Search This Blog

Sunday, November 18, 2018

तेरे मेरे ‘बीच’ पे

तेरे मेरे ‘बीच’ पे!

“तेरे मेरे बींच में ,कैसा है ये बंधन अंजाना...”
 ऐंशीच्या दशकातील ‘एक दुजे के लिए’ या सुप्रसिद्ध चित्रपटातील हे गीत. मनमोहक आवाज, कलाकारांचा पडद्यावरील सुरेख वावर, सोबतीला लाभलेले तेवढ्याच तोलामोलाचे संगीत आणि गूढ  शब्दरचना हे या गीताचे वैशिष्ट्य.  भाषिक आणि सांस्कृतिक भेद असूनही अज्ञात ‘बंधनाने’ बांधल्या गेलेल्या युगुलाची कहाणी या चित्रपटात गुंफली गेलीय. आपल्या सभोवतालचा निसर्गही या चित्रपटांसारखाच आहे- विलक्षण कहाण्यांनी भरलेला. त्यातील गीतांसारखाच मनमोहक आणि गूढ. या रंगीबेरंगी निसर्गपटात अशा काही अनाकलनीय गोष्टी घडत असतात की प्रत्येक वेळेस त्याचा नेमका अर्थ लावणे आपल्याला कठीण जाते. विशाल  वसुंधरेच्या पडद्यावर सर्वाधिक वावर असणारा समुद्र आणि त्याच्या पोटातील विश्व हे आपल्या जाणीवांपेक्षाही अधिकच अथांग आहे. हा अथांग सागर मानवाच्या शोधक वृत्तीस सातत्याने आव्हान देत राहतो आणि त्याला पुरूनही उरतो.


      समुद्राच्या या निळ्या विश्वात सातत्याने बदल होत असतात. भरती-ओहोटी, तापमान बदल, मानवी हस्तक्षेप यांमुळे इथे नेहमीच  ‘समुद्रमंथन’ घडते. या सततच्या समुद्रमंथनातून एकीकडे किनाऱ्यावरील मनुष्यप्राण्याला लक्ष्मी प्राप्त होते, तर दुसरीकडे त्याची परतफेड म्हणून त्या मनुष्यप्राण्याकडून मात्र ‘हलाहल’ मिळते; जे त्या रत्नाकरालाच पचवावे लागते. हे अव्याहत मंथन घडत असताना समुद्राच्या पोटातील जीवही आपल्या सभोवतालच्या पर्यावरणाशी जुळवून घेत आपले अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडत राहतात. परिस्थितीशी जुळवून घेण्याच्या प्रयत्नात काही वेळेस ते आपला भवताल सोडून दुसरीकडे स्थलांतर (migration) करतात. हे स्थलांतर कधी अन्न मिळवण्यासाठी तर कधी प्रजननासाठी होत असतं. राहण्यायोग्य परिसराच्या शोधातही हे घडत राहतं. काही पावलांपासून ते हजारो मैलापर्यंत, अशी विविधता या स्थलांतरात आहे. प्रशांत महासागराच्या उत्तरेकडे आढळणारा एक देवमासा (Grey Whale) स्थानबदल करत सर्वाधिक अंतर पार करतो. हिवाळ्याच्या सुट्टीत मेक्सिकोच्या गरम पाण्यात डुंबून झाल्यानंतर उन्हाळ्यात हा प्राणी आर्क्टिक समुद्राकडे प्रयाण करतो. हा संपूर्ण हेलपाटा सुमारे 10,000 ते 12,000 मैल इतका असतो. या व्हेल माशाचे हे स्थलांतर इतकं जास्त आहे की मोठ्या अंतरावरील हेलपाट्याचे नामांतरण ‘व्हेलपाटा’ करायला हवे.  त्याच्या खालोखाल समुद्री कासवे, सील, ब्ल्यू मर्लिन मासे यांचा क्रमांक लागतो. खाडी किनाऱ्यावरील खारफुटीच्या जंगलातील खेकडे, निवटे यांसारख्या काही प्रजाती तर भरती ओहोटीच्या वेळांनुसार  दर दहा-बारा तासांनी स्थलांतर करतात. समुद्री जीवांद्वारे स्थलांतर होत असताना आपली मूळ जागा आणि स्थलांतरीत जागा यांमध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण नाते निर्माण होते. आपल्या भारतातही सागरी जीवांच्या प्रवासामुळे असेच एक अनोखे नाते निर्माण झाले आहे. हे नाते आहे  भारतीय ‘बीच’ आणि एका समुद्री जीवाचे. त्यांच्यातील ‘बंधन’ पाहून आपल्यालाही प्रश्न पडेल, “तेरे मेरे ‘बीच’ में, कैसा है  ये बंधन अंजाना?” या ‘अंजाना बंधनाचं’ नावही आपल्याला अर्थ न लागणारे आहे. समुद्र किनारा आणि हे समुद्री जीव यांच्यातील एका आगळ्यावेगळ्या नात्याला ‘अरिबाडा (Arribada)’ या संज्ञेने ओळखले जाते. मेक्सिको, टेक्सास यांसह भारतातल्या ओडीसा, महाराष्ट्र येथील किनाऱ्यांशी ‘अरिबाडाने’ जोडलेले हे समुद्री जीव आहेत तरी कोण?

