Search This Blog

Saturday, November 17, 2018

स्टीव्ह आणि स्टिंग

स्टीव्ह आणि स्टिंग!’
       भारतापासून दूर ऑस्ट्रेलियातल्या क्विन्सलँड समुद्रकिनारी ‘Ocean's Deaadliest’ या लघुपटाचे चित्रिकरण चालू होते. या लघुपटाशी संबंधित दोन व्यक्ती तिथल्या उथळ पाण्यात उतरल्या. त्यातील एक जस्टीन नावाचा कॅमेरामन चित्रिकरण करत होता. चित्रिकरण थांबल्यानंतर आपल्या मुलीसाठी शाळेच्या प्रोजेक्टचा एक भाग चित्रीत करण्यासाठी “एक शेवटचा शॉट!” म्हणत जस्टीनचा साथीदार पुन्हा एकदा पाण्यात उतरला. काही वेळातच पाण्यातील ती व्यक्ती एका समुद्री जीवाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाली, त्या प्राण्याने काही सेकंदाच्या अवधीत शंभरहून अधिक वेळा आपल्या शेपटाचे तडाखे दिले. या हल्ल्यात जस्टीनचा साथीदार म्हणजेच ‘द क्रोकोडाईल हंटर’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या स्टीव्ह आयर्विनचा दुर्दैवी अंत झाला. शिकारी नसलेल्या या क्रोकोडाईल हंटरच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला समुद्री जीव होता ‘स्टिंग रे’.

       ही घटना होईपर्यंत गावच्या मासळीबाजारात ‘पाखट’ या नावाने विक्रीस असलेला हा ‘रे’ मासा इतका धोकादायक असेल हे कित्येकांच्या गावीही नव्हते. या घटनेनंतर मात्र या समुद्री जीवाकडे अधिक कुतूहलाने पाहीलं गेलं. जगभरात या रे माशांकडे Ocean's Deadliest म्हणूनच पाहू लागले.  कूर्चायुक्त शरीर ( cartilaginous) असलेला हा प्राणी मायलिओबॅटीफॉर्म्स (Myliobatiformes) या प्रकारातील समुद्री जीव आहे. 


पृष्ठवंशीय असला तरी त्याची हाडे आपल्या शरीरातील नाक,कानाच्या रचनेसारखी नरम असतात. आकाराने काहीसा वेगळा भासला तरी तो मासाच आहे. शरीररचनेबाबत त्याची शार्क माशांशी जवळीक आहे.  पाखट हा शार्क माशांचा ‘दूर का रिश्तेदार’ असल्याची एक ओळख म्हणजे त्याचा जबडा. शरीराच्या खालच्या बाजूला असलेला हा जबडा दूरदर्शनवरील दंतमंजनाच्या जाहीरातींमध्ये अक्रोड फोडणाऱ्या आजोबांच्या दातांसारखा मजबूत असतो. या वरकरणी लहान वाटणाऱ्या जबड्याने तो शिंपले, कालवे, कोळंबी यांसारख्या कवचधारी प्राण्यांनाही खाऊ शकतो. डोळ्यांची रचना शरीराच्या वरच्या भागात असते. दृष्टी कमकुवत असल्याने त्यांचा वापरही कमीच होतो. या अधू दृष्टीच्या बदल्यात ‘अॅम्पुली ऑफ लोरीझोनी’ (Ampullae of Lorenzini) नावाचं एक अंतर्ज्ञानाचं ‘सहावं इंद्रीय’ या माशाला लाभलंय. शरीराच्या या अनोख्या वैशिष्ट्यामुळे हा मासा आपल्या सभोवतालच्या परिसरातील सूक्ष्म विद्युततरंग ओळखू शकतो. दिलवाल्या भक्ष्यांची ‘दिल की धडकन’ पाखटाच्या पथ्यावर पडते. आपल्या सहाव्या इंद्रीयाच्या साह्याने भक्ष्याच्या हृदयाच्या ठोक्यांमुळे निर्माण झालेले हलके विद्युततरंग तो ओळखू शकतो. या विद्युत तरंगांचा माग घेत त्यांची शिकार करणे पाखटाला सोपे जाते. (रेल्वेस्टेशनवरील तिकीट तपासनिसांनाही असेच हृदयाची धडधड ओळखता येणारे ‘सहावे इंद्रीय’ असते का?) मातीत लपलेले साध्या डोळ्यांनी न पाहता येणारे प्राणीही त्याला अॅम्पुलीयुक्त अंतर्ज्ञानाने पाहता येतात. पाखट प्रजातीतील बरेचसे प्राणी आपल्या शरीराची लहरींसारखी हालचाल  करून समुद्रात पोहतात, तर इतर जाती आपल्या पंखांची पक्षांसारखीच हालचाल करून पोहतात. हे पोहणे म्हणजे पाण्यातील उडणेच. लपाछपी हा या प्राण्यांचा आवडता खेळ . त्यांचे उथळ समुद्रातळातील वाळू अंगावर घेत केलेले लपाछपीचे नाट्यप्रयोग नेहमीच चालू असतात. कधी शिकारी व्हेल मासे, हॅमरहेड शार्क यांच्यापासून बचाव करण्यासाठी तर कधी आपल्या भक्ष्यावर छुपा हल्ला चढवण्यासाठी या लपण्याच्या कौशल्याचा वापर हे मासे करतात. शक्यतो एकट्याने राहणारे हे प्राणी कधी कधी समूहानेही आढळतात. त्यांच्या समूहाला ‘स्कूल’ असे गंमतीशीर नाव आहे. या माशांची मादी नविन जीवाला जन्म देणासाठी योग्य वेळ येण्याची वाट पाहू शकते. मिलनानंतर शुक्राणूंची साठवण करण्याची क्षमता या जीवामध्ये आहे. योग्य वेळ येताच त्यांचे फलन होऊन नविन जीवाची निर्मिती करता येते.

