Search This Blog

Thursday, March 9, 2023

शीतलादेवी

शीतलादेवी!




     महाराष्ट्रात, गावोगावीच्या वेशींपाशी शेंदूर फासलेले ओबडधोबड आकारातील ग्रामदेवतांचे तांदळे पहायला मिळतात. म्हसोबा, विरोबा, वेताळदेव, बापदेव, गावदेवी यांसारख्या देवता सर्वत्रच आहेत. या देवतांपैकीच एक वैशिष्टयपूर्ण देवता म्हणजे ‘शितलादेवी’ अथवा ‘शीतळादेवी’.  रायगड मधील अलिबाग जवळील चौल नाक्यापासून दोन किलोमीटर अंतरावर शीतलादेवीचे मंदिर आहे. हे मंदिर पुरातन असून, त्याकाळापासून प्रसिद्ध आहे. शीतलादेवीचे हे जागृतस्थान समजले जाते. खरंतर हे मंदिर चौलच्या दक्षिणेस खाडीजवळ बांधले होते. परंतु कालांतराने ही खाडी गाळ व भरावाने व्यापून जमिनीचा भाग वाढला आहे. यापूर्वी एकदा मंदिराचा जीर्णोद्धार १७५९ मध्ये झाला होता. आंगरे घराण्याची या देवतेवर दृढ भक्ती होती. सध्या पूर्वीचे  लाकडी व कौलारू मंदिर पाडले असून त्याच जागेवर १९९० साली गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नवीन सिमेंट कॉन्क्रीटचे मंदिर बांधण्यास सुरूवात झाली. जीर्णोद्धार करताना गाभाऱ्यातील देवीच्या मूर्तीची मूळ जागा तीच ठेवण्यात आली आहे. शीतलादेवीच्या दर्शनासाठी रायगडसह सातारा, पुणे, रत्नागिरीहूनही बरेच भाविक दर्शनासाठी येतात.


   याच जिल्ह्यातील उरण तालुक्यातील दिघोडे येथील शीतलादेवीचे मंदिरही प्रसिद्ध आहे. दिघोडे-पनवेल रस्त्यानजिक असणारे हे लहानसे मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे. मंदिरामध्ये शीतलादेवीसह इतर भग्न अवस्थेतील शेंदूरचर्चित मूर्ती आहेत. या मूर्तींच्या आधारे हे स्थान पुरातन असल्याचे लक्षात येते. नविन पनवेल येथील शीतलादेवीचे मंदिरही सुप्रसिद्ध आहे. या मंदिरांबरोबरच पालघर जिल्ह्यातील केळवे  येथे स्थानापन्न असलेली शीतलादेवी खूप प्रसिद्ध आहे. यापैकी बऱ्याच ठिकाणी साधारण कोरीव दगड ही शितळा म्हणून पुजली जाते. शीतलादेवीच्या जुन्या काळातील कोरीव प्रतिमाही आढळल्या आहेत. सर्वसामान्यपणे देवीच्या चतुर्भूज मूर्ती आढळतात. परंतु काही ठिकाणी सहा, आठ, दहा आणि  बारा हात असलेल्या प्रतिमाही मिळाल्या आहेत. स्कन्द पुराणात शीतलाष्टक नावाने देवीचे स्तोत्र दिले आहे. स्वत: भगवान शंकराने ही रचना केल्याचे सांगण्यात येते. त्याचबरोबर शीतला देवीची आराधना करण्यासाठी पुढील मंत्र म्हटला जातो.
“वन्देऽहंशीतलांदेवीं रासभस्थांदिगम्बराम्।।
मार्जनीकलशोपेतां सूर्पालंकृतमस्तकाम्।।
    अर्थात, गाढवावर विराजमान, दिगम्बरा, हातात झाडू आणि कलश धारण करणारी, मस्तकावर सूपाचे अलंकार घालणाऱ्या शीतला देवीला मी वंदन करत आहे.


