समुद्रातील दगडी चाळ

‘ समुद्रातील दगडी चाळ ’ माशांच्या विविध प्रजाती पहायच्या असतील तर मत्स्यालयात तरी जायचं नाहीतर थेट मासळी बाजारात! दोन्ही ठिकाणी फेरफटका मारताना विविध प्रकारचे मासे पहायला मिळतात. फरक इतकाच की मत्स्यालयातल्या माशांचे सौंदर्य अनुभवण्यासाठी डोळ्यांचा वापर होतो, तर फिश मार्केटमधील माशांची अनुभूती खवय्यांच्या जीभेने घेतली जाते. येथे कोणता जीव कसा दिसतो या पेक्षा चवीला कसा लागतो यावरच त्यांचे महत्त्व ठरते. रायगड, मुंबई किंवा पालघरच्या अशाच मासळी बाजारात फिरताना कधी कधी एक वेगळेच दृश्य पहायला मिळते. नेहमीच्या माशांच्या जोडीला मत्स्यविक्रेत्यांकडे काही ओबडधोबड आकाराचे दगड टोपलीत विकायला ठेवलेले असतात. नवख्या व्यक्तीला संभ्रमात पाडणारे हे दृश्य. मासळी बाजारात यांचं काय काम? काय असतं या दगडांमध्ये? निर्जीव दगडासारखे भासणारे, पण जीवंत असणारे हे जीव म्हणजे ‘कालवे’, शिंपल्यांची एक जात. इंग्रजीत यांना ऑइस्टर्स (Oysters) म्हणून ओळखले जाते. मृदूकाय आणि कवचधारी वर्गातील हे सजीव. संपूर्ण जगातील मांसाहारी लोक यांना चवीने ओळखत असले तरी त्यापलीकडेही त्यांची एक ओळ...