Search This Blog

Friday, July 8, 2022

खोटा तांदूळ

  ‘खोटा तांदूळ’

                काठघर हे बिहारमधील एक लहानसे खेडे. नावाप्रमाणेच नदीच्या काठावर वसलेले. गावाच्या कडेने फुलहर नदी वाहते. राजमहाल टेकड्यांमध्ये वसलेले हे गाव वाहणारे लहान ओढे आणि तळी यांनी सजले आहे. उंच-सखल खाचरांतून येथे भातशेती केली जाते. इतर सर्वसामान्य गावांप्रमाणेच संथपणे इथले व्यवहार चालतात.  या शांत गावात उत्साह निर्माण होण्यासाठी एखादा लग्नसोहळाही पुरेसा ठरतो. आपल्याकडील लग्नसोहळ्यांमध्ये जशा गंमतीजंमती घडतात, तशाच या उत्साही लग्नसोहळ्यांतही घडवून आणल्या जातात. इथे लग्नानंतर गावात दाखल झालेल्या नववधूची सासरच्यांकडून एक गंमतीदार परीक्षा घेतली जाते. ही सोपी पण फसवी परीक्षा असते तिच्या पाककौशल्याची.

या नववधूला तांदूळ देऊन त्याचा भात बनवायला सांगीतला जातो. या गंमतीविषयी अनभिज्ञ असलेल्या नव्या नवरीचा भात कितीतरी वेळ झाला तरी शिजत नाही. या प्रसंगाचा आनंद लुटल्यानंतर नववधूला तांदूळ न शिजण्याचे खरे कारण सांगीतले जाते. सासरच्यांनी नववधूला दिलेला न शिजणारा तांदूळ खरा नव्हताच मुळी. हा खोटा तांदूळ गावातील मुलांनी काठघरच्या ओढे व तळ्यांतून गोळा केलेला असतो. हा संपूर्ण तांदूळ म्हणजे निव्वळ खडे. हे अस्सल तांदळासारखे भासणारे क्वार्टझचे खडे राजमहाल पर्वत परीसरातील विहिरी व ओढ्यांच्या तळांशी सापडतात. समर्थ रामदासांनी दासबोध ग्रंथात पंचमहाभूतांचे वर्णन करताना उल्लेखलेल्या
“तंदुलामधें श्वेत खडे। तंदुलासारिखेच वांकुडे।
चाऊं जातां दांत पडे। तेव्हां कळे।।”
या ओव्यांची आठवण करून देणारे हे खडे. काठघरची गंमत तांदूळ शिजवण्यापुरती मर्यादित आहे हे नशिब, जेवण म्हणून वाढायची परंपरा असती खरेच दात पडायची वेळ आली असती.
हा दात पाडू शकणारा खोटा तांदूळ आला कोठून?
 गावकऱ्यांच्या मते, “शेकडो वर्षांपूर्वी एक तांदूळ वाहून नेणारे जहाज बुडाले. या जहाजातील तांदूळ किनाऱ्यावरून ओढ्यांमध्ये, तळ्यांमध्ये वाहत पसरला. तोच तांदूळ आता खड्यांच्या स्वरूपात मिळत आहे.” अर्थातच त्या तांदळाप्रमाणेच ही कथादेखील फसवीच आहे. जगभर सर्वत्र आश्चर्यकारक घटनांभोवती अशा दंतकथा निर्माण होत असतात, काठघरही त्याला अपवाद नाही. प्रत्यक्षात खोट्या तांदळाची खरी कथा याहूनही अधिक रंजक आणि महत्त्वपूर्ण आहे.


      ही कथा आहे सुमारे अकरा ते बारा कोटी वर्षापूर्वीची.  भारतीय उपखंड, ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिका खंड सख्खे शेजारी असण्याचा तो काळ. गोंडवाना खंडाचे हे सगळे सदस्य इतके जवळ होते की ऑस्ट्रेलियातल्या पर्थच्या मैदानावर क्रिकेटचा सामना आयोजित केला असता, तर सरावासाठी जवळचे मैदान म्हणून भारतातील गुवाहाटी चालू शकले असते. पण तिन मोठ्या ज्वालामुखींना हा शेजार बघवला नाही. त्यांचा उद्रेक झाला.

