Search This Blog

Tuesday, February 9, 2021

कोळसुंदा: खरा नायक

 एकमेकांवर नितांत प्रेम करणारे दोन प्रेमी आणि त्यांचे प्रेम यशस्वी होऊ नये म्हणून वारंवार अडथळे निर्माण करणारा एक खलनायक. या दोघांची एकमेकांसोबत जगण्याची इच्छा हा खलनायक पूर्ण होऊ देत नाही.  मनुष्य रुपातील अधुरी कहाणी पूर्ण करण्यासाठी हे दोन प्रेमी ‘जाई आणि जुई’ या फुलांच्या रुपाने जन्म घेतात, पण तिथेही हा खलनायक काटेरी वनस्पतीच्या रुपाने जन्म घेतो. अखेर या फुलांमधून आवाज येतो...

“जाई-जुई एकत्र करा, कोलित्रा मेला उपटून टाका!”
किनारी भागांत प्रसिद्ध असणारी ही लोककथा. या कथेतील खलनायक ‘कोलित्रा’ म्हणजेच ‘कोळसुंदा’ नावाची वनस्पती. इतर नाजूक, आकर्षक आणि सुगंधी फुलझाडांच्या दुनियेत केसाळ आणि तीक्ष्ण लांब काटे असलेला कोळसुंदा खलनायक असणे स्वाभाविकच आहे. पण, लोककथांमधील हा खलनायक प्रत्यक्षातही तसाच आहे का?



          खारजमिनींवरील दलदलीच्या भागात आढळणारी ही वनस्पती कोकीळाक्ष, गोकुळकांता, गोक्षुर, विखरा, तालिमखाना या नावांनीदेखील ओळखली जाते. कँथेसी  कुलातील या वनस्पतीचे शास्त्रीय नाव हायग्रोफिला ऑरिक्युलाटा (Hygrophila auriculata). दलदलीतील काटा असलेली वनस्पती म्हणून तिचे इंग्रजी नाव ‘मार्श बार्बल’ असे आहे, तर तिच्या घेरेदार कळसाप्रमाणे रचनेला अनुसरून तिला ‘टेम्पल प्लांट’ असेही म्हटले जाते. भारतासह मलेशिया, श्रीलंका आणि आफ्रिकेच्या उष्णभागात कोळसुंदा आढळतो. अनुकूल परिस्थितीत ही वनस्पती दोन मीटर पर्यंतची उंची गाठू शकते. कोलित्र्याचे खोड साधणारत: चौकोनी आकाराचे आणि झुबकेदार असते. खोडांना ठराविक अंतरावर पेरे असतात. या प्रत्येक पेऱ्यावर सहा पाने येतात. त्यापैकी बाहेरची दोन पाने मोठी तर आतील चार पाने लहान असतात. कोळसुंद्याच्या प्रत्येक पेऱ्‍यावर जून ते जानेवारी दरम्यान  निळसर जांभळी फुले येतात. या फुलांना हात लावण्यापूर्वी पानांच्या आडून बाहेर आलेल्या रचनेकडे एकदा पहा. तिथे दोन पानांच्या  बाजूला पिवळसर रंगाचा एक लांंब तीक्ष्ण काटा दिसेल. हा काटा टोचल्यास अधिक काळ वेदना होत राहतात.
   कोळसुंदाच्या कोवळ्या रोपांची भाजी करता येते. यात क जीवनसत्व, फ्लेवोनाईडस तसेच काही स्टेरॉइडस् असतात. परंतु तरीही खाद्य म्हणून ही वनस्पती फारशी प्रसिद्ध नाही. बऱ्याचदा अनावश्यक तण म्हणून पाहिली जाणारी ही वनस्पती ‘ऑनलाईन शॉपिंग’ पोर्टल्सवर मात्र लक्षवेधी आहे. अनेक नामांकित खरेदी संकेतस्थळांवर कोलित्र्याच्या बिया उपलब्ध आहेत. या बिया थोडा वेळ तोंडात ठेवल्यास बुळबुळीत होतात, त्यानंतर त्याची चवही चांगली होते. आयुर्वेदीय चिकीत्सापद्धतीमध्ये पूर्वांपार कोळसुंद्याचा वापर होत आहे. मधुमेह, संधीवात, काविळ, मूत्रविकार इत्यादींवर ही वनस्पती लाभकारक ठरते.


या वनस्पतीची पाने ठेचून, मधाबरोबर खाल्ल्यास खोकल्यापासून आराम मिळतो. गेल्या वर्षभरात रुग्णांकडून ‘श्वास घेण्यास त्रास होणे’ ही सर्वाधिक नोंदवली जाणारी तक्रार होती. या त्रासावर कोळसुंद्याच्या बियांचे चूर्ण मध आणि साजूक तुपासोबत दिला जात असल्याचे सांगीतले जाते. हेच चूर्ण दह्यासोबत दिल्यास अतिसारावर फायदेकारक ठरते. ‘काढाप्रेमींसाठी’ चांगली बाब म्हणजे या वनस्पतीचा देखील काढा करता येतो. मुळांचा काढा मूत्रविकार, जलोदर यांसारख्या विकारांवर उपयुक्त ठरतो. तर पानांचा काढा काविळ, अॅनिमिया साठी वापरला जातो. कोळसुंदा म्हणजेच हायग्रोफिला ऑरिक्युलाटा ‘ऑनलाईन खरेदी’ प्रकारामध्ये प्रसिद्ध होण्याचे कारण ‘चरक संहितेत’ दडले आहे. यातील ‘शुक्रशोधन महाकषाय’ मध्ये कोकीळाक्षचा उल्लेख आहे. शुक्रशोधन या नावावरूनच त्याचे उपयोग लक्षात आले असतील. कोळसुंदा वंध्यत्व व तत्सम लैंगिक विकारांवर वापरला जातो.
      

कोकीळाक्षचा वापर प्राचिन काळापासून होत असला तरी त्याच्या :औषधीय परिणामांवर अजूनही पुरेसे संशोधन झालेले नाही. आतापर्यंतच्या संशोधनांचा भर हा त्याच्या पारंपारिक उपयोगांना सिद्ध करण्यापुरताच झाला आहे. एप्रिल २००६ मध्ये इथनोफॉर्मकोलॉजी नावाच्या जर्नलमध्ये या वनस्पतीच्या मधुमेहावरील उपचारांसंबंधीचे संशोधन प्रकाशित झाले आहे. परंतु हे संशोधन उंदरांचा वापर करून झाले आहे. यापूर्वीच्या प्रयोगांमध्येसुद्धा प्रयोगशाळेतील प्राण्यांचाच वापर केला गेला आहे. लोककथेत खलनायक असलेल्या कोलित्र्याला पारंपारिक चिकीत्सापद्धतीने औषधीय नायकत्व प्रदान केले आहेच, आता नेमक्या आणि अचूक संशोधनाद्वारे त्यावर शिक्कामोर्तब होणे गरजेचे आहे.

- तुषार म्हात्रे

No comments:

रायगडची लोहयुगीन संस्कृती

रायगडची लोहयुगीन संस्कृती मँडागोरा! ‘पेरिप्लस ऑफ इरिथ्रीयन सी’ या अत्यंत पुरातन आणि महत्त्वपूर्ण दस्ताऐवजांमध्ये नोंदवले गेलेले एक बंद...