कशासाठी? पोटासाठी!

 कशासाठी? पोटासाठी!


         जागतिक भूक दिनाच्या निमित्ताने जगभरात उपासमार, कुपोषण आणि अन्नसुरक्षेवर चर्चा होत असताना शहरांच्या रस्त्यांवर एक वेगळंच वास्तव रोज फिरताना दिसतं. ही माणसं कोणत्याही परिषदेत दिसत नाहीत, त्यांच्यावर मोठ्या चर्चाही होत नाहीत. पण शहराच्या अर्थव्यवस्थेचा आणि पुनर्वापराच्या साखळीचा एक शांत भाग म्हणून ती रोज जगत असतात. पहाटेच्या धूसर प्रकाशात, उन्हाच्या चटक्यात किंवा पावसाच्या सरींत, तीनचाकी सायकल ढकलत भंगार गोळा करणारी माणसं शहराच्या कानाकोपऱ्यात फिरताना दिसतात. त्यांच्या सायकलीवर लोखंडाचे तुकडे, प्लास्टिकच्या बाटल्या, जुने वर्तमानपत्र, तुटलेल्या वस्तू आणि त्यासोबत आयुष्याचं ओझंही बांधलेलं असतं.

        नवी मुंबईत सायकल चालवणारे जवळपास सगळेच जण पोटासाठी सायकल चालवत असतात. फरक इतकाच असतो की, एक जण आपले पोट कमी व्हावं म्हणून सायकल चालवत असतो, तर दुसरा आपलं पोट भरता यावं म्हणून. एका बाजूला सकाळी ट्रॅकसूट घालून फिटनेससाठी सायकल चालवणारे चेहरे दिसतात, तर दुसऱ्या बाजूला उन्हातान्हात तीनचाकी सायकलवर भंगार वाहत जगण्याची धडपड करणारी माणसं दिसतात. दोघांच्याही पायांना सायकलची चाकं फिरवत असतात, पण त्या चाकांमागची कारणं मात्र पूर्णपणे वेगळी असतात.

        ही माणसं शहरातल्या कचऱ्याकडे वेगळ्या नजरेने पाहतात. जिथे अनेकांना टाकाऊ वस्तू दिसतात, तिथे त्यांना दिवसाची कमाई दिसते. एखाद्या इमारतीबाहेर पडलेली जुनी खुर्ची, चहाच्या टपरीवर साचलेल्या बाटल्या किंवा बंद दुकानासमोर ठेवलेला तुटका फलक हे त्यांच्यासाठी उपजीविकेचं साधन असतं. शहर झोपेत असतानाच त्यांचा दिवस सुरू झालेला असतो. काहींच्या सायकलीवर लहान स्पीकर लावलेले असतात. “भंगारवाला...!” अशी हाक गल्लीबोळांतून फिरत राहते. त्या आवाजात केवळ व्यवसाय नसतो, तर दोन वेळच्या जेवणासाठीची धडपड दडलेली असते.

या लोकांच्या चेहऱ्यावर फारशा अपेक्षा दिसत नाहीत. त्यांना मोठ्या स्वप्नांची भाषा कदाचित माहित नसते. पण घरात चूल पेटावी, मुलांनी शाळेत जावं आणि दिवस संपताना हातात थोडे पैसे उरावेत एवढी साधी इच्छा मात्र असते. शहरातील अनेक मध्यमवर्गीय घरांमध्ये जुने सामान अडथळा वाटतं, पण भंगार गोळा करणाऱ्यांसाठी तेच जगण्याचा आधार असतो. त्यांच्या हातातल्या काट्यावर वस्तूंचं वजन मोजलं जातं, पण त्या वजनात त्यांचं आयुष्य किती जड झालंय हे कुठेच मोजलं जात नाही.

          उन्हाळ्यात तापलेल्या रस्त्यावरून तीनचाकी सायकल चालवणं सोपं नसतं. पावसाळ्यात भिजलेल्या कागदांना किंमत राहत नाही. तरीही दुसऱ्या दिवशी पुन्हा तीच सायकल रस्त्यावर दिसते. शहराचा कचरा कमी करण्यात आणि पुनर्वापराच्या प्रक्रियेला गती देण्यात या लोकांचा मोठा वाटा असतो. पर्यावरणावर भाषणं करणाऱ्या समाजाने या लोकांकडे मात्र फारसं लक्ष दिलेलं दिसत नाही. प्रत्यक्षात प्लास्टिक, लोखंड, कागद यांचा पुनर्वापर शक्य होण्यात त्यांचं श्रममूल्य मोठं आहे.

काही वेळा या सायकलीवर लहान मुलंही दिसतात. शाळेच्या वयात असलेली ही मुलं आईवडिलांसोबत भंगार गोळा करत फिरतात. शिक्षण आणि बालपण यांच्यामध्ये उपासमारीची भीती उभी राहिली की अनेक स्वप्नं शांतपणे मागे पडतात. शहरात मोठमोठ्या इमारती उभ्या राहत असताना त्यांच्या सावलीत असं एक जगही वाढत असतं, ज्याकडे नजर क्वचितच जाते.

       भंगार गोळा करणाऱ्यांचं आयुष्य हे केवळ गरिबीचं चित्र नाही, तर श्रमाच्या सन्मानाची आठवण आहे. कोणतंही काम लहान नसतं हे वाक्य अनेकदा ऐकायला मिळतं, पण त्याची खरी जाणीव या लोकांकडे पाहिल्यावर होते. त्यांच्या हातांना कचऱ्याचा वास असू शकतो, पण त्या हातांनी शहर स्वच्छ ठेवण्यात योगदान दिलेलं असतं.

       जागतिक भूक दिन आपल्याला केवळ उपासमारीची आकडेवारी सांगत नाही, तर अशा अदृश्य माणसांकडे पाहण्याची संवेदनाही देतो. शहराच्या गोंगाटात तीनचाकी सायकल ढकलत जाणारी ही माणसं जगण्याचा एक कठीण धडा शिकवत असतात. पोटाची भूक माणसाला रोज रस्त्यावर उतरवते, आणि तरीही जगण्याची आशा त्याच्या पायांमध्ये ताकद भरत राहते.


 - तुषार म्हात्रे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पाचवीला पुजलेली सटी

चुलीवरचे जेवण!

शोले आणि ‘सांभा’ दगड