Search This Blog

Tuesday, November 20, 2018

ना बचेगा बास...

ना बचेगा बास...

एक जुनी लोककथा आहे. एका खूप दूरवरच्या देशात जिथे मासेच नव्हते, तिथला माणूस कंदमुळे, फळे आणि इतर प्राणी खाऊन आपली गुजराण करत असे. या अनोख्या जगात ‘बूडी आणि यालिमा’ नावाचे एक प्रेमी जोडपे होते. अर्थातच यालिमाच्या घरातून या प्रेमाला विरोध होता.मग, दोघांनी पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघेही दूर पळून जाण्यात यशस्वी झाले खरे, पण लवकरच त्यांना गावातील जुन्या विचारांच्या मंडळींनी गाठले. या मंडळींच्या दृष्टीने या विवाहाला एकच शिक्षा होती, मृत्यूदंड. स्वत:चा जीव वाचवण्यासाठी बूडी आणि यालिमा वाट फुटेल तिकडे पळत सुटले. पळता पळता जमिन संपली व समुद्र सुरू झाला. त्यांच्या पाठलागावर ते कर्मठ लोक होतेच. शेवटचा पर्याय म्हणून बूडीने किनाऱ्यावर पडलेल्या लाकडांचे भाले केले व ते पाठलाग करणाऱ्या लोकांवर फेकले. पण विरोधकांची संख्या खूपच जास्त होती. अखेर बूडीचे भाले संपले. विरूद्ध बाजूंनीही भाल्यांचा वर्षाव झाला. हताश बूडी आणि यालिमानं समुद्रात उडी घेऊन जीवनाचा शेवट केला.

     पण लोकं म्हणतात, ते दोघे अजून जिवंत आहेत, एका माशाच्या रुपात. तो मासा लोकांची चाहूल लागताच  खारफुटींच्या झाडांलगत चिखलात जाऊन लपतो. लोकांनी फेकलेले भाले अजूनही त्याच्या शरीरावर आहेत, काट्यांच्या रुपात.”
   ही खरंतर माशाच्या वैशिष्ट्यांवर आधारीत एक दंतकथा. पण या कथेवर विश्वास ठेवणाऱ्यांच्या मते हा मासा त्यांना नवतारूण्य प्रदान करतो.

    बारामंडी पर्च (Barramundi Perch) या नावाने ओळखला जाणारा  व ऑस्ट्रेलियन लोककथेत प्रेमाचे प्रतिक बनलेला मासा म्हणजे आपल्याकडील सुप्रसिद्ध असा ‘जिताडा मासा’. लॅटीडी कुळातील या माशाला सी बास (Sea Bass) असेही म्हणतात. त्याच्या मुंबई परिसरात आढळणाऱ्या प्रजातीचे शास्त्रीय नाव आहे लॅटस कॅल्सरीफर (Lates Calcarifer). समुद्राच्या खाऱ्या पाण्यात जन्माला येऊन, गोड्या पाण्यात आयुष्य व्यतित करणारे हे मासे रायगड जिल्ह्याच्या खारपट्यातील भातशेतींच्या खाचरांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळतात. खारे पाणी ते गोडे पाणी या स्थलांतरामध्ये जिताड्यांनी चारशे मैलाचे अंतर कापल्याची नोंद आहे. बदलत्या तापमानातही जिताडा बऱ्यापैकी तग धरू शकतो.
     ‘बारामंडी’ या प्राचीन शब्दाचा अर्थ होतो ‘मोठ्या खवल्यांचा चंदेरी मासा’. या नावाप्रमाणेच जिताड्याचा पोटाकडील भाग चंदेरी रंगाचा असून
 उर्वरीत भाग करडा असतो. विणीच्या हंगामात त्याच्या अंगावर जांभळट छटा दिसतात. आकाराने मोठी, पातळ असणारी ही खवले काहीशी वक्र असतात. खवल्यांच्या कडांवर बारीक दातासारखे काटे असतात. ही खवले म्हणजे त्यांचे ‘बर्थ सर्टीफिकेट’. कारण या खवल्यांवरील वर्तुळांच्या साह्याने या माशाचे अंदाजे वय काढता येते. लोककथेतील भाल्यांची आठवण करून देणारे टोकदार काटे त्याच्या पाठीवरील आणि शेपटाकडील परांमध्ये असतात. जिताडा मांसाहारी व खादाड असून लहान कवचधारी प्राणी, गोगलगाई यांच्यासह तो स्व:जातीतील लहान माशांनाही खातो. त्यामुळे एखाद्या बंदिस्त व आकाराने लहान तलावात मोठे जिताडे असल्यास त्या तलावातील इतर लहान माशांची संख्या वेगाने कमी होण्याची शक्यता असते.

