Search This Blog

Thursday, July 27, 2023

सावित्री समजून घेताना


सावित्री समजून घेताना
(मुंबई सकाळ, रायगड टुडे 27 जुलै 2019)

    तब्बल चौदाशे मीटर उंचीवरून ती येते. येते कसली?कोसळतेच! महाबळेश्वर येथील ‘क्षेत्र महाबळेश्वर’ मंदिरातून ज्या पाच नद्यांचा उगम होत असल्याचे मानले जाते.
ती यापैकीच एक. कृष्णा, वेण्णा, कोयना या तिच्या इतर मैत्रिणी वेगळ्या दिशेने वळत असताना, ती मात्र गायत्री या सवतीसंगे दुसरीकडेच तोंड वळवते. तिचा या सवतीसोबतचा संसारही फार काळ चालत नाही.  महाबळेश्वरच्या आर्थर सीट या ‘सनराईझ’ पॉईंटजवळ सुरू झालेला हा प्रवास बाणकोटच्या ‘सनसेट’ स्थळी येऊन थांबतो. आर्थरच्या दु:खद आठवणींशी जोडलेल्या या माऊलीचे नाव ‘सावित्री’.

‘आर्थर सीट’ मधील आर्थर हा अठराव्या शतकात पुणे दरबारातील रेसिडेंट पदावर असणाऱ्या सर चार्ल्स मॅलेट या अधिकाऱ्याचा मुलगा. मुंबईहून महाबळेश्वरला जाण्यासाठी त्याने मुंबई ते बाणकोट या जलमार्गाची निवड केली. या प्रवासात आर्थर सोबत त्याची पत्नी सोफीया आणि एक महीन्याची मुलगी एलेन होती. या प्रवासादरम्यान आलेल्या वादळाने बोटीवरील १३ खलाशांसह सोफीया आणि चिमुकल्या एलेनचा करूण अंत झाला. बाणकोट येथील हिंमतगडाच्या खालच्या बाजूला मायलेकींना दफन करण्यात आले. त्यांची स्मृती सांगणारा संगमरवरी फलकही तिथे आहे. या दोघींच्या आठवणीने व्याकूळ आर्थर नेहमीच उंच अशा कड्यापाशी बसून नदीच्या प्रवाहाकडे टक लावून पहात असे. मढीमहाल नावाची ही जागा पुढे ‘आर्थर सीट’ म्हणून ओळखली जाऊ लागली. सावित्रीच्या या कटू आठवणी इतक्यावरच थांबत नाहीत.
तीन वर्षापूर्वी जुन्या ब्रिटीशकालीन पुलाला क्षणात नाहीसे करणारे तीचे रौद्र रुप कोण विसरेल? ‘सव्वीस जुलै’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महापुरात तर या माऊलीने सर्वांनाच आपल्या पदरात झाकले होते. पोलादपूर मधील सिद्धेश्वर शिव मंदिरातील दगडी नंदीसह, तालुका वाचनालय, एक कॉलेज, काठावरची घरे, भलेमोठे वृक्ष आणि काही पुलांचे खांब या सर्वांनाच सावित्रीने आपल्या पोटात घेतले होते. सावित्रीच्या या रौद्र रुपाची पुराण कथाही तिचा स्वभाव स्पष्ट करणारी आहे.
        सृष्टीचा निर्माता मानल्या जाणाऱ्या ब्रम्हाच्या पहिल्या पत्नीचे नाव सावित्री. एकदा ब्रम्हदेवाला यज्ञ करायचा होता. यावेळेस देवी सावित्री तिथे उपस्थित नव्हती.
यज्ञाचा मुहूर्त टळू लागला होता. त्यामुळे ब्रम्हदेवाने गायत्रीशी विवाह करून यज्ञाला सुरूवात केली. थोड्या वेळाने सावित्री यज्ञस्थळी पोहोचली. ब्रम्हदेवांच्या शेजारी गायत्रीला पाहून तिचा संताप झाला. तिने “पृथ्वीवर तुमची कुठेही पूजा होणार नाही!”  असा शाप दिला व रागाने निघून आली. रागावलेली, देवावर रुसलेली ही सावित्री नदी रुपाने पृथ्वीवर अवतीर्ण झाली. पुढे राग शांत झाल्यावर पुष्कर येथील मंदिरात तुमची पूजा होईल असा उ:शाप देवाला दिला.
