Search This Blog

Wednesday, June 24, 2020

पैंजण खुणा


         बायने चिनूला हलकेच उठवले. बाहेर पडताना आतून कडी लावण्याच्या सूचना तिला दिल्या. जाताना शेजारच्या नंदाला तिने आवाज दिला. नंदादेखील आज सोबतीला येणार होती. नंदाच्या घरचा दरवाजा उघडला गेला. दारातच उभे राहून तिने येणार नसल्याचे खुणवले. पहाटेची वेळ असली तरी अंधार होता. बाहेर एकटीने जायची हिंमत नव्हती. पण फार थांबून चालणार नव्हते. उजाडायच्या आत बायला घरी परत यायचे होते. आज चिनूसाठी जाणे गरजेचे होते. 
          चिनू ही बायची मुलगी. ती यंदा आठवीच्या वर्गात गेली होती. चिनू चौथीला असतानाच वडीलांचे निधन झाले होते. खारपट्टयातल्या आपल्या लहान शेतात बायला आपला पती निष्प्राण अवस्थेत आढळला होता. कधी काळी जोमाने पिकणारा जमिनीचा तो लहानसा तुकडा हाच दोघींच्या विश्वाचा सध्याचा आधार होता. समुद्रातून येणारे खारे पाणी अडवणारी बांधबंदिस्ती उध्वस्त झाल्यानंतर हा उरलासुरला आधारही खाऱ्या पाण्यात नासून गेला. त्यामुळे दोघींचे पोट भरण्यासाठी बाय अधूनमधून मिळणाऱ्या मजुरीच्या कामांबरोबरच, खाडीकिनारी मासेमारी करायची. कधी ‘आसू’ म्हणून ओळखले जाणारे लहान जाळे, कधी  ‘हिला’ तर कधी खेकडे पकडण्यासाठीचे ‘पेन्सान’ ;  गरजेनुसार बायची आयुधे बदलत असायची. यातून मिळणारी थोडीफार मासळी चिनू गावाच्या नाक्यावर जाऊन विकायची. ही ताजी पण लहान मासळी वाट्यावर विकली जायची. या सर्व उपद्व्यापातून त्या दिवसाचे कसेबसे भागायचे.  पण चिनूच्या शिक्षणाचा खर्च, औषधपाणी आणि इतर खर्च भागवताना बायला ब्रम्हांड आठवायचे.  गणेशोत्सव तोंडावर आलेला, शेतीची कामेही विसावलेली. मागच्या महिन्यापासून चिनूने नव्या पैंजणांसाठी हट्ट धरलेला. खरेतर आधीच्याच वर्षी बायने चिनूसाठी उर्साच्या बाजारातून नवे पैंजण घेतले होते. पण आता त्या खोट्या पैंजणांचा रंग बायच्या चेहऱ्यासारखाच निस्तेज झाला होता. चिनूच्या मैत्रिणी चांदीचे पैंजण घालायच्या. कपडे धुवायला विहिरीवर गेल्यावर थोडेसेच घासल्यानंतर चमकणारे मैत्रिणींचे पैंजण पाहून चिनूचे डोळेही चमकायचे.
यंदा काहीही करून चांदीचे छुमछुम वाजणारे पैंजण घ्यायचा निश्चय तिने केला होता. त्यासाठी मासे विकल्यानंतर येणाऱ्या पैशातून बचत करून चिनूने काही पैसे साठवले होते. पण कधी किराणा सामान संपले म्हणून तर कधी वीजबील भरण्यासाठी, तिने साठवलेला गल्ला वापरला गेला. आपल्या परिस्थितीची जाणीव ठेवून कधी फारसा हट्ट न करणाऱ्या चिनूची ही चंदेरी इच्छा पूर्ण करण्याचे बायने ठरवले. नेहमी मिळणाऱ्या मासळीपेक्षा थोडी मोठी मासळी मिळाली तर हजार-दोन हजार रुपयांची एकरकमी व्यवस्था होण्याची थोडीफार शक्यता होती. गौरींच्या सणापूर्वी चिनूच्या पायात पैंजणांचा आवाज यायला हवा, बायने मनोमन ठरवले होते.
