गायत्री आणि सविता
गायत्री आणि सविता
उन्हाळा यंदा अक्षरशः अंगाची लाही लाही करणारा ठरतो आहे. सकाळीच सूर्य डोक्यावर आल्यासारखा भासतो. दुपारी रस्त्यावरून चालताना पायाखालची जमीन तापलेली जाणवते आणि एखादी सावली म्हणजे जणू वरदान वाटते. पण या कडक उन्हातही एक गोष्ट सतत जाणवत राहते, सूर्याशिवाय जीवन नाही. झाडांच्या पानांपासून माणसाच्या श्वासापर्यंत सर्व काही कुठेतरी सूर्याशी जोडलेले आहे. म्हणूनच वैदिकांनी सूर्याला केवळ आकाशातील तेजस्वी गोळा म्हणून पाहिले नाही. त्यांनी त्यामागे कार्यरत असलेल्या दिव्य चेतनेचा अनुभव घेतला.
त्या चेतनेचे नाव आहे, सविता.
आपण रोज म्हणत असलेला प्रसिद्ध गायत्री मंत्र हा प्रत्यक्षात सविता देवतेला उद्देशून आहे.
ॐ भूर्भुवः स्वःतत्सवितुर्वरेण्यंभर्गो
देवस्य धीमहिधियो यो नः प्रचोदयात् ॥
या मंत्राचा अर्थ साधा पण अत्यंत गूढ आहे.
“त्या श्रेष्ठ, तेजस्वी सविता देवतेच्या दिव्य प्रकाशाचे आम्ही ध्यान करतो. तो प्रकाश आमच्या बुद्धीला प्रेरणा देवो.”
महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘गायत्री’ हे मूळ देवतेचे नाव नाही. गायत्री हा एक वैदिक छंद आहे. तीन चरण आणि प्रत्येक चरणात आठ अक्षरे अशी त्याची रचना असते. या विशिष्ट छंदरचनेत हा मंत्र बांधलेला असल्यामुळे तो ‘गायत्री मंत्र’ म्हणून ओळखला जाऊ लागला. प्रत्यक्षात या मंत्राची देवता म्हणजे सविता. त्यामुळे गायत्री मंत्र म्हटले की आपण सूर्याच्या मागील त्या चेतनाशक्तीचे स्मरण करत असतो.
सविता म्हणजे जो प्रेरणा देतो, सृष्टीला गती देतो, चेतना जागवतो. आपल्याला दिसणारा सूर्य म्हणजे रवि. पण त्या रविमागची मूळ उर्जा म्हणजे सविता. प्रकाश आणि उर्जा नसती तर हे जग अस्तित्वातच आले नसते, ही भावना वैदिक काळात होती. म्हणून सूर्याची उपासना ही केवळ धार्मिक कृती नव्हती, तर जीवनाच्या मूळ स्रोताबद्दल व्यक्त केलेली कृतज्ञता होती.
भारतीय परंपरेत सूर्याचे अनेक मंत्र आहेत. त्यातील आणखी एक सूर्य गायत्री मंत्र असा आहे,
ॐ भास्कराय विद्महे महद्युतिकराय धीमहि।
तन्नो आदित्यः प्रचोदयात्।।
“आम्ही तेजस्वी भास्कराला जाणतो. त्या महान तेजाचे चिंतन करतो. तो आदित्य आम्हाला प्रेरणा देवो.”
येथील ‘आदित्य’ या शब्दामागेही एक वैदिक कथा आहे. महर्षी कश्यप यांच्या अदिती, दिती, दनू, विनता, कद्रू अशा अनेक पत्नी होत्या. अदितीच्या पुत्रांना ‘आदित्य’ म्हटले गेले. सूर्य हा त्यातील प्रमुख. म्हणून सूर्याला ‘आदित्य’ हे नाव प्राप्त झाले.
आज ‘दैत्य, ‘दानव’, ‘असुर’ हे शब्द ऐकले की डोळ्यासमोर भयानक रूप उभे राहते. पण वैदिक अर्थ अधिक सूक्ष्म आहे. देवत्व म्हणजे सत्य, संयम, न्याय आणि धर्माचा मार्ग स्वीकारणारे. तर असुर म्हणजे केवळ उपभोग, स्वार्थ आणि शक्ती यांत अडकून राहणारे. हा संघर्ष प्रत्यक्षात बाहेरचा नसून माणसाच्या मनात चालणारा आहे. प्रत्येकाच्या आत देवत्वही आहे आणि असुरत्वही.
भारतीय कलेमध्ये सूर्याचे रूप अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने विकसित झाले. सुरुवातीला सूर्याचे प्रतीक म्हणून चक्र, कमळ आणि सुवर्ण गोलक वापरले जात. पुढे बोधगया, भाजे लेणी, कोणार्क, पट्टडक्कल, हळेबीडू अशा ठिकाणी सूर्याच्या सुंदर प्रतिमा निर्माण झाल्या. सात घोड्यांच्या रथावर आरूढ झालेला सूर्य, मागे प्रभामंडल, हातात कमळे आणि पुढे सारथी अरुण; ही प्रतिमा भारतीय संस्कृतीत खोलवर रुजलेली आहे.
सात घोडे म्हणजे सात दिवस, सात रंग किंवा जीवनातील सात ऊर्जा यांचे प्रतीक मानले जाते. कमळ हे ज्ञान आणि शुद्धतेचे प्रतीक. रथ म्हणजे काळाची अखंड गती. म्हणून सूर्याची मूर्ती ही केवळ देवतेची प्रतिमा नसून संपूर्ण जीवनतत्त्वज्ञानाचे रूपक आहे.
आज आपण धर्माला अनेकदा विधी आणि दिखाव्यात अडकवून ठेवतो. पण वैदिक विचार वेगळे सांगतात. देवाला सोन्याचे मुकुट नको असतात, त्याला मनातील भाव हवा असतो. प्रामाणिकपणा, सेवा, श्रद्धा आणि अंतर्मनातील शांतता हीच खरी उपासना. सध्याच्या काळात सूर्याची उपासना म्हणजे बाहेरच्या सूर्याला नमस्कार करण्यापेक्षा स्वतःच्या आतल्या प्रकाशाला जागवणे अधिक महत्त्वाचे ठरते.
सकाळी शांतपणे उगवणारा सूर्य रोज एक गोष्ट शिकवतो; प्रकाश स्वतःसाठी नसतो, तो इतरांसाठी असतो. आणि म्हणूनच वैदिकांनी सविता देवतेला ‘प्रेरणा’ मानले असावे. गायत्री मंत्र म्हटला की मन नकळत त्या तेजाकडे, त्या शांततेकडे आणि स्वतःच्या अंतर्मनातील प्रकाशाकडे वळते.
- तुषार म्हात्रे





टिप्पण्या