 उत्तरप्रदेशात चैत्र महिन्याच्या कृष्णाष्टमीपासून शीतळादेवीच्या पूजेस प्रारंभ होतो. साधारणपणे आषाढ महिन्यापर्यंत येणारी प्रत्येक कृष्णाष्टमी देवीचा पूजा दिवस असतो. या दिवशी शीतला देवीची पूजा आणि बासोडा म्हणजेच शीळे जेवण करण्याची पद्धत आहे. देवीचे प्रमुख आयुध खूर आणि वाहन गाढव आहे. काही ठिकाणी अक्षमाला, कलश, धनुष्य, बाण, ढाल, त्रिशूल, डमरू, केरसुणी यांसारखी आयुधेही पहायला मिळतात. यांतील गाढव हे वाहन व हाती केरसुणी ही  रचना अक्कादेवी नावाने ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठा या देवतेशी साम्य दर्शवणारी आहे. गोवर, कांजिण्या, देवी वगैरे रोगांशी संबंधित असलेल्या या देवता. या रोगांचा संसर्ग झाल्यानंतर होणारा त्रास कमी करण्यासाठी शीतलादेवीची पूजा करण्याची व देवीची गाणी म्हणजेच बायांची गाणी म्हणण्याची प्रथा अजूनही काही भागांत आहे. या सर्व कृतीतून रोग बरा होण्याची भावना या श्रद्धाळूंमध्ये असते.
     आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचा अर्थ लावून त्याप्रमाणे प्रतिसाद देणे हे तसे सर्व सजीवांचे वैशिष्ट्य. या सजीवांपैकीच एक असणाऱ्या मनुष्यप्राण्याचा इतिहास लाखो वर्षांचा. इतिहासाचार्य वि.का. राजवाडे आपल्या एका पुस्तकात म्हणतात, “एखादा गूढ आवाज आला तरी तो कुठून आला हे कल्पनेने शोधण्याच्या प्रयत्नात मनुष्याने अदृश्य प्राणी निर्माण केले. नाना तर्क करून त्याने  भुते, यक्ष, देव, दानव, अप्सरा, गंधर्व, वेताळ, पिशाच इत्यादी बाबी कल्पिल्या; नंतर त्यांच्या राहण्याच्या जागा, स्थळे, प्रदेश व लोक निर्माण केले, आणि शेवटी त्यांच्या गुणाप्रमाणे रूपे निर्माण केली. इतकेच करून मनुष्य थांबला नाही, तर हे अदृश्य प्राणी रागावले तर पूजा, नैवेद्य व बळी देऊन त्यांची मर्जी संपादण्याचे मार्ग ठरवले. माणूस दचकला, आजारी पडला, आजाराचे स्पष्ट कारण कळेना यातून भूताची कल्पना केली. सुष्ट व दुष्ट भुते निर्माण झाली. वीज पडून मनुष्य मेला म्हणजे इंद्राने आपल्या वज्राने मारिला व पटकीने मेला म्हणजे मरीदेवीने मारला अशी भ्रांत समज असायची.”
विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगातील भयंकर रोगांच्या साथी व हतबल झालेले लोक पाहता, जुन्या काळातील रोगांच्या साथींना तत्कालीन समाजाने दैवी प्रकोप मानणे स्वाभाविकच होते. 
    काळ बदलला असला तरी भाविकांची आपल्या श्रद्धेयाप्रती असणारी भावना कालातीत आहे. शीतलादेवी ही स्वच्छतेचे अधिष्ठान असलेली देवता आहे. तिच्या हातात असलेली केरसुणी व माथ्यावरील सूप स्वच्छतेचे आवाहन करणारी आहे. या देवतेला प्रसन्न करणे म्हणजेच आपल्या आजूबाजूला स्वच्छता राखणे हाच अर्थ सद्य:काळात उपयुक्त ठरणारा आहे.

- तुषार म्हात्रे, पिरकोन (उरण)

No comments:

रायगडची लोहयुगीन संस्कृती

रायगडची लोहयुगीन संस्कृती मँडागोरा! ‘पेरिप्लस ऑफ इरिथ्रीयन सी’ या अत्यंत पुरातन आणि महत्त्वपूर्ण दस्ताऐवजांमध्ये नोंदवले गेलेले एक बंद...