        विचारांच्या गर्तेत बायने झपझप चालायला सुरूवात केली. आज तिने आपली नेहमीची आयुधे घेतली नव्हती. फक्त मच्छी साठविण्यासाठीचा बांबूच्या काड्यांनी विणलेला एक मोठ्ठा डोबुकरा आणि तो कमरेला बांधण्यासाठीचे एक फडके या दोनच गोष्टी सोबत होत्या. अंधार असला तरी रस्ता नेहमीचाच होता. तिच्या घट्टे पडलेल्या अनवाणी पायांना खडे जाणवतही नव्हते. भिती वाटत नव्हती पण नंदा सोबत असायला हवी होती असे बायला वाटले. खारीतल्या ओसाड शेताच्या बांधांवरून गेलेल्या रस्त्यावरून बराच वेळ चालल्यानंतर ती मीठागरापाशी पोहोचली. सूर्य उगवायला काही अवधी बाकी होता, पण दिशा उजळल्या होत्या.
या मंद प्रकाशात बांधरस्त्यावरच्या मीठाच्या झाकलेल्या राशी टेकडीसारख्या भासत होत्या. बाजूला एक लहान कौलारू चौकी होती. बरेचसे मीठकामगार म्हणजेच खारवे इथेच रहायचे. परंतु मीठ बनवण्याचे काम संपले असल्याने आता या चौकीत एखादाच राखणदार असण्याची शक्यता होती. बाय मीठागरात जाण्यासाठी बनवलेल्या लाकडी साकवावरून आत उतरली. उन्हाळ्यात चमचमणाऱ्या मीठाच्या थरांनी भरलेल्या चौकोनी कोंड्या सध्या पाण्याने भरल्या होत्या. पावसामुळे कोंड्यांचे बांध ढळले असले तरी मूळ रचना हरवली नव्हती. पण पावसाच्या पाण्यामुळे त्यांना एखाद्या उथळ हौदाचे रुप आले होते. काही कोंड्यांमध्ये शेैवाल, पाणवनस्पती साठल्या होत्या. कोंड्यांमध्ये फूट-दोनफूट पाणी असावे. झाकून ठेवलेले मीठ राखण्यासाठी चौकीत एकतरी खारवा रहात असल्याने गेल्या तीन-चार महिन्यांपासून या पाणी साठलेल्या मीठागरात कोणी प्रवेश केला असल्याची शक्यता नव्हती. पावसाळ्यात बरेचसे समुद्री जीव या पाण्यात विसावलेले असतात. त्यामुळे इकडे तिकडे नशिब आजमावण्यापेक्षा इथेच मासे मिळण्याची खात्री जास्त. बायने हाच विचार करून कोंड्यांमध्ये हळूवार पाऊल ठेवले. पाण्यात फार आवाज  करून चालणार नव्हते. राखण करणारा खारवा उठण्यापूर्वी कमरेला बांधलेला मोठ्ठा डोबुकरा चांगल्या मच्छीने भरणे गरजेचे होते.
या फुटभर खोल पाण्यात कोणतेही जाळे न वापरता हाताने चाचपून मासे धरण्याचे एक तंत्र वापरले जाते. बायकडे ते कौशल्य होतेच. बायने आयताकार कोंडीच्या एका टोकापासून चाचपायला सुरूवात केली. तिच्या हालचालींनी नितळ पाणी ढवळले गेले. लहान लहान मासे पाण्यात धावायला लागले. त्यांच्याकडे दुर्लक्ष करून थोड्या मोठ्या आशेने बाय गुडघ्यांवरच पुढे  सरकू लागली. पाण्याखालील चिखलात एक मासा मिळाला, चांदीच्याच रंगाचा. बायला चिनूच्या पायातल्या संभाव्य पैंजणांचा रंग आठवला. बाय पुढे जात होती, मासे मिळत होते. तिची एक नजर चौकीकडे होती. कोंडीतल्या सर्व शक्यता चाचपून झाल्यानंतर बाय कोंडीच्या दुसऱ्या चौकटीत उतरली. इथेही हाताला चांगलेच मासे मिळत होते. कोंडीच्या एका कोपऱ्यावर चाचपताना बायच्या हाताला थोडे टणक कवचासारखे काहीतरी लागले. तिने ओळखले. पण न पाहता त्याला हात लावायची हिंमत होईना. त्याची जागा लक्षात ठेवून बायने कोपऱ्यातल्या हार या जल वनस्पतीकडे पाहिले.
