वानंचा बाव
नवी मुंबई परिसरातल्या अजूनही गावपण टिकवून ठेवलेल्या गावांमध्ये अशी हाळी कानी पडली की मासेखाऊ मंडळींचे कान टवकारले जातात. कारण विक्रेत्याचा हा आवाज म्हणजे ताजी मासळी मिळण्याची खात्री. खाडीतील लहान मोठे ताजे मासे या मासे विक्रेत्यांकडे असतात. या हाळीतील ‘बांव’ म्हणजे मच्छी, पण यातील ‘वाना’ म्हणजे काय?
वाण, वान किंवा वाना हा नक्की काय प्रकार आहे?
खरंतर मासेमारी हा मानवाचा फार पुरातन काळापासून चालत आलेला एक व्यवसाय आहे. आदिमानव अन्न मिळविण्यासाठी इतर प्राण्यांच्या शिकारीबरोबरच नदी, समुद्रातील माशांची शिकार करायचा. जाळे टाकून मासे पकडणे, भाल्याने मासे मारणे किंवा गळ टाकून मासे पकडणे याची माहिती मानवाला बऱ्याच आधीच्या काळापासून असावी. ईजिप्तमध्येही प्राचीन काळापासून मासेमारी होत होती, असे काही प्राचीन शिलाचित्रांवरून दिसून येते. भारतात अंदाजे चार हजार वर्षांपूर्वीच्या काळातही मासेमारी अस्तित्वात होती, असे सिंधू खोऱ्यातील मोहेंजोदडो येथील उत्खननात आढळले आहे. इथे भाजलेल्या तांबड्या मातीच्या भांड्यावर महसीरसारख्या माशांची व ते पकडण्यासाठी वापरलेल्या गळांची चित्रे आढळतात. यावरून त्या काळात मासेमारीचा व्यवसाय अस्तित्वात होता, असे मानण्यास हरकत नाही. पोर्तुगीजांनी १५५४ साली लिहिलेल्या एका पत्रात, समुद्रात खोलवर पुरलेल्या व पृष्ठभागावर दिसणाऱ्या अजस्र खांबांचा उल्लेख केला आहे. हे खांब कराची व मुंबईच्या समुद्रात आढळत असत व या खांबांना ‘डोल’ या नावाची जाळी बांधली जात असत. म्हणजे आपले ‘डोलकर दर्याचे राजे’ पोर्तुगीज काळात तर नक्कीच होते.
मासेमारीच्या अनेक पद्धतींपैकी ‘वाण’ ही तशी सर्वसामान्यांना अपरिचित पद्धत.'वाण' ही एका माणसापासून ते एका मोठ्या गटाला सामावून घेणार पद्धत आहे. खाडीकिनारी भागात, जिथे सतत भरती-ओहोटी होत असते तिथे वाण लावला जातो. या मासेमारी पद्धतीचे तत्व तसे सोपे आहे. किनारी भागात भरती येण्यापूर्वी पाण्याच्या अगदी जवळ बांबू रोवले जातात. या बांबूंना वरच्या बाजूला व्यवस्थितपणे जाळे गुंडाळलेले असते. आता हे किती उंचीवर बांधायचं हेही अनेक गोष्टींवर निश्चित होते. भरतीला सुरूवात झाली की पाण्याची पातळी वाढून किनारी भाग पाण्याने व्यापला जातो. ओहोटी रेषा व भरती रेषा यांतील सरासरी अंतर दहा ते बारा मीटरपर्यंत असते. ‘खोशी’, ‘आखंदा’, ‘पऊल’ यांसारख्या अरूंद खाडी प्रवाहांमध्ये हे अंतर आणखीनच वाढते.पाण्याच्या या प्रवाहासोबत समुद्रातील मासळीदेखील वरच्या दिशेला संचार करत असतात. आता मासेमार ‘समा’ होण्याची वाट पाहतात. ‘समा’ म्हणजे पाण्याची समपातळी. थोडक्यात भरती संपून ओहोटी सुरू होण्यापूर्वीचा काळ. हा ‘समा’ झाला क बांबूंना लावलेले जाळे खाली उतरवले जाते. हे जाळे पाण्याखाली जमिनीत पुरून ठेवायचे किंवा वजने लावून पाण्याखालील जमिनीला पूर्ण टेकून ठेवायचे. वाण लावणाऱ्या मच्छीमार बांधवाच्या क्षमतेनुसार या जाळ्याची लांबी-रुंदी ठरते. हे जाळे काही मीटरपासून ते किलोमीटर अंतराइतके असू शकते. जाळ्याची खोलीही तेथील पाण्याच्या खोलीवर अवलंबून असते. या वाणामुळे माशांचा परतीचा मार्ग अडवला जातो. आता ओहोटीमुळे किनाऱ्यवरील पाणी कमी कमी होत जाते व पाणेयासोबत परतीच्या मार्गावर लागलेले मासे आयतेच जाळ्यात अडकतात. पुढे संपूर्ण पाणी ओसरले की जाळ्यालगतचा चिखल तुडवत ‘हंटींग अँड फिशींग’चे रुपांतर थेट ‘गॅदरींग’ मध्ये होते. इथे मासे अक्षरक्ष: गोळा केले जातात. वरकरणी पाहता ही मासेमारीची सोपी पद्धत वाटते, पण स्वत:चे जाळे, हक्काची किनारी जागा आणि गरजेपुरती लहान होडी सर्वच मच्छिमारांकडे उपलब्ध असते असे नाही.
त्यातच जाळे लावण्याची एकंदर मेहनत आणि मासे मिळण्याची अनिश्चितता यामुळे हे काम अधिकच कठीण होत जाते. ‘वाण’ लावले जाते ते भरती-ओहोटीच्या कलांनुसार. त्यामुळे ही मासेमारी महिन्यातून ठराविक दिवसच चालते. खाडी किनाऱ्यांवरील विकासकामे, प्रचंड कचरा यांमुळे वाणा लावण्यासाठीच्या जागा आक्रसून गेल्या आहेत. गेल्या काही वर्षांपासूनच्या मत्स्यदुष्काळामुळे हा व्यवसाय देखील मंदीच्या जाळ्यात अडकला आहे. या परिस्थितीतही नवी मुंबईलगतच्या किनारी भागात नावापुरता का होईना पण ‘वाना’ टिकून आहे. खारेपाटातील इतर लहानमोठ्या व्यवसायांप्रमाणे हा व्यवसाय देखील नाहीसा होऊ नये, इतकीच अपेक्षा.
- - तुषार म्हात्रे
Comments