Search This Blog

Monday, April 30, 2018

‘पुरी’कथेतील राजकुमारा...


⚔ ‘पुरी’कथेतील राजकुमारा...
(शोध हरवलेल्या राज्याचा, शोध इतिहासाच्या पाऊलखुणांचा)

     दहिसरला एक सदिच्छा भेट घेऊन ‘बोरीवली वेस्ट’ला जाण्यासाठी रिक्षा शोधत होतो. ज्या ठिकाणी जायचं ती वास्तू फारशी प्रसिद्ध नाही, स्थानिक लोकही त्याबाबत अनभिज्ञ. त्यामुळे फक्त “देविदास रोड, बोरीवली वेस्टला याल का?” असा प्रश्न  विचारला. हिंदीत होकारार्थी प्रतिसाद आला. आता ज्या वास्तूच्या शोधात मी निघालोय ते रिक्षावाल्याला हिंदीत सांगणं कठीण जाईल हे जाणून शांतपणे रस्ते शोधून देणाऱ्या गुगलताईंची मदत घ्यायचे ठरवले. हिरव्या झाडींमध्ये लपलेल्या बोरीवली पश्चिमेच्या दिशेने रिक्षा निघाली. यावेळेसच्या शोधमोहीमेत संसारातील एकमेव मार्गदर्शक आमच्या सौभाग्यवतीही सोबत होत्या. रिक्षाने मंडपेश्वर लेणींना वळसा घालताच आमच्या मोबाईलचे नेटवर्कही कैलासवासी झाले. आता इच्छित स्थळाचा शोध घेणे आणखिनच कठीण झाले. गुगल मॅपवर मागे एकदा ‘देविदास रोड’वरील एल.आय.सी. कॉलनीचे नाव वाचल्यासारखे आठवले. चालकाला एल.आय.सी. कॉलनीजवळ नेण्यास सांगीतले. त्यानेही ‘इधर पुछता हूँ-उधर पुछता हूँ’ करत  कॉलनीच्या फाटकापर्यंत कसंतरी पोहोचवलं.
  ‘इथपर्यंत पोचलो, आता पुढे काय?’ असा प्रश्न निर्माण झाला. इतक्यात माझ्या मोबाईलचे नेटवर्क अवतीर्ण झाले. आपल्या लक्ष्यापासून आपण किती लांब आहोत याची थोडीफार ‘आयडीया’ आली.
डाव्या बाजूला फक्त 200 मीटर! - गुगलताईंनी मृदू आवाजात माहिती पुरवली. सूचनेप्रमाणे वळलो. मुख्य रस्त्याला लागून एका शाळेच्या परिसरातून पुढे जाऊ लागलो. गुगलताईंनी दाखवलेल्या जागेत ‘क्लब अॅक्वेरिया’ नावाची गगनचुंबी इमारत. मी ज्या आठशे वर्षापूर्वीच्या वास्तूचा शोध घेत आहे ती इथे कशी असू शकेल, अशी शंका मनात डोकावली.
वीरगळांची जागा
इमारतीसमोरील सिक्युरिटीला विचारावं म्हणून पुढे जाताच दोन इमारतींच्या मध्ये वसलेल्या लहानशा वासुदेव मंदिराच्या मागे, एका कुंपणाआड मला ती ‘वास्तू’ दिसली.
(https://g.co/kgs/sTV7h4)

   वॉचमनच्या परवानगीने त्या जागेत गेलो. समोर सात-साडेसात फुट उंचीचे दोन भव्य ‘विरगळ’ उभे होते. बाजूला मूळ तेवढ्याच उंचीचे परंतु मोडतोड झाल्याने पाच फुटापर्यंत शिल्लक असलेले एक आणि कलशाचा भाग दाखवणारे दोन भग्न विरगळ दिसत होते.
शेजारच्या अत्याधुनिक  इमारतीची
 भव्यता विसरून जाऊ इतके आकर्षक आणि भव्य विरगळ सन्मानाने उभे होते. या वीरगळांना स्थानिकांनी देवत्व बहाल केल्याच्या खुणा स्पष्टपणे दिसत होत्या. कसेही का होईना पण या कंपाऊंडमध्ये एकूण पाच महत्त्वपूर्ण वीरगळ सुरक्षितपणे ठेवलेले आहेत, हे पाहून आनंद वाटला. यातील दोन शिल्पांवर  जमिनीवरील  युद्ध तर दोन शिल्पपटांवर नौकायुद्धाचे चित्रण आहे. संपूर्ण महाराष्ट्रात कलेच्या बाबतीत अशी अप्रतिम वीरगळ मी पाहीली नाही.
हत्तीदळ
पायदळ, घोडदळ, हत्तीदळ आणि नाविकदल अशा चारही दळांच्या वापराचे सूक्ष्म चित्रण यात आहे.या वीरगळांच्या देखणेपणाचा कळस म्हणजे  त्यावरील आकर्षक कलश.
कलश
स्वर्गरोहणाचे प्रतिक असलेला कलश सुंदर अप्सरा घेऊन जात असल्याचे चित्र दिसते.  चार चौकटींमधून कोरलेले युद्धप्रसंगाचे चित्रण कल्पकता आणि कलात्मकता दोघांचाही उच्च संयोग दर्शवतो.
नौकायुद्ध
यातील व्यक्तींची वस्त्र प्रावरणे, अलंकार, वाद्ये याबाबतीतही अतिशय बारकाईने काम केले आहे. काळाच्या ओघात वीरगळाची थोडी झीज झाली असली तरी त्याच्या मूळ सौंदर्यात आणि भव्यतेत कमीपणा आलेला नाही, हे विशेष.