आपला स्पर्श झालेला जीव खेकडा असल्याची बायला खात्री होती. त्यामुळे खेकड्याच्या नांग्यांपासून वाचण्यासाठी ही जाळीदार वनस्पती वापरल्यास थोडेफार संरक्षण होते, हे ओळखून बायने पाण्यातले हार आपल्या जवळ ओढले. लक्षात ठेवलेल्या जागेवर जाऊन वनस्पतीची जाळी गुंडाळलेल्या हाताने चाचपले. तिथे काहीही नव्हते. बहुतेक खेकड्याने जागा सोडली होती. बायने आजूबाजूला हात फिरवला. निराशेने ती उभी राहीली. पुढे पाऊल टाकल्याबरोबर तिच्या पायाच्या घोट्याला जोरकस चावा बसला. कळ मेंदूपर्यंत गेली. तिच्या तोंडून जोरदार किंचाळी बाहेर पडली. ओरडत असतानाच तिने एका हाताने घोट्याजवळच्या खेकड्याला हात घातला. तिच्या अपेक्षेपेक्षा कितीतरी मोठ्या आकाराचा तो खेकडा होता. घोट्याभोवतीची नांगीची पकड सोडवावी की खेकडा पकडावा या विचारात असतानाच चौकीत हालचाल झाली. काठी आपटत एक खारवा तिच्या दिशेने पळत येताना दिसला. बायने धाडसाने वाकून खेकड्याच्या दोन्ही नांग्या दाबून धरल्या. खेकड्याने स्वत:च्या बचावासाठी चावरी नांगी शरीरापासून मुक्त केली. त्याबरोबर बायने त्या एकच नांगी शिल्लक असलेल्या खेकड्याला उचलून दोन्ही हातांनी घट्ट पकडून ठेवले. दोन हातांमध्येही तो खेकडा नीटसा मावत नव्हता. तोपर्यंत चौकीतला राखणदार ओरडत आला होता. दोघांमध्ये फक्त पंचवीसएक पावलांचे अंतर होते. बायच्या पायाच्या घोट्याला त्या खेकड्याची नांगी घट्ट रुतली होती. पण आता वेळ नव्हता. तीने एकदा कमरेचा फडका घट्ट केला आणि एका हातात खेकड्याला पकडून पळत सुटली. पाण्यातून सहज पळता येत नव्हते. प्रत्येक पावलागणिक घोट्यातून कळ येत होती. बायने तीन चार कोंड्या सहज पार केल्या. या दिशेला मीठासाठी पाणी घेण्यासाठीचा एक अरूंद नाला होता. तो पार करण्यासाठी साकव नव्हता. बायने त्यात उडी टाकून दोन पावलांत तो पार केला. मागे वळून पाहिले, खारवा कंटाळून थांबला होता. बाय तशीच बांधावरच्या मुख्य रस्त्याला लागली. आता कोणी मागावर येण्याची शक्यता नव्हती.आता लख्ख उजाडले होते. या उजेडात बायने घोट्याला घट्ट बसलेली नांगी पाहिली. ही मोठ्ठी नांगीसुद्धा खेकड्यासोबत विकता येईल, बायने विचार केला. तिने कमरेला बांधलेले फडके सोडले. डोबुकऱ्यातील मासळी समाधानाने पाहिली. त्यात हातातला मोठ्ठा खेकडा मावणार नव्हता. त्यामुळे त्याला तसेच फडक्यात गुंडाळून ठेवले. घोट्यावरची एक नांगी तशीच होती. नांगीचे दात तिच्या हडकुळ्या शरीरात रुतले होते. बायने दोन्ही हातांनी जोर करून घोट्यावरच्या निर्जीव नांगीची जीवघेणी पकड सोडवण्याचा प्रयत्न केला, पण यश आले नाही. बऱ्याचदा ही पकड सोडविण्यासाठी नांगीच चावायची असते. पण पायाकडील ही नांगी बायला चावताही येईना. खाली बसून तिने एका दगडावर आपला दुखरा उजवा पाय ठेवला. दुसऱ्या लहान दगडाने ती नांगी ठेचली. दगडाचे दोन फटके बसताच पकड सैल झाली. नांगी आणि पाय दोन्ही मोकळे झाले. दात रुतलेल्या जागेतून रक्त येत होते. वेदना होत होत्या. ठेचलेली मोठी नांगी विकता येणार नाही म्हणून बाय नाराज झाली. उठून तिने खाऱ्या पाण्यात तो रक्ताळलेला पाय धुवून काढला. जखमेला खारे पाणी झोंबत होते. पण आता पळायचे नसल्याने तीला बरे वाटू लागले. हातातल्या वजनदार आणि गच्च भरलेल्या डोबुकऱ्याने तिला हलके हलके वाटत होते.  