    दूरदूरच्या समुद्रकिनाऱ्यांशी विशिष्ट बंधनात बांधले गेलेले हे प्राणी म्हणजे केम्पस् रिडले(Kemp’s Ridley) आणि ऑलिव्ह रिडले(Olive Ridley) नावाची समुद्री कासवं. लेपिडोचेलीस केम्पी (Lepidochelys kempii) आणि लेपिडोचेलीस ऑलिव्हॅसीया (Lepidochelys olivacea) ही त्यांची शास्त्रीय  ओळख. समुद्री कासवांच्या कुटूंबातील ही जय विरूची जोडी. आकाराने लहान पण कर्तृत्वाने महान असे हे जीव. या दोन्ही समुद्री कासवांच्या स्थलांतरणामध्ये कमालीचे साम्य आहे. प्रशांत आणि हिंदी महासागरातील उष्ण तापमान असणाऱ्या प्रवाहात राहणारे हे जीव त्यांच्या  ‘अरिबाडा (Arribada)’ या वैशिष्ट्यामुळे जगप्रसिद्ध झालेत. अरिबाडा हा एक स्पॅनिश शब्द आहे, जो  आगमनासाठी (Arrival) वापरला जातो. रिडले कासवं लाखोंच्या संख्येने कोस्टारिका, मेक्सिको आणि भारतातील विशिष्ट समुद्र किनाऱ्यांवर काही दिवसांपुरती येतात. या किनाऱ्यांवर वाळूत घरटे करून अंडी उबवण्यासाठी ठेऊन देतात. समुद्री कासवांद्वारे प्रतिवर्षी सामूहीकरित्या होत असलेल्या या वैशिष्टयपूर्ण प्रक्रीयेला ‘अरिबाडा’ संबोधले जाते.
जय-विरूच्या या जोडीपैकी ‘ऑलिव्ह रिडले’ कासव भारताशी सर्वाधिक जवळीक साधणारा प्राणी आहे.  हिरवट करड्या (Olive Green) रंगाच्या कवचामुळे हे नाव त्याला प्राप्त झाले आहे.   हे समुद्री कासव इतर प्रजातींपेक्षा आकाराने सर्वात लहान असूनही मोठ्यात मोठ्या ऑलिव्ह रिडले कासवाची लांबी दीड ते दोन फूट आणि चाळीस ते पन्नास किलोदरम्यान असते. यावरून इतर समुद्री कासवांच्या आकाराचा अंदाज बांधता येईल. कठीण कवच हे  जगातील सर्वच कासवांचे वैशिष्ट्य; ऑलिव्ह रिडलेही त्याला अपवाद नाही. त्याच्या कठीण कवचाला आकर्षक असा बदामी (Heart) आकार आहे.(म्हणजे आकाराने तरी तो ‘दिल’वाला आहे.)  आपल्याजवळील अस्त्राचा योग्य वेळी वापर करणारे योद्धे आपण कथांमधून ऐकलेत, वाचलेत. ऑलिव्ह रिडलेही या योद्ध्यांसारखाच. पायांऐवजी त्याला पाण्यातल्या जीवनासाठी आवश्यक असे चार पर असतात. या परांना बाहेरून दिसू शकणारी अशी एक-दोन नखेही असतात. या परांच्या साह्याने त्यांना वाळूत चालणे अवघड जाते, पण या परांचा योद्ध्याच्या अस्त्रांसारखा योग्य वापर ‘अरिबाडा’ काळात होतो. रात्रीच्या वेळी भरती रेषेच्या वर सुरक्षित ठिकाणी वाळूमध्ये या अस्त्रासारख्या परांद्वारे एक ते दीड फुट खड्डा करून घरटी तयार करतात. ही कासवं “छोटा मुँह बडी बात” करण्यात माहीर आहेत. कारण तुलनेने लहान तोंड असलेल्या ऑलिव्ह रिडले कासवाचा जबडा मात्र ताकदवान असतो. या जबड्याचा वापर करून तो कोळंबी, खेकडे, शिंपले यांसारखे कवचधारी खाऊ शकतो. या प्राण्यांबरोबरच जेलीफिश व इतर मासेही त्याचे अन्न असू असते. सामान्यत: किनारी भागात वास्तव्य असणारे हे कासव स्वत:च्या उदरभरणासाठी  समुद्राच्या उदरात  पाचशे फूट खोलीपर्यंत गेल्याचेही आढळले आहे.  आपल्याकडे काही संस्कृतींमध्ये स्त्रीचं पहीलं बाळंतपण माहेरी करण्याची परंपरा आहे, हीच परंपरा मादी ऑलिव्ह रिडले देखिल पाळते. तिचा जन्म ज्या किनाऱ्यावर झालेला असतो, त्याच किनाऱ्यावर अंडी देण्यासाठी ती येत असल्याचे अभ्यासक सांगतात. थोडक्यात  समुद्र किनारा आणि ऑलिव्ह रिडले यांच्या ‘बीच’ मधील ‘अंजाना बंधन’ निर्माण होण्यास हे माहेरपण देखिल कारणीभूत मानता येईल.

