Search This Blog

Thursday, May 11, 2023

इस सिमेंट में जान है!






    “इस सिमेंट में जान है!” असे म्हणत आपल्या सिमेंटची वैशिष्ट्ये सांगणारी जाहीरात आठवत असेल. या कंपनीचे सिमेंट वापरून केलेले बांधकाम किती मजबूत आहे, हे ग्राहकांच्या मनात ठसवण्यासाठी अशी टॅगलाईन वापरली गेली. उत्पादनाचे वर्णन करताना अतिशयोक्तीचा वापर करण्याची अशी पद्धत जवळपास सर्वच कंपन्या वापरतात. ‘ सिमेंट में जान’ वाले पण यातलेच.  पण प्रत्यक्षात ‘सिमेंट में जान’ असणारी एखादी गोष्ट असल्याबद्दल आपल्याला कोणी सांगीतली तर? ती देखील आपल्या घरात? होय, सिमेंटसदृश निर्जीव गोष्टींनी वेढलेली परंतु आतून सजीव असलेली ही गोष्ट आपल्या सभोवतालीच आढळते.

                            घराची साफसफाई करताना तुम्हाला भोपळ्याच्या बी प्रमाणे चपटी, दोन्ही टोकाला निमुळता आकार असणारे लहान कोश आढळले आहेत का? विशेषत: भिंतीतील फडताळांमध्ये, बाथरूमच्या कोपऱ्यांमध्ये अशा आकाराचे पण सिमेंट-मातीचा खरखरीत स्पर्श असणारे कोश दिसतात. काळजीपूर्वक पाहील्यास कधीकधी या सिमेंटसारख्या कोशाच्या आतून बाहेर डोकावणारा जीव दिसतो. ‘सिमेंट में जान’ असणारा हा जीव ‘प्लास्टर बॅगवर्म(Plaster Bagworm)’ या नावाने ओळखला जातो. टिनीएडी (Tiniedae) कुळातील या सजीवाचे शास्त्रीय नाव फेरीओका युटेरेला (Phereoeca uterella). हा सजीव इतर बॅगवर्मपेक्षा थोडा वेगळा असल्याने त्याला हाऊसहोल्ड केसबिअरर (Houbsehold Casebearer) असे म्हणने योग्य ठरेल. या कीटकाची अळी विशिष्ट द्रव स्रवते. पुढे हा द्रव आणि घराच्या भिंतीवरील रंग, सिमेंट, माती यांसह कपड्यातील रेशीम यांचा वापर करून आपला कोश तयार करते. या मजबूत कोशामुळे अळीची वाढ होताना  परभक्षींपासून संरक्षण मिळते. गिर्यारोहक ज्याप्रमाणे झोपण्याच्या पिशव्या (Sleeping Bags) वापरतात, तसाच काहीसा हा प्रकार. पण या पिशव्या आणि कोशातील महत्त्वाचा फरक म्हणजे आतील मोकळी जागा. कोशाच्या मधल्या वक्र भागाचा वापर करून ही अळी आतमध्ये फिरू शकते.

                                                                       हा ‘कोश’ हेच तिचे ‘विश्व’!
      ‘अन्न-वस्त्र-निवारा’ या मानवाच्या प्रमुख गरजा. यापैकी मानवाचे ‘वस्त्र-निवारा’ प्लास्टर बॅगवर्मला चांगलेच उपयोगी ठरतात. ज्या घराच्या भिंती, रंगासांठी आपण पैसे मोजलेले असतात, त्या घराचे सिमेंट-माती-रंग विनापरवानगी स्वत:च्या घरासाठी वापरणारा हा घरभेदी कीटक आपले कपडेसुद्धा सोडत नाही. तो रेशीम आणि लोकर खातो. कापसाचे तंतू त्याला खाता नसल्याने काही प्रमाणात आपली लाज राखली जाते. मनुष्यासह तो कोळ्याच्या घरातही घरफोडी करतो. कोळ्याचे जाळे हे त्याचे आवडते खाद्य. केशतंतू आणि कधी कधी आपल्याच भाईबंदांच्या कोशाचा भाग देखील त्याला अन्न म्हणून चालते.

      जवळपास अडीच महिन्यांचे जीवनमान लाभलेला हा सजीव बराचसा काळ कोशात व्यतीत केल्यानंतर अखेर पतंगरुपात(Moth) पोहोचतो. कोशातून बाहेर पडण्यास सज्ज होताना त्याला करड्या रंगाचे पंख फुटलेले असतात. अशा वेळी घरात बरेच रिकामे कोश आढळतात. प्रौढावस्थेतील पतंगांचे मिलन झाल्यानंतर मादी सुमारे २०० अंडी देऊ शकते. ही अंडी भिंतींच्या, दारांआडच्या फटींमध्ये व्यवस्थीतपणे लपवून सुरक्षित ठेवली जातात. दहा दिवसांनी या अंड्यांमधून जीव बाहेर पडतो.दमट वातावरणात ही प्रक्रीया वेगवान तर असतेच, पण यातील यशस्विततेचे प्रमाण अधिक असते. यामुळेच न्हाणीघर, शौचालय याठिकाणी प्लास्टर बॅगवर्मची संख्या सातत्याने वाढत राहते. घरातील संथ वावर, घरचाच रंग वापरून बनवलेला कोश यांमुळे हा केसबिअरर सहजपणे दिसून येत नाही. तसेच प्रौढावस्थेतील कीटकसुद्धा आकाराने लहान व बाजूच्या परिसरात मिसळणाऱ्या करड्या रंगाचा असल्याने सहज लपून राहू शकतो. हाउसहोल्ड केसबिअरर फारसा त्रासदायक नसला तरीही संख्येने वाढल्यास मात्र नुकसान करू शकतो. यासाठी घरातील कोळ्यांची जाळी काढून टाकणे, घरातील दमटपणा कमी होण्यासाठी हवा खेळती ठेवणे यांसारखे उपाय करता येतील. या कीटकांची संख्या वाढण्याचे आणखी एक कारण म्हणजे चिमण्यांची कमी झालेली संख्या. चिमण्यांसारखे लहान पक्षी या कीटकांना खातात. पण अलिकडच्या काळात चिमण्या कमी झाल्याने, तसेच त्यांना मनुष्याने आपल्या राहत्या जागेत वावरू न दिल्याने या पेटीवाल्याचे खूप फावले आहे. अन्नसाखळीत प्रत्येक सजीवाचे महत्त्व पटवून देणारे हे एक उत्तम उदाहरण आहे.
           विश्वकोशात नोंदही नसलेल्या असंख्य प्रकारच्या सजीवांनी भरलेल्या या जगातील एका लहानशा जीवाचे हे ‘कोशातील विश्व’... विश्वाच्या अनेक रहस्यांप्रमाणेच हा जीवसुद्धा अद्भुत आणि अतर्क्य.... आपल्या पोतडीत अशी विविध रहस्ये जपणाऱ्या जीवसृष्टीच्या या चमत्काराला सलाम!

-  तुषार म्हात्रे

(सदर लेख 'रयत विज्ञान पत्रिकेच्या अठराव्या अंकात प्रकाशित झाला आहे.)

No comments:

रायगडची लोहयुगीन संस्कृती

रायगडची लोहयुगीन संस्कृती मँडागोरा! ‘पेरिप्लस ऑफ इरिथ्रीयन सी’ या अत्यंत पुरातन आणि महत्त्वपूर्ण दस्ताऐवजांमध्ये नोंदवले गेलेले एक बंद...