Search This Blog

Wednesday, June 7, 2023

खुन्याची आरी: एका गुहेचा पुनर्शोध

          “कधी जायचं?” 
या प्रश्नाचं उत्तर अखेर मिळालं. ‘शोध’ या आवडीच्या गोष्टीसाठी सवड काढावीच लागते. तसेही जायचे ठिकाण मुख्य रस्त्यापासून फार अंतरावर नाही. पण तिथे जाण्यासाठी शब्दश: वाट वाकडी करावी लागते. यावेळेस किल्ले संवर्धनाच्या कामात सातत्याने राबणारा, पायाला भिंगरी लागल्यागत भटकणारा विजय आणि ऐतिहासिक गोष्टी शोधक नजरेने, कॅमेऱ्याने टिपणारा अभिषेक या दोघांसोबत ही शोधमोहीम राबवायची ठरली.

      कळंबुसरे गावाच्या पश्चिमेस आणि मोठीजुईच्या दक्षिणेस असणाऱ्या डोंगरावर ’खुन्याची आरी’ नावाची जागा आहे.  डांबरी रस्ते निर्माणाच्या आधी या डोंगराच्या कडेने रहदारीचा रस्ता होता. नावाप्रमाणेच या रस्त्याला लुटमार होऊन ‘खून’ व्हायचे म्हणून ‘खुन्याची आरी’ नाव पडल्याची एक कथा सांगीतली जाते; तर रस्त्याला विशिष्ट खुण असलेली जागा म्हणूनही हे नाव पडले असावे असाही एक ‘अंदाज’ आहे. याच जागेत ही गूढ ‘पांडवांची गुहा’ आहे. उरण तालुक्यातील कळंबुसरे हे शिलाहारकालीन गधेगळ, स्तंभ आणि जुने शिवमंदिर असणारे गाव


याच शिवमंदिराजवळ बाईक ठेवून संध्याकाळच्या सुमारास ‘वाकडी वाट’ पकडली. ठाकर बांधवांच्या मळ्यांमधून जाणारी पायवाट संपल्यानंतर, चारचाकी वाहन जाऊ शकेल असा डोंगराला समांतर कच्चा रस्ता सापडला. इथून पुढचा टप्पा लहान चढाचा, पण रस्ता नसलेला. या भागात सध्या जाणेयेणे नसल्याने काट्याकुट्यांनी, गर्द झाडींनी वेढलेला भाग समोर दिसत होता. माहितगार व्यक्तींकडून  “पंधरा मिनीटांत तिथे पोहोचाल!” असे ऐकल्याचे आठवले. पण समोरचे चित्र पाहता ही पंधरा मिनीटे पृथ्वीलोकातील नसावीत याची खात्री पटली.  मार्ग काढण्यासाठी एखादा कोयता हाती असायला हवा होता. भटकंतीचा चांगला अनुभव असलेला विजय आज निश:स्त्र होता. नाही म्हणायला माझ्या पिशवीत ‘मीटरपट्टी’ होती, पण तिचा उपयोग फारतर काट्याकुट्यांतून गेल्यानंतर अंगावर किती लांबीचा ओरखडा उठलाय हेच मोजण्याइतका झाला असता. शेवटी विजयनेच पुढाकार घेत अजिबात मार्ग नसलेला मार्ग निवडला.

त्याच्या मागे आम्ही दोघे निघालो. रस्त्यातल्या प्रत्येक वनस्पतीचे, मातीचे अवशेष अंगावर घेत आणि बदल्यात कपड्यांचे धागे काट्यांना भेट देत वर चढलो. मी हा भाग जवळपास पंचविस वर्षापूर्वी पाहीला होता. तेव्हा पाहीलेल्या  परिसराचा अंदाज घेत खुन्याची आरीची नेमकी जागा शोधत होतो. पण बराच शोध घेतल्यानंतरही गुहा सापडत नव्हती. शोध घेत एका बाजूला तीव्र उतार असलेल्या डोंगराच्या कडेने चालत राहीलो. दोन संभाव्य ठिकाणे पाहील्यानंतर तिसऱ्या जागेला खुणेचा भला मोठा दगड दिसला.