याकडे केवळ एक पुराणकथा म्हणून पाहीले तरीही यातून सावित्री नदीचे वर्णन समोर येते.  तसे पहायला गेलो तर ती केवळ महाराष्ट्रातील एक नदी. पण एका जिल्ह्यातून सुरूवात करून दुसऱ्या जिल्ह्यात येताना तिचे भौगोलिक आणि सांस्कृतिक रुपही पालटत जाते. महाबळेश्वरच्या सावित्री कड्यावरून झेपावणारा नदी प्रवाह पाहील्यानंतर यज्ञप्रसंगी रागाने निघून येणाऱ्या सावित्री देवीची नक्कीच आठवण येते. डोंगरदऱ्यांतून ती ज्या वेगाने येते ते पाहून निसर्ग शक्तीची जाणीव होत राहते. पुढे हा वेगवान प्रवाह पोलादपूरच्या दिशेने येतो.
निसर्गापुढे आपण किती क्षुद्र आहोत हे अनुभवायचे असेल तर एकदा सावित्रीचा जलप्रपात घागरकोंडच्या झुलत्या पुलावरून पहा. ‘जीवनाची सुंदरता आणि मृत्यूची भिती’ या दोन्हींचा संगम या ठिकाणी पहायला मिळतो. पुढे रानबाजीरे धरणामुळे या प्रवाहाला थोडा अटकाव होतो.
मुळची पश्चिमवाहीनी सावित्री पोलादपूरपासून काही काळ उत्तरवाहीनी  होते. महाडच्या पूर्वेला तीला काळ नावाची नदी येऊन मिळते. कालांतराने गांधारी नावाची उपनदीही त्यात सामावते. पोलादपूरपासून राजेवाडीपर्यंत नदीचे खोरे रूंद होऊन तीचा वेग मंदावतो. इथून पुढे राग शांत झालेल्या सावित्रीचे दर्शन घडते. भरती-ओहोटीचा परिणाम तीच्या प्रवाहावर होऊ लागतो. हा प्रवास  पोलादपूर, महाड, माणगाव आणि श्रीवर्धन तालुक्यांमधून होऊन पुढे ती हरिहरेश्वर जवळून अरबी समुद्राला मिळते.  संथ प्रवाह असलेल्या सावित्रीच्या तीरांवर थोडीफार लागवडयोग्य जमिन आहे. या जमिनीवर पावसाळ्यासह इतर काळातही शेती करता येते.  प्राचिन काळापासून सावित्रीस व्यापारी महत्त्व होते. कालांतराने मुखाजवळ गाळ साठल्याने या नदीतून होणारी जलवाहतूक कमी झाली. तरीही बाणकोटपासून दासगाव पर्यंत यांत्रिक होड्यांतून जलवाहतूक होत असते. रानबाजिरे धरणामुळे उन्हाळ्याच्या दिवसांतही नदीचा प्रवाह जीवंत ठेवण्यात यश मिळाले आहे.
अजूनही या पाण्याचा मानवी उपयोग वगळता कृषी क्षेत्रासाठी फार मोठ्या प्रमाणावर उपयोग होताना दिसत नाही. तुर्भे-लोहारमाळ परिसरातील सावित्री नदीवर असलेलेया जुन्या कोल्हापुरी बंधाऱ्यांमुळे पाणी अडवण्याचा प्रयत्न होतो. पण या माऊलीच्या प्रकोपापुढे या बंधाऱ्यांनीही मान तुकवली आहे. डोंगराळ भागातून वाहताना सावित्रीच्या तीरांवर फार मोठी लोकवस्ती आढळत नाही, मात्र पोलादपूर, महाड तालुक्यांत बऱ्यापैकी लोकवस्ती आहे. असे असूनही इतर नद्यांच्या तुलनेने सावित्री नदी स्वच्छ आहे. सहसा इथले लोक या प्रवाहात कचरा टाकत नाहीत.  या प्रवाहाने एका शिस्तबद्ध लोकसंस्कृतीला जन्म दिला आहे. ही संस्कृती पाण्याचा आदर करते. नदीला आई मानणारे इथले रायगडवासी आपल्या आईचा राग सहन करतात आणि तीला जपतातही!

- तुषार म्हात्रे, पिरकोन (उरण)

No comments:

रायगडची लोहयुगीन संस्कृती

रायगडची लोहयुगीन संस्कृती मँडागोरा! ‘पेरिप्लस ऑफ इरिथ्रीयन सी’ या अत्यंत पुरातन आणि महत्त्वपूर्ण दस्ताऐवजांमध्ये नोंदवले गेलेले एक बंद...