Search This Blog

Friday, June 12, 2020

शरभाचे सांगणे



शरभाचे सांगणे : शोध आवरे किल्ल्याचा

         उन्हाळ्याचे दिवस संपत आलेले, सूर्य मावळतीकडे झुकलेला. “जावं की न जावं?” अशी द्वीधा मनस्थिती झालेली. समोर डोंगर व्यापून पसरलेला विशाल वटवृक्ष, त्याच्या एकमेकांत गुंतलेल्या पारंब्या हात पसरून आम्हाला येण्याचं आमंत्रण देत होते. तर दुसरीकडे आकाशकंदीलांप्रमाणे लटकणारी मधमाशांची पोळी भिती निर्माण करत होती. आम्ही उभे असलेल्या जागीसुद्धा अधून मधून मधमाशा घोंगावत जात होत्या. 
विशाल वटवृक्ष

मधमाशा सगळ्यांना चावत नाहीत, ज्याला चावतात त्यालाच चावतात!
   काही दिवसांपूर्वीच ऐकलेले एका सहकारी मित्राचे  शब्द आठवले. मला यापूर्वी चार वेळा या मधमाशांचा(की वधमाशांचा?) प्रसाद मिळालेला. त्यामुळे ‘ज्याला चावतात त्यालाच चावतात’ हे वाक्य डेली सोपच्या कानठळ्या बसवणाऱ्या संवादांसारखे कानात घुमत होते.
वटवृक्षाचे अंदाजित केंद्र
पण सोबतीला असलेल्या काकाने होकार दिला, आणि दोघेही वडाच्या आतील भागाकडे निघालो. वाटेत मधाचे पोळे पडले होते, बहुधा मध गोळा करणाऱ्यांकडून ते टाकले गेले असावेत. मूळ-पारंब्या-खोड यातील फरक कळणार नाही इतपत हा वृक्ष एकरूप झालेला, त्यातच संध्याकाळ झालेली. एक दोन मधमाशा डोक्याजवळून गेल्या. धीर करून या सुमारे हजार चौरस मीटर परिसरात पसरलेल्या वृक्षाच्या केंद्रापर्यंत पोहोचलो. चप्पल बाजूला काढून दगडांच्या आडोशाला बसलेल्या शेंदूरविलेपित ‘वाघेश्वराला’ नमस्कार केला. वटवृक्षाचे गूढ सौंदर्य एकवार न्याहाळले आणि दूर अंतरावर आमच्या दोघांची वाट बघत असलेल्या कुटूंबकबिल्याच्या दिशेने निघालो.
वाघेश्वर (शरभ शिल्प)

       उरण तालुक्यातील आवरे गावाच्या दक्षिणेला असणारे सुप्रसिद्ध ‘बामून देव’ मंदिर आणि त्याच्या समोरील टेकडीवरचा हा वटवृक्ष. या टेकडीला इथले स्थानिक ‘किल्ला’ म्हणतात.(काही नागरिकांच्या मते त्याचे नाव मर्दनगड आहे.) जिल्हा गॅझेटिअर्स किंवा तत्सम प्रकारच्या कोणत्याही दप्तरी नोंद नसलेला हा किल्ला.
बांधणीचे दगड
केवळ बांधणीच्या दगडांची रास आणि कच्च्या पायाचे अस्तित्व शिल्लक असलेल्या या टेकडीला किल्ला तरी म्हणावे का असा प्रश्न पडतो.
दगडांची रास
पण या कच्च्या पायाजवळ उभे राहील्यास मुंबई- करंजा-अलिबाग हा संपूर्ण समुद्री मार्ग एका नजरेत दिसतो. त्यादृष्टीने पाहील्यास हे ठिकाण टेहेळणीच्या दृष्टीने सर्वोत्कृष्ट ठरते. या टेकडीवरील किल्ला अथवा टेहळणी बुरूजाच्या अस्तित्वाला या टेकडीवरच्या ‘वाघेश्वराने’ दुजोरा दिला. वटवृक्षाच्या अंधाऱ्या छायेत विसावलेला हा ‘वाघेश्वरच’ आवरे किल्ल्याच्या इतिहासाला प्रकाशात आणण्याचे काम करू शकेल.

कच्चा पाया
वाघाचे शिल्प म्हणून वाघेश्वर, अशा अर्थाने हे ग्रामदैवत पुजले जाते. कोरीव वाघ अथवा सिंहसदृश प्राणी असणारे हे शिल्प सामान्यत: ‘शरभ’ म्हणून ओळखले जाते.

आता शरभ म्हणजे काय, ते जाणून घेऊ!