ही जागा पाहताच खात्रीचा ‘दिल में बजी घंटी’ सारखा अनुभव आला. एका बाजूने अभिषेकने आणि दुसरीकडून विजयने गुहेची पाहणी केली. मी मात्र गुहेचे सध्याचे दृश्य आणि आठवणीतील जुन्या दृश्यांची जुळणी करत होतो.


गुहेच्या रचनेत प्रचंड बदल झाला होता. एकेकाळी लहान झोपडीप्रमाणे असणारा प्रवेश भाग दगड माती खचल्याने अरूंद झाला होता. हे दोघेही या अरूंद भागातून आत उतरले.


त्यांच्या मागोमाग मीदेखील आत पोहोचलो. गुहेची पूर्ण पाहणी केली. दगडी गुहेच्या भागात छीन्नी हातोड्याचे घाव आढळले नाहीत. पर्यायाने ही ‘पांडवांची गुहा’ मानवनिर्मित असल्याची शंक्यता वाटत नाही. पण गुहेच्या एका दगडी भिंतीवर मानवी पंजाचा ठसा मी पूर्वी पाहीला होता. यावरून या नैसर्गिक गुहेत मानव राहीला असल्याचे खात्रीलायक सांगता येते. ही पाच बोटे पाच पांडवांची असल्याचा इथे समज आहे.

पूर्वी दुतोंडी असणाऱ्या या गुहेच्या मधल्या छताचा भाग पूर्ण कोसळला आहे, त्यामुळे मूळचा समांतर मार्ग बंद होऊन वरच्या दिशेला उघडणारा नवाच मार्ग तयार झाला आहे. गुहेसमोरील माती वाहून गेल्याने गुहेचे तोंड उताराकडे झुकले आहे. त्यातच आतल्या बाजूने पावसाच्या पाण्याने मार्ग काढल्याने दगड झिजले आहेत. दुर्दैवाने या पुनर्शोध मोहिमेत हाताचे ठसे सापडले नाहीत. एकतर ते मातीच्या ढिगाऱ्यात गाडले गेले असावेत किंवा दगड झिजून नष्ट झाले असावेत.

आणखी काही पावसाळे गेल्यानंतर ऐतिहासिक खुणा असलेली ही खुन्याची आरी हरवून जाण्याची शक्यता आहे. या जागेत एकदिवसाची संवर्धन मोहिम राबवल्यास गुहेचे आयुष्य वाढून अधिक माहिती मिळू शकेल. 
        पाहणीनंतर गुहेचे शक्य तितके फोटो काढले, अभिषेकने जागेचे महत्त्वपूर्ण मॅपिंग केले. ( https://goo.gl/maps/tVjuVm9RtiRnHmH3A ) गुहेच्या माथ्यावर बसून परिसरातल्या ऐतिहासिक ठेव्यांवर चर्चा केली.

सूर्य मावळतीला लागला होता. घरचे फोन (माझे एकट्याचेच!) वाजू लागले. भूतकाळातून वर्तमानकाळात यायची वेळ झाली. पुन्हा एकदा वाट नसलेल्या वाटेतल्या काट्यांना कपड्यांचे धागे देत, सोबत आमची आठवण म्हणून त्वचा-रक्त रुपाने डी.एन.ए. मागे सोडत खाली उतरलो; पुन्हा येण्यासाठी!

- तुषार म्हात्रे, पिरकोन (उरण)

No comments:

रायगडची लोहयुगीन संस्कृती

रायगडची लोहयुगीन संस्कृती मँडागोरा! ‘पेरिप्लस ऑफ इरिथ्रीयन सी’ या अत्यंत पुरातन आणि महत्त्वपूर्ण दस्ताऐवजांमध्ये नोंदवले गेलेले एक बंद...