         सपाट आणि स्वच्छ समुद्रकिनारे या कासवांच्या संवर्धनासाठी योग्य ठरतात.  भारतातील ओडीसा राज्यातील गहीरमाथा समुद्रकिनारा, देवी नदी, ऋषीकुल्य नदीचे मुख ही ठिकाणे अरिबाडासाठी प्रसिद्ध आहेत. बंगालच्या उपसागरावरील या किनाऱ्यावर मागील वर्षी पाच लाखाहूनही अधिक ऑलिव्ह रिडले कासवं आली होती, तर वीस लाखाहूनही अधिक नवजात कासवं सुखरूपपणे समुद्रात गेल्याची नोंद आहे. कासवांच्या नोंदीची ही संख्या गहीरमाथाला जगात तिसऱ्या क्रमांकावर नेऊन ठेवते. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील रत्नागिरी जिल्ह्यातील ‘वेळास’ येथे देखिल थंडीच्या हंगामात म्हणजेच नोव्हेंबर ते जानेवारीपर्यंत मादी कासवे येत असतात. ही कासवे घरटी करून त्यात अंडी घालतात. एका घरट्यात शेकड्याने अंडी असू शकतात. साधारणत: पन्नास दिवसांनी त्यातून पिल्ले बाहेर पडतात. रिडलेची मादी अंडी घातल्यानंतर समुद्रात निघुन जाते ती कधीच परत येत नाही. पिल्ले अंड्यातून बाहेर आल्यावर ती स्वत:हून समुद्राकडे निघून जातात. ही पिल्ले गडद करड्या रंगाची असतात. पाण्यात भिजल्यानंतर त्यांचा रंग काळपट होतो. मोठ्या संख्येने समुद्राकडे झेपावणारी ही समुद्री कासवं पाहणं  ही विलक्षण आनंददायी बाब असते.

