जॅक स्पॅरो आणि ब्लॅक पर्ल

तो कपटी आहे, ढोंगी आहे, स्वार्थी आहे, पैशाचा लालची आहे, दारूडा देखिल आहे. त्याचा अवतारही रांगडा आणि अस्वच्छच! एखाद्या खलनायकाला जितकी विशेषणे लावता येतील तितकी त्याला चपखलपणे बसतात. तो लढवय्या असला तरी पळपुटादेखिल आहे. तरीही पडद्यावरील त्याचा वावर हवाहवासा वाटतो. 2003 साली टेड इलियट आणि टेरी रॉस्सीयो या दोघांच्या कल्पनेतून साकारलेला हा अवलिया म्हणजे ‘जॅक स्पॅरो ... सॉरी! ‘कॅप्टन जॅक स्पॅरो’! ‘पायरेटस् ऑफ दी कॅरेबियन’ या फँटसी प्रकारातील चित्रपटाचा हा आधारस्तंभ. ‘समुद्री चाचे आणि त्यांचा संघर्ष’ या जोडीला ‘अॅक्शन, थ्रीलर, रोमान्स, कॉमेडी’ अशा चविष्ट मसाल्याने भरलेले हे कथानक. दशकापूर्वी ‘पायरेटस ऑफ दी कॅरेबीयन: कर्स ऑफ ब्लॅक पर्ल’ने सुरू झालेल्या या मनोरंजक समुद्री प्रवासाने तब्बल पाच कथानकांची मेजवानी प्रेक्षकांना दिली. काळाप्रमाणे मनोरंजनाचे तंत्र बदलले, परंतु जॅकच्या करामतींचे तंत्र अजूनही जगभरातील प्रेक्षकांना आपल्यापर्यंत खेचत आहे. चित्रपटाची कथा काहीही असो जॅकच्या भूमिकेतील जॉनी डेप नेहमीच सर्वांना भावत आला ...