Search This Blog

Tuesday, September 25, 2018

समुद्रातील दगडी चाळ

समुद्रातील दगडी चाळ

माशांच्या विविध प्रजाती पहायच्या असतील तर मत्स्यालयात तरी जायचं नाहीतर थेट मासळी बाजारात! दोन्ही ठिकाणी फेरफटका मारताना विविध प्रकारचे मासे पहायला मिळतात. फरक इतकाच की मत्स्यालयातल्या माशांचे सौंदर्य अनुभवण्यासाठी डोळ्यांचा वापर होतो, तर फिश मार्केटमधील माशांची अनुभूती खवय्यांच्या जीभेने घेतली जाते. येथे कोणता जीव कसा दिसतो या पेक्षा चवीला कसा लागतो यावरच त्यांचे महत्त्व ठरते.  रायगड, मुंबई किंवा पालघरच्या अशाच मासळी बाजारात फिरताना कधी कधी एक वेगळेच दृश्य पहायला मिळते. नेहमीच्या माशांच्या जोडीला मत्स्यविक्रेत्यांकडे काही ओबडधोबड आकाराचे दगड टोपलीत विकायला ठेवलेले असतात. नवख्या व्यक्तीला संभ्रमात पाडणारे हे दृश्य.
मासळी बाजारात यांचं काय काम?
काय असतं या दगडांमध्ये?

      निर्जीव दगडासारखे भासणारे, पण जीवंत असणारे हे जीव म्हणजे ‘कालवे’, शिंपल्यांची एक जात. इंग्रजीत यांना ऑइस्टर्स (Oysters) म्हणून ओळखले जाते. मृदूकाय आणि कवचधारी वर्गातील हे सजीव. संपूर्ण जगातील मांसाहारी लोक यांना चवीने ओळखत असले तरी त्यापलीकडेही त्यांची एक ओळख आहे. ही ओळख समोर यावी हाच या लेखाचा उद्देश आहे. सामान्यत: हे कालवे समुद्र किनाऱ्यावरील दगड किंवा तत्सम कठीण पृष्ठभागावर मोठ्या संख्येने आढळतात. या प्राण्यांची ती एक प्रकारची ‘दगडी चाळ’च. एकदा या प्राण्यांना किनाऱ्यावर भक्कम आधार मिळाला की बाहेरच्या कारणांमुळे काही परिणाम होईपर्यंत आयुष्यभर हे तिथेच राहतात.  हा कालावधी वीस वर्षाइतका प्रदीर्घही असू शकतो. या चाळीत बंदिस्तपणे राहूनही आपले जीवन व्यवस्थितपणे जगतात. (आधार मिळाला की त्याच जागी  चिकटून आयुष्य घालवण्याचा कालव्यांचा गुण अलिकडे मनुष्य प्राण्याने स्विकारला आहे. आधार तुटेपर्यंत किंवा दुसऱ्याने धक्का देईपर्यंत माणूसदेखिल ती जागा सोडेनासा झालाय.) कॅल्शिअमने बनलेल्या बाहेरच्या कठीण आणि खडबडीत कवचाआड एक मृदू शरीराचा जीव या आधाराभोवतीच आपली पकड अधिकाधिक घट्ट करत जातो. कवचरूपातील शरीराचा एक भाग या दगडाला धरून राहतो. ही पकड इतकी एकजीव होते की मूळ दगड आणि त्यावरील कालवे सहजासहजी वेगळे करता येत नाहीत. तर कवचाच्या दुसऱ्या भागाची तोंडाप्रमाणे उघडझाप करता येते. पुराणातल्या कथांमध्ये एकाच जागी राहून खडतर तपश्चर्या करणाऱ्या ऋषीमुनींची आठवण करून देणारे हे जीव. दीर्घकाळ चालणाऱ्या तपामुळे ऋषींच्या अंगावर वारूळ तयार झाल्याचा उल्लेख या कथांमधून येतो असंच काहीसं कालव्यांच्या बाबतीतही घडतं. वर्षानुवर्षे एकाच जागी राहून शैवाल आणि इतर पदार्थांनी ते ओळखू न येण्याइतपत झाकले जातात.

