कार्ला आणि व्यापारी मार्गावरील मातृदेवता
पावसाळ्याच्या दिवसांत लोणावळ्या नजिकच्या एकविरा आईच्या दर्शनाला जाणाऱ्यांमध्ये लक्षणीय वाढ होते. इथले वातावरण, भाविकांच्या भावना आणि तरूणाईचा जोश या सर्वांच्या परिपाकातून इथली गर्दी निरंतरच असते.
आई एकविरेचे सुप्रसिद्ध मंदिर वेहेरगांव जवळील कार्ले डोंगरात वसले आहे. स्तूपाच्या बाजूला एका लहानश्या गुहेत आईची तांदळा स्वरूपाची मूर्ती आहे. या देवीला वेहेरगावची यमाई, अंबामाता किंवा परशुराममाता रेणुका असेही म्हटले जाते. महाराष्ट्रातील विशेषत:, मुंबई, ठाणे, रायगड, कोकण भागातील कोळी, आगरी, माळी, कुणबी, सोनार, पाठारे, चांद्रसेनीय कायस्थ, ब्राह्मण, प्रभू, चौकळशी, पाचकळशी अशा अनेक समाजांची श्री एकवीरा देवी कुलस्वामिनी असून, श्रद्धास्थानही आहे.
मंदिरावरील एका शिलालेखात इ.स. १७८८ साली मुंबईचे नागा पोसू वरळीकर आणि हरिप्पा चरणवीर यांनी बाबुराव कुलकर्णी यांच्या सहकार्याने जिर्णोध्दार केला असल्याचा पुरावा मिळतो. पेशवे काळात १८१८ पर्यंत पेशव्यांच्या वतीने देवीसाठी मंदिरासमोरच नगार झडत होता. पेशव्यांनी एकविरा देवीच्या दिवाबत्तीची पुजेची सोय केली होती. जनार्दन स्वामी प्रित्यर्थ असा शीलालेख या नगार खान्यात आहे. तसेच मंदिर प्रवेशव्दाराच्या लोखंडी कमानीवर एका घंटेवर इ.स. १८५७ साल असल्याचे दिसते. ही अक्षरे इंग्रजीत कोरलेली आहेत. १८६६ ला या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आल्याचे समजते. थोडक्यात उपलब्ध माहितीवरून हे मंदिर किमान उत्तर-मध्ययुगीन असल्याचे सांगता येईल.
आता येथील सुंदर लेण्यांबद्दल बोलूया. कार्ले लेणी हा १६ बौद्ध लेण्यांचा गट असून त्यात एक अप्रतिम चैत्यगृह व इतर विहार आहेत. इसवी सना पूर्वीचे पहिले शतक ते इसवी सन पाचवे शतक या काळात ही लेणी खोदली गेली आहेत. म्हणजे या बौद्ध लेणी बराच काळ आधी खोदल्या गेल्या असल्याचे आपण म्हणू शकतो. आता थोडे आणखी समजून घेऊया. बौद्ध धर्माची मूळ स्थापना झाली ती भारतात व तो नंतर इतरत्र पसरला. पुढे आठव्या-नवव्या शतकात त्यास उतरती कळा लागली आणि १३ व्या शतकात त्याचा ऱ्हास झाला. तथागतांच्या सम्यक विचारांवर उभा राहीलेला हा धर्म जवळपास ७००-८०० वर्षे अस्तित्वात राहिला आणि आपल्या दुर्दैवाने हा धर्म ज्या भूमीत जन्मला तिथेच लोप पावला. बौद्ध धर्माच्या लोपानंतर बऱ्याचशा लेणी ओसाड पडल्या. अशा ठिकाणी काहीशे वर्षांनी मंदिर उभे राहीले. लेणी-मंदिर यांतील संबंधाचे ससंदर्भ मूळ जाणून घ्यायचे असल्यास बौद्ध धर्मावर अधिकारवाणीने बोलू शकणारे सुप्रसिद्ध संशोधक/लेखक दामोदर धर्मानंद कोसंबी यांच्या ‘पुराणकथा आणि वास्तवता’ या पुस्तकातील काही अंश पाहूया. ‘मातृदेवतांच्या पुजास्थानांचा अभ्यास’ या प्रकरणातील ‘प्रत्यक्ष क्षेत्र संशोधनातील माहिती’, ‘व्यापारी मार्ग’ या मुद्द्यांतर्गत ते म्हणतात... “मातृदेवता असंख्य आहेत, कित्येकींना नाव देखील नसून त्यांचा उल्लेख नेहमी गटानेच होतो. यापैकी मावळाया या जलदेवता प्रसिद्ध आहेत. या शब्दाचा अर्थ ‘लहान आया’ असा होतो. हे नाव या भागात दोन हजार वर्षांहून जास्त काळ परिचित आहे. कारण ‘मामाल-हार’ आणि ‘मामाळे’ ही नावे कार्ले येथील चैत्याच्या दर्शनी भागावर सातवाहन शिलालेखात खोदलेली आहेत, यावरून या भागाला ‘मावळ’ हे नाव खरे पाहता याच पंथावरून मिळाले आहे, असे म्हणता येईल.