          घरी येईपर्यंत चिनूने चूल पेटवून पाणी गरम करून ठेवले होते. बायने मासळी एका भांड्यात ठेवली. त्याचे वाटे बनवून चिनूला त्यांची किंमत समजावली. फडक्यातला मोठा खेेकडा तिनशेच्या खाली कोणाला देऊ नको म्हणून सांगीतले. इतकी चांगली मासळी पहिल्यांदाच मिळाली होती. चिनूच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला. हे वाटे घेऊन चिनू गावातल्या नाक्यावर मच्छी विकायला निघून गेली. अंगावर कडक तापलेले पाणी घेऊन बायने आपला थकवा घालवला. जखमेच्या जागी हळद लावली. भाकरीचे पीठ घेऊन नेहमीच्या तयारीला लागली. सोबत खेकड्याच्या ठेचलेल्या नांगीचे कालवण बनवायला घेतले. काही तासांनी चिनू परत आली. चिनूने आज एकाही वाट्याची किंमत कमी केली नव्हती, तरीदेखील सगळी मासळी विकली गेली होती. खोचलेल्या पिशवीतून तिने आजच्या विक्रीचे सर्व पैसे जमिनीवर ओतले. नोटा, नाणी मोजायला सुरूवात केली. दहाची एक फाटकी नोट त्यात होती. ती नंतर चिकटवून वापरता येईल म्हणून वेगळी ठेवली. “दोन हजार दोनशे तीस!” चिनू आनंदाने म्हणाली. आज चांगलीच कमाई झाली होती. बायने त्यातले दोनशे वीस रुपये व दहाची फाटकी नोट बाजूला काढली. दोन हजार रुपये तिच्या बटव्यात ठेवले. दुसऱ्या दिवशी बाय चिनूला घेऊन तालुक्याच्या बाजारात गेली. हजार रुपयांपर्यंतचे पैंजण तिला घ्यायचे होते. दागीन्यांची एक दोन दुकाने पालथी घातल्यानंतर एका ठिकाणी तिच्या आवडीची साखळीची नक्षी असणारे पैंजण दिसले. हौसेने हातात घेऊन न्याहाळताना, त्यावर लटकलेली अठराशे रुपयांची चिठ्ठी चिनूला दिसली. तिने अलगदपणे ते पैंजण हातातून खाली ठेवले. बायला कागदावरचे वाचता येत नव्हते, पण तिने मुलीच्या डोळ्यांतले भाव मात्र अचूक वाचले. अठराशे रुपये रोख मोजून बायने तेच पैंजण घेतले. दोघी घरी आल्या.
       घरात पाऊल ठेवताच चिनूने गडद गुलाबी रंगाच्या कागदातील चांदीचे लख्ख चमकणारे पैंजण काढले. कानाजवळ नेऊन त्याच्या घुंगुरांचा आवाज ऐकला. बायला हाक मारून बसण्यास सांगीतले. पैंजण स्वत:च्या पायात घालण्यापूर्वी एकदा आईच्या पायात घालण्यासाठी तिने बायला एक पाय पुढे करण्यास सांगीतला. बायने गंमतीने हसून उजवा पाय पुढे केला. चिनूने बायच्या पायाचा घोटा पाहीला. खेकड्याच्या नांगीतील दातांनी झालेल्या जखमांपासून एक विलक्षण साखळीसारखी नक्षी बायच्या घोट्यावर तयार झाली होती... 
अगदी चिनूच्या हातातील पैंजणांसारखी...!

- तुषार म्हात्रे (tusharki)

No comments:

रायगडची लोहयुगीन संस्कृती

रायगडची लोहयुगीन संस्कृती मँडागोरा! ‘पेरिप्लस ऑफ इरिथ्रीयन सी’ या अत्यंत पुरातन आणि महत्त्वपूर्ण दस्ताऐवजांमध्ये नोंदवले गेलेले एक बंद...