनेक प्राचीन स्थळांवर संकट निर्माण होत आहे. अशा वेळी उत्खनन केवळ संशोधनापुरतं मर्यादित राहत नाही, तर सांस्कृतिक वारसा जतन करण्याचं प्रभावी साधन ठरतं. कारण एकदा नष्ट झालेला पुरावा पुन्हा निर्माण करता येत नाही.
घारापुरीतील ताम्रपटांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की इतिहास नेहमी ग्रंथांमध्येच सापडत नाही. तो अनेकदा मातीच्या शांत थरांमध्ये निद्रिस्त असतो. त्याला जागं करण्यासाठी विज्ञानाची शिस्त, संशोधकाची जिज्ञासा आणि संयमाची गरज असते.
उत्खनन म्हणजे भूतकाळ उकरण्याची प्रक्रिया नाही. ती आपल्या संस्कृतीची हरवलेली पानं पुन्हा जोडण्याची कला आहे. मातीचा प्रत्येक थर बाजूला सरकतो, तेव्हा केवळ एखादी वस्तू सापडत नाही; आपल्या इतिहासाचा एक नवा अध्याय जन्माला येत असतो.
-- तुषार म्हात्रे






टिप्पण्या