        सामान्यत: पाखट हा प्राणी आक्रमक म्हणून ओळखला जात नाही. त्याला स्वत:ला धोका निर्माण झाल्यास तो सर्वप्रथम पळून जाण्याचा प्रयत्न करतो. स्वत:च्या बचावासाठी त्याच्या शेपटाला एक काटा असतो, या काट्यातील विषजन्य उतींमुळे शत्रूला दूर पळवून लावता येते. त्याच्या दंशामुळे भयंकर वेदना होऊन दंशाच्या जागी सूज येणे, पायात गोळे येणे, थकवा यांसारखी लक्षणे दिसू लागतात. असे असले तरी पाखटाच्या दंशामुळे मृत्यू होणे ही दुर्मिळ घटना आहे. ‘स्टीव्ह आयर्विन’च्या दुर्दैवी घटनेत ‘स्टींग रे’चे दंश हृदयाजवळ आणि संख्येने खूप जास्त असेलेले होते. परिणामी एका अभ्यासू प्राणीमित्राला आपण मुकलो. समुद्रकिनाऱ्यावरील पर्यटकांनाही पाखटाचे दंश सातत्याने होत असतात. थोडी काळजी आणि नियमांचे पालन केल्यास या घटना टाळताही येतात.

          पाखट हा प्राणी सुमारे दहा कोटी वर्षापूर्वीपासून पृथ्वीवर अस्तित्वात असल्याचे जीवाश्मरुपी पुरावे सापडले आहेत. सध्या या जीवाच्या दोनशे वीस ज्ञात प्रजाती आहेत. वाढते जलप्रदुषण आणि अमर्यादीत मासेमारी या मानवाने निर्माण केलेल्या विनाशाच्या जाळ्यात हा जीवही सापडलाय. 2013 च्या आकडेवारीनुसार पाखटाच्या 45 प्रजाती धोक्यात असल्याचे समोर आले आहे. समुद्रातील यांत्रिक वस्तूंच्या वाढत्या वावरामुळे या माशाच्या सभोवतालच्या विद्युत तरंगामध्ये ढवळाढवळ होते. त्याचाही परिणाम या जीवांच्या दैनंदिन जीवनावर होत आहे.
     या प्राण्यांसारख्याच कित्येक जीवांच्या सहवासात स्टीव्हने आपले आयुष्य काढले. त्यांच्या संवर्धनासाठी त्याने प्रयत्न केले. आपल्याला लाभलेल्या या जैवविविधतेचे संवर्धन करणे हीच खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल ‘द क्रोकोडाईल हंटर’ला!
- तुषार म्हात्रे, पिरकोन(उरण)

No comments:

रायगडची लोहयुगीन संस्कृती

रायगडची लोहयुगीन संस्कृती मँडागोरा! ‘पेरिप्लस ऑफ इरिथ्रीयन सी’ या अत्यंत पुरातन आणि महत्त्वपूर्ण दस्ताऐवजांमध्ये नोंदवले गेलेले एक बंद...