या उद्रेकाने हे शेजारी सुटे होऊ लागले. सागरतळाखाली जेव्हा शिलारस वर येतो पण सागरतळ भेदत नाही, अशा शिलारसाला प्लूम(Plume) म्हणतात.
या प्रचंड प्लूमने एका बेटाला जन्म दिला. सध्या या बेटाचे नामकरण केर्गुएलेन असे झाले आहे. याच शिलारसाच्या दबावाने आजचे शिलाँग पठार घडले. राजमहाल पर्वतामध्ये शिलारसाचे थिजलेले साठे तयार झाले. गंगा व ब्रम्हपुत्र यांनी आणलेल्या प्रचंड गाळाने अनेक शिलारस साठे झाकले गेलेत, पण झारखंडमधील पंचेट, सिम्रा या भागात असे साठे पाहता येतात. केर्गुएलेन निर्माण करणारा उद्रेक घरातल्या खोट्याखोट्या भांडणांसारखा लगेच शमणारा नव्हता, तो तब्बल पंचविस लाख वर्षे सुरू होता. 


या घटनेने वेगवेगळ्या प्रकारचे दगड घडवले. केर्गुएलेन घटनेच्या पहिल्या स्फोटात शिलारस भूपृष्ठावर सुमारे चार हजार चौरस किमी परिसरात पसरला गेला. या शिलारसात सिलिका अधिक प्रमाणात होती. सिलिका जास्त असेल तर शिलारस अधिक दाट असतो. त्यात वायूही जास्त असतो. तो स्फोटक वेगाने पृष्ठावर येतो. दहा-बारा कोटी वर्षांपूर्वी राजमहाल पर्वतांमध्ये हा उद्रेक झाला तेव्हा सिलिकाचे थेंब हजारो फूट हवेत उडाले. गुरूत्वाकर्षणाने खाली येताना ते पावसाच्या थेंबाप्रमाणे लांबोळके झाले. थंड होऊन त्यांचे खडे झाले. पुढच्या कोट्यावधी वर्षात हे पावसापाण्याने झिजून गुळगुळीत झाले. हे काचमण्यांसारखे क्वार्टझचे दाणे तांदळासारखे दिसू लागले आणि काठघरच्या लोकांना गंमतीसाठी साधन मिळाले. काठघरप्रमाणेच लहान लहान भौगौलिक घटनांचे भक्कम पुरावे जगभर विखुरले आहेत. त्याआधारे इंडोनेशियातील तोबा, क्राकाटोआ व तांबोरा या बेटांवरही असेच ज्वालामुखीचे स्फोट झाल्याचे सांगता येते. 
    थोडी शोधक दृष्टी ठेवली तर आपल्यालाही दगडांची भाषा कळेल. या भाषेत लिहिलेला वसुंधरेचा हा इतिहास वाचता येईल. तो देखील थोडाथोडका नव्हे तर तब्बल चारशे साठ कोटी वर्षांचा...
आणि हो...आता जेवताना एखादा खडा लागलाच तर नीट पहा, कदाचित कोट्यावधी वर्षापूर्वीचा इतिहास तुम्ही चघळला असावा!
(संदर्भ: इंडिका - प्रणय लाल)

- श्री. तुषार म्हात्रे

No comments:

रायगडची लोहयुगीन संस्कृती

रायगडची लोहयुगीन संस्कृती मँडागोरा! ‘पेरिप्लस ऑफ इरिथ्रीयन सी’ या अत्यंत पुरातन आणि महत्त्वपूर्ण दस्ताऐवजांमध्ये नोंदवले गेलेले एक बंद...