Search This Blog

Tuesday, September 18, 2018

बिळातला शहेनशाह!

‘बिळातला शहेनशाह’


“अंधेरी रातोंमे सुनसान राहोपर...” हे गीत पार्श्वभूमीला वाजत असताना, एका लयबद्ध चालीने जाणारा बॉलीवूडचा ‘शहेनशाह’ सर्वांनाच आठवत असेल. दिवसा एका सामान्य पोलीसाच्या भूमिकेत वावरणारा अमिताभ रात्र होताच शहेनशाहच्या वेशात जाऊन लोकांची मदत वगैरे करतो, असे काहीसे कथानक या चित्रपटाचे आहे. या  चित्रपटाचा उल्लेख झाल्यावर पहील्यांदा आठवते ती अमिताभ बच्चन यांची वेशभूषा. जवळपास अठरा किलो वजनाचे कपडे (Costume), त्यापैकी सुमारे पंधरा किलो वजन निव्वळ हाताचं! एक हात वजनदार ,तर दुसरा सामान्य. विविध प्रकारच्या अॅक्शन दृश्यांसाठी या वजनदार, मजबूत आणि संरक्षक असणाऱ्या हाताचा दिग्दर्शकाने मुक्तहस्ते(!) वापर केल्याचे दिसून येते.
          या शहेनशाहसारखाच आणखी एक शहेनशाह आहे, ‘सुनसान राहोंपर’ चालणारा... आपल्याला फारसा परिचित नसणारा... तो देखिल दिवसा लपून राहतो आणि सहसा रात्रीच बाहेर पडतो...

 सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याचा एक हातही ‘शहेनशाह’ सारखाच आहे- वजनदार, मजबूत आणि संरक्षक! समुद्रकिनाऱ्यावरील या ‘बिळातल्या शहेनशाह’चं स्थानिक नाव आहे ‘आंगडा’. अतिशय आकर्षक आणि वैशिष्ट्यपूर्ण पंजामुळे या खेकड्याला हे नाव मिळाले आहे. हा खेकडा इंग्रजीत फिडलर क्रॅब (Fiddler Crab) म्हणून ओळखला जातो.  मुंबई आणि कोकणच्या समुद्रकिनारी या खेकड्याच्या तीन-चार प्रजाती आढळतात.
  यापैकी युका अॅन्युलाईप्स (Uca Aannulipes), युका व्होकन्स (Uca Vocans) आणि युका डुस्सुमेरी (Uca Dussumieri) या सर्वाधिक आढळणाऱ्या प्रजाती आहेत. समुद्रकिनाऱ्यालगतच्या दलदलयुक्त प्रदेशात याचे वास्तव्य असते. भरती-ओहोटीमुळे सतत बदलणारा परिसर आणि भोवतालचे कांदळवन म्हणजे या  प्राण्याचे नंदनवनच. हे खेकडे तसे मेहनती असतात, दलदलीच्या प्रदेशात स्वत:ची स्वतंत्र बिळे तयार करून राहतात. मुंबईत जशी माणसं राहतात, तशीच लहानशा वसाहतीत हे हजारो खेकडे दाटीवाटीने राहतात. शैवाल आणि इतर सेंद्रीय पदार्थ हे त्यांचे अन्न. मग अन्न मिळवण्यासाठी हे खेकडे शक्यतो आपल्या बिळाच्या परिसरातच शोध घेतात. शत्रूने हल्ला केलाच तर सहजतेने लपता यावे यासाठी फार दूरपर्यंत अन्नाचा शोध ते घेत नाहीत.  बिळाच्या आसपास मिळणाऱ्या अन्नावरच ते अवलंबून राहतात. या आंगड्यांची खाण्याची पद्धतही वैशिष्ट्यपूर्ण आहे. मातीत मिसळलेले सेंद्रीय रुपातील अन्नकण मिळवण्यासाठी हे खेकडे आपल्या लहान पंजाच्या साह्याने चक्क माती खातात. (एखाद्याने माती खाल्ली हे विधान आता सकारात्मक दृष्टीने घ्यायला हरकत नाही.) एका अर्थी या खेकड्याचे ‘खायचे हात आणि दाखवायचे हात’ वेगळे असतात.
 गुंतागुंतीची रचना असलेल्या तोंडाने  मातीतील अन्नाचे कण वेचून उर्वरीत माती लहान गोळ्यांच्या स्वरूपात बाहेर टाकतात.ओहोटीच्या वेळेस अशा लहान लहान गोळ्यांची सुंदर नक्षी बिळाबाहेर पहायला मिळते. राजहंसाच्या ‘निर-क्षीर’ वेगळे करण्याच्या कथित कौशल्याबद्दल पुष्कळदा लिहले जाते, पण मातीतून अन्न वेचणारा हा शहेनशाह अजूनही तसा दुर्लक्षितच म्हणावा लागेल. नर खेकडा आणि मादी खेकडा यांच्या शरीर रचनेतही महत्त्वपूर्ण फरक आहे. संपूर्ण शरीर झाकू शकेल असा भला मोठा पंजायुक्त हात मादी खेकड्याला नसतो, त्यांचे दोन्ही पंजे लहानच असतात. वरकरणी पाहता मोठा पंजा म्हणजे नर खेकड्याला एखादे वरदान मिळाल्यासारखे वाटेल, परंतु अन्न मिळवण्यासाठी लहान पंजाचा वापर होत असल्याने त्याला केवळ एकच पंजाचा वापर करता येतो. याऊलट मादी खेकड्याला दोन खायचे हात असल्याने त्यांचा खाण्याचा वेग नरांच्या तुलनेत दुप्पट असतो. त्यामुळे मादी खेकड्यांचा तोंडाचा पट्टा नरांच्या तुलनेत दुपटीने चालतो. अर्थात हे सर्व खाण्याच्या बाबतीत असते.

