सावित्री समजून घेताना

सावित्री समजून घेताना तब्बल चौदाशे मीटर उंचीवरून ती येते. येते कसली?कोसळतेच! महाबळेश्वर येथील ‘क्षेत्र महाबळेश्वर’ मंदिरातून ज्या पाच नद्यांचा उगम होत असल्याचे मानले जाते. ती यापैकीच एक. कृष्णा, वेण्णा, कोयना या तिच्या इतर मैत्रिणी वेगळ्या दिशेने वळत असताना, ती मात्र गायत्री या सवतीसंगे दुसरीकडेच तोंड वळवते. तिचा या सवतीसोबतचा संसारही फार काळ चालत नाही. महाबळेश्वरच्या आर्थर सीट या ‘सनराईझ’ पॉईंटजवळ सुरू झालेला हा प्रवास बाणकोटच्या ‘सनसेट’ स्थळी येऊन थांबतो. आर्थरच्या दु:खद आठवणींशी जोडलेल्या या माऊलीचे नाव ‘सावित्री’. ‘आर्थर सीट’ मधील आर्थर हा अठराव्या शतकात पुणे दरबारातील रेसिडेंट पदावर असणाऱ्या सर चार्ल्स मॅलेट या अधिकाऱ्याचा मुलगा. मुंबईहून महाबळेश्वरला जाण्यासाठी त्याने मुंबई ते बाणकोट या जलमार्गाची निवड केली. या प्रवासात आर्थर सोबत त्याची पत्नी सोफीया आणि एक महीन्याची मुलगी एलेन होती. या प्रवासादरम्यान आलेल्या वादळाने बोटीवरील १३ खलाशांसह सोफीया आणि चिमुकल्या एलेनचा करूण अंत झाला. बाणकोट येथील हिंमतगडाच्या खालच्या बाजूला मायलेकींना दफन करण्यात आल...