Search This Blog

Friday, October 28, 2022

उकळणारे दगड

‘उकळणारे दगड’

           गेल्या काही वर्षांपासून संपूर्ण जगाला ज्याची तिव्रतेने गरज भासली असा घटक म्हणजे ‘ऑक्सीजन’. हवेतील उपलब्ध ऑक्सीजन पुरेशा स्वरूपात मिळवू न शकणाऱ्या कोविडबाधित रुग्णांना वैद्यकीय ऑक्सिजनच्या माध्यमातून  उपचार केले जात आहेत.


हवेतून जास्तीत जास्त ऑक्सिजन मिळविण्याच्या काही पद्धतींपैकी ’निवडक अधिशोषण (Selective Adsorption)’ ही एक चांगली पद्धत आहे. सुप्रसिद्ध ‘ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर’ यंत्रांमध्ये हे तंत्र वापरले जाते.  यात हवेसारख्या वायूंचे मिश्रण एका विशिष्ट खनिजापासून बनवलेल्या पृष्ठाच्या पात्रामधून सोडले जाते. हा खास पृष्ठभाग नायट्रोजन शोषतो. त्यामुळे या पात्रामधून जो वायू बाहेर पडतो त्यामध्ये आधीच्या तुलनेत जास्त ऑक्सिजन असते. हा पृष्ठभाग ज्या खनिजापासून बनवला जातो ती खनिजे तुम्हाला अक्षरश: रस्त्यावर सापडतील. पनवेल परीसरात राहणाऱ्यांना ही खनिजे पहायची असल्यास राष्ट्रीय महामार्ग-४बी लगत ‘डोंबाला कॉलेज’ प्रवेशद्वाराजवळील एका मोकळ्या भूखंडावर पहायला मिळतील. इथे भरावासाठी अंथरलेल्या दगडांमध्ये  काचेसारखे चमकणारे स्फटीकदगड सर्वत्र पसरलेले दिसतील. हे चमकणारे दगड म्हणजेच  ‘झिओलाईट’ नावाचे खनिज.

आजूबाजूचा परिसर पाहता हे दगड इथले नसून जवळच्या दुसऱ्या भागातून भरावासाठी आणले गेले असावेत, असे वाटते. रायगड परिसराचा विचार केल्यास जासईजवळील दगडखाणींत आणि वरंध घाट रस्त्याला झिओलाईट खनिजांचे निक्षेप आढळतात. या दोन्ही जागांची नोंद रायगड गॅझोटिअरमध्येही आढळते. या खनिजाचा महाराष्ट्रातील आढळ पाहता ‘दख्खनच्या पठाराला’ झिओलाईटसचे माहेरघर समजायला हरकत नाही. साधारणत: सहा ते सात कोटी वर्षापूर्वी क्रेटेशियस काळ संपताना उसळलेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकात या भूभागाची निर्मिती झाली. त्यातूनच आपल्या दगडांच्या देशात बेसॉल्ट खडक तयार झाला. या खडकाच्या पोकळ्यांमध्ये झिओलाईटसारखी खनिजे तयार झाली. पृथ्वीच्या शब्दश: ज्वलंत इतिहासाचे हे पुरावे आहेत. इतरत्र अमेरिका, जपान, इटली, आफ्रिका येथेही झिओलाईटस मोठ्या प्रमाणात सापडतात. 

