शीतलादेवी

शीतला देवी! शीतलादेवी! महाराष्ट्रात, गावोगावीच्या वेशींपाशी शेंदूर फासलेले ओबडधोबड आकारातील ग्रामदेवतांचे तांदळे पहायला मिळतात. म्हसोबा, विरोबा, वेताळदेव, बापदेव, गावदेवी यांसारख्या देवता सर्वत्रच आहेत. या देवतांपैकीच एक वैशिष्टयपूर्ण देवता म्हणजे ‘शितलादेवी’ अथवा ‘शीतळादेवी’. उरण शहरात देवीची काही मंदिरे आहेत. यामध्ये जरीमरी देवीचा समावेश असला तरी ‘उरणावती, शितळादेवी, गावदेवी’ अशी तीन नावे धारण केलेली एकच देवी देऊळवाडीत विराजमान आहे. हे या देवीचे एक पुरातन मंदिर आहे. याच तालुक्यातील दिघोडे येथील शीतलादेवीचे मंदिरही प्रसिद्ध आहे. दिघोडे-पनवेल रस्त्यानजिक असणारे हे लहानसे मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे. मंदिरामध्ये शीतलादेवीसह इतर भग्न अवस्थेतील शेंदूरचर्चित मूर्ती आहेत. या मूर्तींच्या आधारे हे स्थान पुरातन असल्याचे लक्षात येते. नविन पनवेल येथील शीतलादेवीचे मंदिरही सुप्रसिद्ध आहे. रायगड जिल्ह्यातील शितलादेवीचे सुप्रसिद्ध स्थान कोणते? अलिबाग जवळील चौल नाक्यापासून दोन किलोमीटर अंतरावर शीतलादेवीचे मंदिर आहे. हे मंदिर पुरातन असून, त्याकाळापासून प्रसिद्ध आहे. श...