    दगडी चाळीतल्या या कालव्यांचेच एक परदेशी भाईबंद खारफुटींच्या जंगलातही आढळतात. नेहमीसारखं भक्कम आधाराने वाढण्याऐवजी, इथले जीव मात्र खारफुटींच्या बुंध्याला चिकटून वाढतात. भरती ओहोटीच्या चक्रामुळे कांदळवनांतील स्थिती सातत्याने आणि वेगाने बदलत असते. सभोवतालच्या या बदलांमुळे खारफुटीच्या मुळांना धरून असलेले हे शिंपले ओहोटीच्या वेळेस अक्षरश: उघड्यावर येतात. कॅरेबियन बेटांवरील अशाच कालव्यांना पाहून काही पर्यटकांनी हे शिंपले खारफुटींच्या मुळांवर उगवतात अशी नोंद केली होती. यातला गंमतीचा भाग वगळला तरी कालव्यांचे हे दृश्य चक्रावणारेच असते.
     ‘असेल माझा हरी, तर देईल खाटल्यावरी’ हे विधान प्रत्यक्षात खरे करणाऱ्या कालव्यांना त्यांच्या दगडी खाटल्यावरच अन्न उपलब्ध होते. यांचा हरी म्हणजे समुद्र. आपल्या तोंडाच्या साह्याने समुद्राचे पाणी  गाळून त्यातील अन्नकण वेचण्याचे काम हे जीव सातत्याने करतात. अन्नग्रहण आणि श्वसनाच्या निमित्ताने दिवसभरामध्ये तब्बल दिडशे लिटरहून अधिक पाणी गाळले जाते. या पाणी गाळण्याच्या प्रक्रीयेत नायट्रोजनयुक्त अन्नपदार्थांचे पचन होऊन उर्वरीत भागाचे उत्सर्जन होते. पुढे या उत्सर्गाचे विघटन होऊन त्यातील नायट्रोजन मुक्त होतो. अशा पद्धतीने एका दगडी चाळीतील कालव्यांद्वारे लाखो लीटर पाण्यावर गाळण प्रक्रीया होऊन जलशुद्धीकरणाची प्रक्रीया अखंडपणे चालू राहते. थोडक्यात कालव्यांच्या या दगडी चाळी एक प्रकारच्या नैसर्गिक वॉटरप्युरिफायरच काम करतात.

        निसर्गाच्या साखळीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या या प्राण्याचे पुनरूत्पादन विशिष्ट तापमानावर अवलंबून असते. समुद्राच्या पाण्यात नदी, नाल्यांद्वारे मानवनिर्मित रासायनिक कचरा, किरणोत्सारी पदार्थ मिसळते जातात. यातून पाण्याच्या तापमानातही सूक्ष्म बदल होत असतात. या सूक्ष्म बदलांमुळे सागरी जैवसंस्थेवर मोठे परिणाम होतात. वाढते जलप्रदूषण आणि वातावरणात होणारे लक्षणीय बदल यांचा तडाखा या समुद्रकिनाऱ्यावरील जीवांनाही बसलाय. मनुष्याच्या दृष्टीने एक चविष्ट अन्न असल्याचा कालव्यांचा गुणही त्यांच्या अस्तित्वासाठी शाप ठरतोय. वेगाने होणाऱ्या शहरीकरणामुळे जशा मुंबईतल्या चाळी नष्ट झाल्या, तशाच या समुद्रातील दगडी चाळीही नष्ट होऊ लागल्यात. कालव्यांचे समुद्रात असणे, गरजेचे आहे- समुद्रासाठी, समुद्रातील जीवांसाठी आणि पर्यायाने निसर्गासाठी.  दगडी चाळींसारख्या कित्येक वसाहती या पृथ्वीवर आहेत, त्यांचे महत्त्व ओळखून वेळीच संवर्धनासाठी पाऊल उचलले पाहीजे. समुद्र आणि मनुष्य यांची संघर्षरेषा म्हणजे हे ‘सागर किनारे’ आहेत. या किनाऱ्यांना जपायलाच हवे!

- तुषार म्हात्रे, पिरकोन (उरण)

(वरील लेख दैनिक सकाळ- 25 सप्टेंबर 2018 च्या मुंबई आवृत्तीत प्रकाशित झाला आहे.)

No comments:

रायगडची लोहयुगीन संस्कृती

रायगडची लोहयुगीन संस्कृती मँडागोरा! ‘पेरिप्लस ऑफ इरिथ्रीयन सी’ या अत्यंत पुरातन आणि महत्त्वपूर्ण दस्ताऐवजांमध्ये नोंदवले गेलेले एक बंद...