       झिओलाईटची नामकरण कथाही या दगडांसारखीच आकर्षक आहे. स्विडनमधील अ‍ॅक्सेल क्रॉन्टेड नामक शास्त्रज्ञाने एका प्रयोगात काही खनिजे तापवली. ही दगडखनिजे तापवल्यावर त्यातून पाण्याचे बुडबुडे व वाफ बाहेर येऊ लागली. हे ‘उकळत्या दगडांसारखे’ दृश्य पाहून या खनिजाला उकळणारे दगड या अर्थाने 'झिओलाईट' हे नाव मिळाले. ग्रीक भाषेत ‘झिओ (Zeo)’ म्हणजे उकळणारे आणि ‘लिथॉस(lithos)’ म्हणजे दगड. या खनिजांचे आजघडीला जवळपास पन्नास प्रकार ज्ञात आहेत. क्लिनोप्टीलोलाईट, इरिओनाईट, हेलँडाईट इ. प्रकारची झिओलाईट असतात.यांत खनिजांमध्ये असलेल्या सिलिकॉन, अ‍ॅल्युमिनियम, ऑक्सिजन या मूलद्रव्यांच्या ठराविक रचनेमुळे झिओलाईटच्या रेणूंना विशिष्ट आकार प्राप्त होतो. ह्या रेणूंमध्ये असलेल्या सूक्ष्म छिद्रांमुळे स्फटिकामध्ये लहान वाहिन्या तयार होतात. त्यांत पाणी साठून राहते. झिओलाईट तापविले की हे पाणी उकळू लागते व त्यातून बुडबुडे व वाफ बाहेर येते. आतील पाणी वाफेच्या रुपात बाहेर पडल्यानंतरही खनिजाच्या आकारात, त्यातील छिद्रात काही बदल होत नाही. या शुष्क खनिजात पोकळ छिद्रांची जाळी तयार होते. या सूक्ष्म जाळीतून निरनिराळ्या आकाराचे रेणू चाळून वेगळे करता येतात. या चाळणीची गंमत म्हणजे, घरातल्या चाळणीतून जसे मोठे कण चाळले जातात तसे न होता इथे लहान कण चाळण्यामध्ये अडकतात. जाळीतील छीद्रे लहान असल्याने यात लहान कण अडकतात व मोठे कण बाहेर पडतात. म्हणजे, यातून वायूचे किंवा द्रवाचे मिश्रण जाऊ दिल्यास त्यातील छिद्रांच्या आकाराचे रेणू त्यात पकडले जातात व मोठे रेणू निघून जातात.


  अनेक उद्योगांत झिओलाईटला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होत आहे.  पेट्रोलियम उद्योग, कागद उद्योग, रबर उद्योगात झिओलाईट वापरतात. पाण्याच्या शुद्धीकरणासाठी झिओलाईटचा वापर वाढत आहे. प्रदूषण वाढविणारे ह वायू शोषून घेण्यासाठी झिओलाईटचा चांगला उपयोग होतो. कारखान्यातून सोडलेले अशुद्ध पाणी झिओलाईटमधून जाऊ दिल्यास त्यातील बरीच अशुद्धी शोषली जाते. किरणोत्सर्गी कचऱ्याचे शुद्धीकरण करण्यासाठीदेखील झिओलाईटचा उपयोग केला जात आहे.

 


    नवीमुंबई परिसरात होऊ घातलेल्या विमानतळ, औद्योगिक प्रकल्प, शहरीकरण या कारणांसाठी परिसरातील डोंगर जमिनदोस्त केले जात आहेत. या प्रक्रियेत वैविध्यपूर्ण सजिवसृष्टीसह इथली खनिजसंपत्तीही मातीमोल होत आहे. या ठेव्याचे मोल ओळखून त्याचा योग्य वापर करता येणे शक्य आहे का? याचा विचार व्हायला हवा. अर्थात त्यासाठी गरज आहे योग्य दृष्टीची. या खड्यांवरून परावर्तीत होणारा प्रकाश संबंधितांच्या डोक्यात पडावा ही अपेक्षा.

(वरील लेख ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानच्या ई-दिवाळी विशेषांक २०२२ मध्ये प्रकाशित झाला आहे. 
संपूर्ण अंक डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.
https://drive.google.com/drive/folders/1afCcZXyB6n7LvxzmZbDztr9eEU0vOnh6)

-- तुषार म्हात्रे

No comments:

रायगडची लोहयुगीन संस्कृती

रायगडची लोहयुगीन संस्कृती मँडागोरा! ‘पेरिप्लस ऑफ इरिथ्रीयन सी’ या अत्यंत पुरातन आणि महत्त्वपूर्ण दस्ताऐवजांमध्ये नोंदवले गेलेले एक बंद...