       स्वत:चे अस्तित्व टिकवण्यासाठी जिताड्याला काही अंगभूत वैशिष्ट्ये लाभली आहेत. अभ्यासकांच्या निरीक्षणांतून ‘जिताडा स्वत:च्या चुकांमधून शिकतो’ असे निष्कर्ष समोर आले आहेत. मासेमारांच्या गळाला लागलेला, जाळ्यात अडकलेला हा मासा चुकून सुटलाच तर पुन्हा तशाच प्रकारे तो सहसा जाळ्यात अडकत नाही. या विशेष बुद्धीमत्तेसह सूक्ष्म वारंवारतेच्या ध्वनीलहरी तो ओळखू शकतो. त्याचा वापर करून आपल्या शत्रूपासून बचाव करणे त्याला शक्य होते. कमी दृश्यमानता असणाऱ्या पाण्यात आपले अन्न शोधतानाही या लहरी ओळखता येणाऱ्या अंगभूत कौशल्याचा हा मासा वापर करतो. जिताड्याच्या डोळ्यांमध्ये ‘लाल रंग’ ओळखता येणाऱ्या रंगसंवेदन पेशी असतात, त्यामुळे त्याला हा रंग ओळखू येतो व त्याकडे तो आकर्षितही होतो. (बेधडकपणे सिग्नल तोडून जाणाऱ्यांच्या डोळ्यांत अशा रंगपेशी नसतील काय हो?)

       या माशांच्या बाबतीतली आश्चर्यकारक बाब म्हणजे, ते जन्मजात पुरूष असतात. काही वर्षानंतर या नर माशांपैकी काही मासे मादीत विकसीत होतात. मादीत रुपांतरीत झाल्यानंतर प्रजोत्पादन काळातील पौर्णिमेला हे मासे अंडी देतात.नर जिताडा हा कुटूंबवत्सल प्राणी असून अंडी देण्याच्या या काळातही तो मादीला मदत करतो.  त्यामुळे आकाशात पूर्ण चंद्र असताना स्वच्छ पाण्यात जिताड्यांच्या चमकत्या जोड्या फिरताना दिसतात. त्यांना असे पाहणे ही एक पर्वणीच असते; अभ्यासकांच्या दृष्टीने आणि मासेमारांच्या दृष्टीनेही! या अंड्यांची संख्या लाखांनी असू शकते. या अंड्यांचे रक्षण करण्याची जबाबदारीही नर जिताडा स्विकारतो.
      अत्यंत चविष्ट मासा म्हणून तो प्रसिद्ध आहेच. पण व्यावसायिकदृष्ट्याही तो उपयोगी आहे. त्याच्या शरीरात वाताशय नावाचा फुग्यासारखा भाग असतो. या फुग्यापासून  ‘आयझिंग्लास’(Isinglass)  हा जिलेटिनयुक्त पदार्थ तयार करण्यात येतो. याचा उपयोग मद्य विशुद्ध करण्यासाठी होतो.
बहुपयोगी आणि जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असा हा जीव, सध्या गोड्या पाण्यात प्रवेश करण्यासाठी झगडत आहे. नवी मुंबई, रायगडच्या समुद्रकिनाऱ्यावरील खाऱ्या पाण्यातून गोड्या पाण्यात येण्यासाठीचे ‘खोशी’, ‘आखंदा’, ‘पऊल’ या स्थानिक नावांनी ओळखले जाणारे पाण्याचे लहान प्रवाह परिसरातील ट्रान्सपोर्ट कंपन्यांद्वारे बुजवले गेल्याने, जिताड्यांचे प्रवेश मार्ग शब्दश: खुंटले गेले आहेत. निसर्गाच्या व्यवस्थापनाला दुर्लक्षून होत असलेला हा अनैसर्गिक विकास असाच कायम राहीला, लवकरच ‘ना बचेगा बास...’ असेच म्हणायची वेळ येईल.

- तुषार म्हात्रे, पिरकोन (उरण)

No comments:

रायगडची लोहयुगीन संस्कृती

रायगडची लोहयुगीन संस्कृती मँडागोरा! ‘पेरिप्लस ऑफ इरिथ्रीयन सी’ या अत्यंत पुरातन आणि महत्त्वपूर्ण दस्ताऐवजांमध्ये नोंदवले गेलेले एक बंद...