सतीशिळा ते सतीबंदी

 सतीशिळा ते सतीबंदी

      सह्याद्रीच्या परिसरात भटकताना एखादा कोरलेला दगड दिसतो—त्यावर हाताचा ठसा, बांगड्यांची वलये, काही आकृत्या, शिलालेखांचे तुटलेले ओळी. हे केवळ दगड नसतात, तर काळाच्या ओघात गहाळ झालेल्या कथा असतात. अशा दगडांना लोक ‘सतीशिळा’ म्हणतात. पतीच्या मृत्यूनंतर सती गेलेल्या स्त्रीच्या स्मरणार्थ तिच्या कुटुंबीयांनी किंवा गावकऱ्यांनी उभारलेली ही स्मारकशिळा म्हणजे सतीच्या ‘सहगमन’ प्रथेची निःशब्द साक्ष आहे.
  सतीशिळा हा फक्त दगड नाही; तो एका काळाचा, एका समाजाचा आरसा आहे. मध्ययुगीन काळात सती प्रथा व्यापक होती. समाजाने त्याला धर्मरूप दिलं होतं, आणि या प्रथेमुळे असंख्य स्त्रिया जिवंत जळल्या. त्यांच्या स्मरणार्थ उभारल्या गेलेल्या शिळा—त्या स्त्रीच्या सन्मानासह , तिच्या बलिदानाची अभिव्यक्ती बनल्या.
या शिळांचा अभ्यास केवळ ऐतिहासिक नव्हे तर मूर्तिशास्त्रीय दृष्टिकोनातूनही महत्त्वाचा आहे. सतीशिळांवर कोरलेल्या प्रतिमांमध्ये एक विशिष्ट रचना आणि प्रतीकात्मकता दिसते. बहुतेक शिळांवर सती स्त्रीचा उजवा हात उंचावलेला दाखवतात—हा हात ‘आशीर्वाद’ किंवा ‘सन्मान’ याचे प्रतीक मानला जातो. त्या हाताला बांगड्या दाखवलेल्या असतात, म्हणजे ती विवाहित होती हे अधोरेखित होते. काही शिळांवर हाताखाली लहान बालकांची आकृती दिसते, ज्यातून तिच्या मातृत्वाची कल्पना येते. काही ठिकाणी संपूर्ण स्त्रीप्रतिमा कोरलेली असते—डोक्यावर वस्त्र , मागे अग्निज्वाला किंवा चितेचे रेखाटन, आणि बाजूला पुरूषाची प्रतिमा. अशा दृश्यात्मक रचनेतून त्या काळातील शिल्पकलेची शैलीही स्पष्ट होते. सतीशिळांवरील शिलालेखांत कधीकधी सतीचे नाव, तिच्या पतीचे नाव, आणि घटनेची तारीखही नोंदलेली असते. या शिलालेखांमुळे इतिहासाला अचूक कालमापनाची दिशा मिळते.

   महाराष्ट्रात सतीशिळा विशेषतः रायगड, सातारा, पुणे, सोलापूर, कोकण किनाऱ्यावर विखुरलेल्या दिसतात. कोकणातील उरण, पेण,  माणगाव, महाड या भागात स्थानिकांच्या सांगण्यात अशा काही शिळांचा उल्लेख आजही आढळतो—मंदिरांच्या प्रांगणात, विहिरीजवळ किंवा वाड्यांच्या कुंपणांत. जरी त्यांची अधिकृत नोंद झालेली नसली, तरी त्या स्थानिक परंपरेचा भाग आहेत. उरणजवळच्या काही गावांत दगडावर कोरलेल्या हाताचे चिन्ह लोक अजूनही ‘सतीमातेची शिळा’ म्हणून ओळखतात.
    भारतीय समाजाच्या दीर्घ इतिहासात स्त्रीचे स्थान विरोधाभासांनी व्यापलेले आहे. पूज्य शक्तीच्या रूपात तिचे गौरवगान झाले, पण वास्तवात तिला प्रथांच्या कैदेत ठेवले गेले. सतीप्रथा ही त्यातील सर्वाधिक भीषण होती. पण या काळातही काही विवेकशील आवाज उमटले. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः आपल्या मातोश्री जिजाबाईंना सती जाण्यापासून रोखलं, हे उदाहरण त्या काळातील धार्मिक परंपरेवर प्रहार करणारे ठरले. पुढे मल्हारराव होळकरांनी आपल्या सुनेला, अहिल्यादेवींना, सती जाण्यापासून थांबवलं. या दोन्ही घटनांनी भारतीय समाजात अंतर्गत सुधारणा आणि विवेकाचे बीज आधीपासूनच होते, हे स्पष्ट झालं.

    परंतु सती प्रथेचा कायदेशीर अंत झाला तो एकोणीसव्या शतकात. राजा राममोहन रॉय यांनी बंगालमध्ये या प्रथेविरुद्ध सामाजिक चळवळ उभारली. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे लॉर्ड विलियम बेंटिंक यांनी ४ डिसेंबर १८२९ रोजी “सती प्रथा प्रतिबंधक कायदा” लागू केला. ब्रिटिश राजवटीसाठी हा निर्णय धोकादायक ठरू शकला असता, पण राममोहन रॉय यांच्या दृढ भूमिकेमुळे सतीसारख्या अमानवी प्रथेचा अंत झाला.
आज त्या सतीशिळा ज्या एकेकाळी स्त्रीच्या बलिदानाचे प्रतीक मानल्या गेल्या, त्या इतिहासाच्या पायथ्याशी उभ्या राहून मौनपणे सांगतात की हा प्रवास अग्निपरीक्षेपासून आत्मसन्मानापर्यंतचा आहे.

आजचा हा दिवस म्हणजे त्या राखेतून उगवलेला प्रकाश. सतीशिळांवरील कोरीव हात आजही आपल्याला सांगतो स्त्रीच्या सन्मानाचा प्रवास कधीही दगडात कोरलेला थांबत नाही; तो काळाच्या प्रत्येक पिढीत पुन्हा उभा राहतो.

- तुषार म्हात्रे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पाचवीला पुजलेली सटी

चुलीवरचे जेवण!

शोले आणि ‘सांभा’ दगड