      जगण्यासाठीचा संघर्ष या लहान जीवांच्या जगात नेहमीचाच आहे. अत्यंत कमी जागेत कित्येक बिळे दाटीवाटीने सामावलेली असतात. एखादा दुसरा ‘आंगडा’ जागा बळकावण्यासाठी आला तर मोठी लढाई होते, पराभूताला आपला बिळावरचा हक्क सोडून नव्याने सुरूवात करावी लागते. स्वत:च्या घरासाठी सतत संघर्ष करणारे नर खेकडे मिलनाच्या वेळेस मात्र आपल्या घराचा त्याग करून काही काळ मादीसह नविन घरात राहतात.
     मुंबईला पर्याय म्हणून नवी मुंबई आणि महामुंबईकडे पाहीले जाते. या प्रदेशातील वाढत्या लोकवस्तीला सामावून घेण्यासाठी समुद्रकिनाऱ्यालगतच्या पानथळ जागांवर भराव टाकणे, खारफुटीची जंगले न‍ष्ट करणे या कारणांमुळे सुंदर अशा ‘आंगड्यांच्या’ राहण्याच्या जागांवर अतिक्रमण झाले आहे. बिळातून बाहेर पडल्यानंतर परत येईपर्यंत त्याचे बिळ सुस्थितीत आहे किंवा नाही याची खात्री नाही. फ्लॅटरूपी बिळात राहणाऱ्या माणसांसाठी या शहेनशाहला आपल्या बिळाचा त्याग करावा लागतोय.  परिणामी त्यांचा आढळही कमी झालाय.बिळातला हा शहेनशाह आपल्या स्वत:च्या राज्यासाठी झगडतोय.
स्वत:च्या बिळासाठी लढा देणाऱ्या या खेकड्यांनी मानवाच्या आक्रमणापुढे शब्दश: नांगी टाकलीय.  जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असणाऱ्या या खेकड्यांचं अस्तित्व हे निसर्गचक्राच्या सुरळीतपणाचा पुरावा आहे. परंतु त्यांचा आढळ कमी होणे ही नांदी आहे, मानवाने ओढवलेल्या विनाशपर्वाची. या आंगड्यांसारख्या असंख्य जीवांना वाचवायचे असेल तर आत्ताच प्रयत्न करायला हवा. वेळ अजूनही गेलेली नाही, प्रयत्न करूया!

- तुषार म्हात्रे, पिरकोन (उरण)

#आंगडा #शहेनशाह #तुषारकी #fiddlercrab #shahenshah #tusharki

No comments:

रायगडची लोहयुगीन संस्कृती

रायगडची लोहयुगीन संस्कृती मँडागोरा! ‘पेरिप्लस ऑफ इरिथ्रीयन सी’ या अत्यंत पुरातन आणि महत्त्वपूर्ण दस्ताऐवजांमध्ये नोंदवले गेलेले एक बंद...