Search This Blog

Friday, August 9, 2019

सन हाय, नारली पुनवंचा...

सन हाय, नारली पुनवंचा...
(http://product.sakaalmedia.com/portal/SM.aspx?ID=158111 )

      उरण तालुक्यातील करंजा परिसरातील दृश्य. शाळेतले विद्यार्थी आपल्या शिक्षकांच्या मदतीने कसलीतरी कलाकृती बनवण्यात गर्क आहेत. दोन तीन लहान बांबू, वर्तुळाकार लोखंडी सळ्या, काही जाडे भरडे कापड, सोनेरी कागदं, सोललेल्या नारळांचा भाग यांसारख्या वस्तूंची जमवाजमव चाललेली. पुरेशी सामग्री जमल्याची खात्री पटल्यानंतर उत्साहाने प्रत्यक्ष कामाला सुरूवात होतेय. बांबूच्या पट्टयांना अंडाकृती आकार देऊन आता तो एका हातगाडीवर ठेवला जातोय. नंतर त्याला जाड कापडाने लपेटले जाईल. त्याभोवती चमकदार सोनेरी कागद चिकटवून एक भला मोठा सोन्याचा नारळ तयार होईल. ही सर्व उठाठेव चालू आहे ती येऊ घातलेल्या पौर्णिमेसाठी; ‘नारळी पौर्णिमे’साठी! समस्त कोळी बांधवांचा हा सर्वात महत्त्वाचा सण. या दिवशी येथील विद्यालयातून वाद्ये आणि लेझिमच्या तालावर पारंपारिक वेशभूषा केलेल्या विद्यार्थ्यांच्या साथीने सोन्याच्या नारळाची मिरवणूक समुद्राच्या दिशेने निघेल. गेल्या कित्येक वर्षापासून करंजा येथील द्रोणागिरी हायस्कूलचे विद्यार्थी आपल्या कलेच्या माध्यमातून  संस्कृतीशी नाते जोडणाऱ्या या अनोख्या उपक्रमात सहभागी होतात.

       रायगड जिल्ह्यातील उरण, अलिबाग परिसरातील कोळी लोकांचा मुख्य व्यवसाय  मासेमारी. समुद्रातून जाळ्याच्या साहाय्याने मासे पकडणे आणि ती बाजारात विकण्यासाठी घेऊन जाणे हे मुख्य काम. उदरनिर्वाहासाठी ते वर्षाचे आठ महिने म्हणजेच नारळी पौर्णिमेपासून ते शिमगा-होळीपर्यंत खोल समुद्रात मासेमारी करतात. जून महीन्यापासून आपल्या भागात पावसाला सुरुवात होते. पावसाळ्यात समुद्राचे रौद्र रूप त्यांना मासेमारीसाठी धोकादायक असते. हाच काळ माशांचा प्रजनन काळ असतो. यामुळे या काळात मासेमारी बंद असते.या दरम्यान मासेमारी केल्यास समुद्रातील मत्स्यजीवांची संख्या घटत असल्याने दर वर्षी या कालावधीत खोल समुद्रातील मासेमारीवर बंदी घालण्यात येते. यामुळेच हे कोळी बांधव पावसाळ्यात खाडीतील लहान - सहान मासे पकडून आपली गुजराण करतात. यासह सुक्या मच्छीच्या विक्रीतूनही त्यांना उत्पन्न मिळते. या बंदीच्या काळात होड्यांची डागडुजी करणे, रंगरंगोटी करणे, जाळे विणने यांसारखी कामे हातात घेतली जातात.