क्षैत्रिक संशोधनातून अनपेक्षितपणे असे दिसून आले की, अशा देवस्थानांपैकी अनेक देवस्थाने टेकड्यांच्या लहान उतारांवर आणि माथ्यापेक्षा खोऱ्याच्या जास्त जवळ, परंतु सध्याची वस्ती किंवा पाणवठा यापासून बऱ्याच अंतरावर असतात. कृषिपूर्व काळातील लोकांची स्थिर देवस्थाने त्यांचे नेहमीचे रस्ते एकमेकांस छेदत असत, तेथे तेथे देवाण-घेवाणीपूर्वीच्या मालाच्या अदलाबदलीसाठी, तत्संबंधित समारंभ आणि सामाजिक विधीसाठी, अथवा जेथे अनेक गट आपले नैमित्तिक सुफलतेचे विधी एकत्र साजरे करत, अशाच ठिकाणी असणे आवश्यक होते. यासाठीच मातृदेवतांची मूळ देवस्थाने चौरस्त्यावरच असणे तर्कदृष्ट्या क्रमप्राप्त आहेत. या रस्त्यांचे व्यापारी मार्गात रुपांतर होणे तर्कशुद्ध मानता येईल. अहिंसा आणि शांततापूर्ण सामाजिक व्यवहार यांचा प्रचार करण्यासाठी या प्रदेशांत दूरवर गेलेल्या बौद्ध भिक्षूंनीही सुरूवातीला हेच मार्ग वापरले असणे साहजिक आहे. त्यांच्या धर्माज्ञेनुसार रक्तबळींचा वापर थांबविणे आवश्यक होते आणि त्या प्रचारासाठी ही देवस्थाने याच सर्वात महत्त्वाच्या जागा होत्या. म्हणून ही देवस्थाने आणि उघडपणे मोठ्या व्यापारी मार्गाच्या छेदनबिंदजवळ असणारी महत्त्वाची बौद्ध लेणी यांचा काही दृश्य संबंध असणे आवश्यक आहे व अन्नोत्पादन सर्रास होऊ लागल्यानंतर झालेल्या मार्गातील बदलानंतरही तो संबंध पूर्णपणे नष्ट होत नाही. बौद्ध धर्माला, सुरूवातीच्या काळात वैदिक पशुबळींच्या वाढत्या प्रचंड संख्येविरूद्ध केलेल्या निषेधामुळेच, आर्थिक यश मिळाले होते.
बुद्ध लेणी ओसाड पडल्यानंतर त्यात प्राचीन दैवतांची पुन्हा स्थापना झाली. तथापि, बौद्धधर्माच्या खुणा पूर्णपणे बुजलेल्या नाहीत. कार्ले येथे यमाईच्या ‘प्रतिनिधी’ देवतेला पशुबळी फक्त दाखवला जातो. परंतु त्याचा वध बऱ्याच दूर अंतरावर करावा लागतो.”
प्रथा, परंपरा कोणत्याही असोत. काळाप्रमाणे त्यात बदल होणे अपेक्षितच असते. संस्कृती आणि कला यांचा आदर राखून या परंपरा जतन करणे इष्ट ठरेल.
Comments