       मोठ्या संख्येने समुद्राच्या विश्वात मिसळण्यासाठी निघालेल्या समुद्री कासवांना जन्मयोग्य ठिकाण मिळण्यासाठी त्यांच्या मातांनाही ‘व्हेलपाटा’ मारावा लागतो. त्यातच समुद्रकिनाऱ्यावरील अंड्यातून पिल्ले सुखरूपपणे बाहेर येण्याचे प्रमाण ‘तिनशे पैकी एक’ इतके अल्प आहे. त्यामुळे लाखोंच्या संख्येने जन्म होऊन देखिल ऑलिव्ह रिडले कासवाच्या प्रजातीला International Union for Conservation of Nature (IUCN) या आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघटनेने ‘धोक्यात असलेल्या’ प्रजातींच्या यादीत टाकलंय. स्थलांतरीत होणाऱ्या या प्रजातींना नामशेष होण्याचा धोका त्यांनी व्यक्त केलाय. जगण्यासाठीचा संघर्ष हा या जीवाच्या जगण्याचाच एक भाग आहे. समुद्रकिनाऱ्यावरील परिसराचा वेगाने विकास होत असताना, एकीकडे शहरे मोठी तर किनारपट्टी लहान होत चाललीय. घरटी बनवण्यासाठी योग्य जागा उपलब्ध न होणे, बनवलेली घरटी मानवी हस्तक्षेपामुळे नष्ट होणे यांसारख्या समस्या या प्रजातीसमोर आहेत. काही मांसभक्षी प्राण्यांमुळे घरट्यातील अंड्यांची, पिल्लांची शिकार होणे यांसारख्या घटनाही घडत राहतात. हे सगळं नवजातांच्या बाबतीत घडत असलं, तरी वाढ झालेल्या कासवालाही खुल्या सागरात कित्येक वेळा असाच संघर्ष करावा लागतो. दरवर्षी मच्छीमारांच्या जाळ्यात अडकून कित्येक कासवांचा मृत्यू होतो. यांत्रिक बोटींच्या पंख्यांचा (Propeller) धक्का लागूनही समुद्री कासवांना इजा झाल्याच्या घटना दरवर्षी घडत असतात. समुद्रातील मानवनिर्मित कचरा तर सर्वच समुद्री जीवांच्या जगण्यावर परिणाम करतोय. अमरत्वाचे वरदान लाभलेला प्लॅस्टिकचा राक्षस समुद्री कासवांना शाप ठरतोय. मनुष्यप्राण्याद्वारे निर्माण केलेले प्रदूषणरुपी हलाहल पचवण्याची ताकद या लहानशा जीवामध्ये नाही. स्थलांतर करण्यासाठी योग्य भवतालच शिल्लक नसल्याने त्यांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालेय.
     
या निराशेच्या लाटांआड आशेचा प्रवाहही निर्माण होतोय. जगभरातील पर्यावरण प्रेमींद्वारे अरिबाडा काळात ऑलिव्ह रिडलेंच्या संवर्धनासाठी प्रयत्न होत आहे. आोडीसातील गहिरमाथा येथे गतवर्षी पर्यावरणप्रेमींच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे  समुद्राकडे झेपावणाऱ्या पिल्लांच्या संख्येत वाढ करण्यात यश आले. महाराष्ट्रतही  मोठ्या संख्येने नवजात कासवं समुद्राकडे झेपावण्याच्या या काळात वेळास येथे ‘कासव महोत्सव’ आयोजित केला जातो. हा आनंददायी क्षण अनुभवण्यासाठी कित्येक पर्यटकांचे पाय या महोत्सवाकडे वळतात. वेळास सारख्या ‘कासव महोत्सवांतून’ प्रत्यक्ष कृतीद्वारे जनजागृती होत आहे, ही समाधानाची बाब आहे. असे महोत्सव आपल्याला प्रेरणा देत राहतील. कासवाच्या गतीने का होईना पण सकारात्मक काम होतंय. या सगळ्या मंथनातून ऑलिव्ह रिडले आणि मानव यांच्या 'बीच’में एक चांगलं बंधन निर्माण व्हावं हीच अपेक्षा.

- तुषार म्हात्रे, पिरकोन (उरण)

No comments:

रायगडची लोहयुगीन संस्कृती

रायगडची लोहयुगीन संस्कृती मँडागोरा! ‘पेरिप्लस ऑफ इरिथ्रीयन सी’ या अत्यंत पुरातन आणि महत्त्वपूर्ण दस्ताऐवजांमध्ये नोंदवले गेलेले एक बंद...