     शरभ हे एक द्वारशिल्प आहे. गड, मंदिरे, सभामंडप यांच्या प्रवेशद्वारांवर शिलालेखांच्या बरोबरीने द्वारशिल्प लावलेली असतात.महाराष्ट्रातील किल्ल्यावर सर्वात मोठय़ा प्रमाणावर आढळणारं द्वारशिल्प म्हणजे शरभ.
शरभ शिल्प
रायगड जिल्ह्यातील कर्नाळा, सुधागड, जंजिरा, रायगड या किल्ल्यांवर शरभ शिल्प आढळते. अगदी श्रीलंकेच्या राष्ट्रध्वजावरील चिन्हही शरभच आहे. सिंह आणि व्याल यांच्यासारखे विक्राळ तोंड, चार पाय आणि लांब शेपटी असणारा काल्पनिक प्राणी म्हणजे शरभ. 
गड, कोट व दुर्गांच्या बांधणीविषयक ग्रंथांमध्ये शरभ शिल्पांची फारशी माहिती दिलेली नाही. परंतु ‘कामिकागम’,‘ उत्तरकामिकागम’, ‘श्रीतत्वनिधी’ आणि ‘शरभोपनिषद’ या ग्रंथांत शरभाचे वर्णन आणि त्याची उपासना केल्याने होणारे फायदे दिलेले आहेत.शरभ हा शंकराचा अवतार मानला जातो. भगवान शंकराने धारण केलेले काल्पनिक रूप म्हणजे शरभ. शरभ संकल्पनेबद्दल अनेक कथा ऐकवल्या जातात. त्यापैकी एक म्हणजे, हिरण्यकश्यपू वधासंदर्भातली.
नरसिंह अवतार
       “हिरण्यकश्यपू हा शंकराचा भक्त. भगवान विष्णूने नरसिंहाचे रूप धारण करून हिरण्यकश्यपूला मारले. पण या वधानंतर नरसिंह उग्र झाला. त्याने लोकांना त्रास द्यायला सुरूवात केली. त्रस्त आणि भयभित लोक भगवान शंकराला शरण गेले. नरसिंहाला नियंत्रित करून त्याला शिक्षा करण्यासाठी शंकराने पशू, पक्षी व नर यांची एकत्रित शक्ती घेतली आणि ते लोकांसमोर प्रकटले. दोन तोंडे, आठ पाय, दोन पंख व लांब शेपूट अशा शरभ रुपातील शंकराने नरसिंहाला फाडले आणि त्याचे कातडे अंगावर पांघरले व त्याचे डोके स्वत:च्या मस्तकावर धारण केले.”
शरभ अवतार

         ‘मूर्तिविज्ञान’ या ग्रंथाचे ग्रंथकार डॉ. ग.ह. खरे यांच्या मते ही कथा विष्णूपेक्षा शिव श्रेष्ठ असे दाखवण्याकरिता रचली गेली असावी. तसेच वरील वरील वर्णनाच्या मूर्त्या महाराष्ट्रात आढळत नसल्या तरी 
शरभ शिल्प
 येथील किल्ल्यांच्या द्वारांवर ‘चार पायांचा, तीक्ष्ण नख्या असलेला विक्राळ तोंडाचा, दोन पंखांचा किंवा पंख नसलेला आणि लांब शेपटीचा प्राणी काढलेला असतो, तो शरभ असावा असेही डॉ.ग.ह.खरे म्हणतात.
वरील सर्व बाबींचा विचार केल्यास, आवरे येथील टेकडीवरचे हे शिल्प शरभाचे आहे हे नक्की. शरभांच्या विविध शिल्पप्रकारांपैकी हा शिल्पप्रकार ‘केवल पंखविहीन शरभ’ आहे.
      आवरे येथील हा परिसर अरबी समुद्राला लागून असून, सध्या भरतीपातळीपासून सुमारे पन्नास ते शंभर मीटर अंतरावर आहे.
समुद्राच्या लाटांनी झिजलेला खडक
या टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या कातळाला समुद्राच्या लाटांनी खड्डे केल्याचे दिसून येते; याचा अर्थ पूर्वीच्या काळी ही टेकडी समुद्राला खेटून होती व कालांतराने समुद्र मागे हटला असावा.(पालघर जिल्ह्यातील केळवे किल्ल्याच्या बाबतीत असा प्रकार घडला आहे.) या  जागेत असलेले बांधणीचे दगड, वाघेश्वर म्हणजेच शरभाचे शिल्प आणि या टेकडीचे भौगोलिक स्थान पाहता ‘आवरे’ गावात संरक्षण व व्यापारीदृष्ट्या महत्त्वपूर्ण असा किल्ला अथवा किल्लासदृश वास्तू होती हे नक्की.
गावातील काही तरूणांनी पुढाकार घेऊन काटे करवंदींच्या झुडूपाआड लपलेल्या या वास्तूची स्वच्छता करून इतिहास संवर्धनाच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकले आहे. आपणही त्यापासून प्रेरणा घेऊया. यापूर्वी ठाणे येथे उत्खननात  सापडलेल्या महाकुमार केशीदेव या शिलाहार राजपुत्राच्या ताम्रपटात आवरे (अऊर) व पिरकोन (पिरकुन) या गावांचा उल्लेख होता.  या परिसराचा अधिक अभ्यास झाल्यास उरण तालुक्याच्या इतिहासात नव्याने भर पडू शकेल
      या परिसराच्या इतिहासाला ‘मधाचा गोडवा’ आहे, पण हा गोडवा मिळवण्याचा मार्ग काट्याकुट्यांनी भरलाय. हा आनंद मिळवण्यासाठी ‘कुतूहलाचा कीडा’ चावावा लागतो. शेेवटी हा कीडासुद्धा त्या मधमाशांप्रमाणेच आहे....
 ज्याला चावतो त्यालाच चावतो!

- तुषार म्हात्रे, पिरकोन (उरण)

संदर्भ: गड-मंदिरांवरील द्वारशिल्पं- महेश तेंडुलकर, मूर्तीविज्ञान- डॉ.ग.ह.खरे, साद सह्याद्रीची भटकंती किल्ल्यांची-प्रा.प्र.के.घाणेकर,
आभार: या शोधमोहीमेत सोबत असणारे प्रविण म्हात्रे, पूरक माहीती देणारे कौशिक ठाकूर, निवास गावंड यांचे आभार.

#शरभ #आवरे #तुषारकी #Sharabh #Aware #tusharki

No comments:

रायगडची लोहयुगीन संस्कृती

रायगडची लोहयुगीन संस्कृती मँडागोरा! ‘पेरिप्लस ऑफ इरिथ्रीयन सी’ या अत्यंत पुरातन आणि महत्त्वपूर्ण दस्ताऐवजांमध्ये नोंदवले गेलेले एक बंद...