        श्रावण पौर्णिमेपासून मच्छीमारीसाठी होड्या समुद्रात सोडल्या जातात. लहान व्यापारी जहाजेही याच काळात समुद्रात प्रवेश करतात. पावसामुळे रौद्ररूप धारण केलेल्या दर्याराजाला, ‘आता तू शांत हो. तुफान, वादळ यापासून आमचे रक्षण कर’ असे म्हणत नारळ अर्पण केला जातो. समुद्र नावाची स्वतंत्र देवता पुराणांत उल्लेखली असली तरी इथे सागराची पूजा म्हणजेच वरुणदेवतेची पूजा. समुद्राचे जल हे वरुणाचे रुप मानून त्याची प्रार्थना या दिवशी केली जाते. इंद्र-अग्नि-वरूण हे  वैदिक देवता संघातील त्रिकूट. पौराणिक काळात इंद्र व अग्नीसह वरूणदेवाचे स्थान ढळून तो फक्त ‘यादसांपति’ म्हणजे जल जंतूंचा स्वामी  असे नाव धारण करून पश्चिम दिशेचा अधिपती म्हणून विख्यात झाला. पश्चिम समुद्राच्या पलिकडे त्याची ‘विश्वावती’ नावाची नगरी असल्याचे मानले जाते. मगर वाहन असलेला वरूण आपल्या हाती कमल, पाश व घट धारण करतो. परंतु कालांतराने वरूणाच्या प्रतिमांऐवजी केवळ पाण्याने भरलेल्या कलशाचे पूजन करण्यात येऊ लागले. याच पद्धतीने वरूणाला स्मरून समुद्राच्या जलाचे पूजन केले जाते.
या दिवशी समुद्राला श्रीफळ अर्पण करण्यासाठी प्रत्येक कोळी कुटुंबातला एखादातरी  पुरुष जातोच. गावकरी नवीन वस्त्रालंकार घालून ढोल, ताशे, सनई यांसह वाजतगाजत समुद्राकाठी जातात आणि सागराची पूजा करून त्याला नारळ अर्पण करतात आणि प्रार्थना करतात. या दिवशी मुंबई,रायगड येथील कोळीवाड्यात नारळी पौर्णिमेची लगबग पहायला मिळते. कोळी महिलांसह लहान मुले घराघरांत सजावट करतात. किनारी नांगरून ठेवलेल्या होड्यांना रंगरंगोटी करतात,  होड्या सजवतात. नैवेद्यासाठी ओल्या नारळाच्या करंज्या, नारळी भात, नारळी पाक तयार करतात. कोळीवाड्यातील उत्साह यादिवशी समुद्राच्या लाटांसारखाच उसळतो. काही ठिकाणी भव्यदिव्य मिरवणुका काढण्यात येतात. मासेमारी करणारे लोक दर्याराजाला नारळ अर्पण करून मासळीचा दुष्काळ सरण्याचे आवाहन करतात. या दिवशी समुद्रकिनाऱ्यावर कोळीनृत्यासह आनंदोत्सव साजरा केला जातो. अखेर सजवलेल्या बोटी समुद्रात ढकलून सागरप्रवासाला, मासेमारीला पुन्हा एकदा आरंभ केला जातो.
    काळाप्रमाणे या सणामध्येही जुन्या कोळीगीतांसह आधुनिक गीत-संगीताचाही शिरकाव झालाय. पारंपारिक वाद्यांची जागा डॉल्बी सिस्टीमने घेतलीय. उत्साह तसाच आहे, पद्धत बदललीय. कर्णमधुर आवाजाची जागा, कर्णकर्कश आवाजाने घेतलीय.  आवाजाच्या खवळलेल्या समुद्रात करंजा येथील विद्यार्थी अर्पण करत असलेला कलेचा श्रीफळ नक्कीच आशादायी आहे. हाच दृष्टीकोन इतरांनीही ठेवला तर खऱ्या अर्थाने आनंद लुटता येईल; सर्वांनाच!

- तुषार म्हात्रे, पिरकोन (उरण)

(विशेष आभार : निलेश म्हात्रे, दिनेश जोशी, विजय पाटील)

No comments:

रायगडची लोहयुगीन संस्कृती

रायगडची लोहयुगीन संस्कृती मँडागोरा! ‘पेरिप्लस ऑफ इरिथ्रीयन सी’ या अत्यंत पुरातन आणि महत्त्वपूर्ण दस्ताऐवजांमध्ये नोंदवले गेलेले एक बंद...