इतके भव्य आणि आकर्षक वीरगळ आहेत तरी कोणाचे?

या वीरगळांची ‘पुरी’कथा आहे तरी काय?

खरं तर एखाद्या परीकथेपेक्षाही सुरस वाटू शकेल इतके या विषयावरील ऐतिहासिक संदर्भ आज उपलब्ध आहेत.
चला, या  शिल्पांबाबत थोडं अधिक जाणून घेऊया.
      मूळ  एकसार(बोरीवली पश्चिम) गावातल्या या शिल्पांवर कोणतीही तिथी किंवा कोणाचेही नाव कोरलेले नाही.
   पुरातत्ववेत्ता हेन्री कझेन्सच्या मते  शेवटचा शिलाहार राजा सोमेश्वर आणि देवगिरीचा राजा महादेव यादव यांच्यात तेराव्या शतकात झालेल्या घनघोर युद्धाचे व त्यात वीरमरण पत्करलेल्या सोमेश्वराचे शिल्पचित्रण त्यात आहे.
शिलाहार राजवंशाचा इतिहास आणि कोरीव लेख- वा.वि.मिराशी’ या पुस्तकातदेखिल एकसारचे विरगळ सोमेश्वराचे असल्याचे स्पष्ट केले आहे.
  या दोन्ही तज्ञांना दुजोरा देत या विरगळांचे महत्त्व सदाशिव टेटविलकर यांनी आपल्या ‘महाराष्ट्रातील विरगळ’ या पुस्तकात खूप चांगल्या रितीने विशद केले आहे.
        या विरगळांशी संबंधित शिलाहारांची राजवट इसवी सनाच्या आठव्या शतकात महाराष्ट्रात उभी राहिली. पश्चिम महाराष्ट्रात आणि कोकण प्रांतात त्यांचा प्रभाव होता. खरं तर हे राजे सुरूवातीला केवळ राष्ट्रकूट आणि चालुक्यांचे मांडलिक म्हणून काम पहात होते. परंतु हे मांडलिकत्व केवळ  नावापुरतेच होते. शिलाहार राजे स्वतःला महामंडलेश्वर, कोकणाधिपती, कोकणचक्रवर्ती, राजाधिराज अशा उपाध्या लावत. संपूर्ण कोकणात आणि दक्षिण महाराष्ट्रात राज्य करणारे हे राजे स्वतःला विद्याधरकुलीन राजपुत्र जीमूतवाहनाचा वंशज मानत.
या शिलाहार नावामागची कथादेखिल रंजक आहे.
एका प्राचीन दंतकथेप्रमाणे जीमूतवाहनाने शंखचूड नावाच्या नागाला गरुडाच्या पंजातून सोडवण्यासाठी स्वतःच्या प्राणांचे एका शिळेवर बलिदान दिले होते. ह्या प्रसंगापासूनच त्यांच्या कुलाला शिलाहार (शिला-आहार) असे नाव पडले, असे मानले जाते.
     तर छत्रपती शिवाजी महाराज  वस्तूसंग्रहालयातील (जुने नाव- प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम) शिलाहार राजा छद्वैदेवाच्या ताम्रपटात सिलार नावाच्या पराक्रमी वीराने परशुरामाच्या बाणापासून संत्रस्त झालेल्या समुद्राचे रक्षण केले, असा उल्लेख आहे. याच सिलाराच्या कुळाला पुढे सिलारा-सिलाहारा-शैलाहार-शिलाहार असे नाव मिळाले, असेही समजले जाते.

        शिलाहारांच्या जवळपास दहा वेगवेगळ्या शाखांनी महाराष्ट्रात आणि कर्नाटकात राज्य केले. त्यापैकी महाराष्ट्रातील उत्तर कोकण, दक्षिण कोकण आणि कोल्हापूरचे शिलाहार ही तीन घराणी प्रभावी मानली जातात.  उत्तर कोकणचे आणि कोल्हापूरचे शिलाहार स्वतःला तगरपुराधीश्वर असे गौरवाने म्हणवून घेत. शिलाहार राजे शैवपूजक असल्याचे त्यांनी उभारलेल्या अनेक शिवमंदिरावरून लक्षात येते. अंबरनाथचे सुप्रसिद्ध शीवमंदिरही त्यांच्याच राजवटीतील. हे राजे शांतताप्रिय असल्याचे मानले जाते. त्यांच्या राजवटीत हिंदू, बौद्ध, जैन धर्म मोकळेपणाने नांदत असल्याचे मत इतिहासतज्ञ व्यक्त करतात.  त्यांनी दिलेल्या विविध दानपत्रांमध्ये बौद्ध विहारांसाठीदेखिल तरतूद केल्याचे आढळते. आपल्या  कथेतील सोमेश्वर राजाच्या अंमलाखाली ‘अपरान्त’ म्हणजेच उत्तर कोकणातील मुंबई, ठाणे आणि रायगड परिसरातील जवळपास चौदाशे गावे होती. या  शिलाहारांची राजधानी श्रीस्थानक अर्थात सध्याचे ठाणे ही होती. त्यांच्या पहिल्या राजधानीचे नाव 'पुरी' होते असे काही ताम्रपटांवरून आणि शिलालेखांवरून दिसते. काही संशोधक मुंबईजवळील घारापुरी बेट किंवा जंजिर्‍याजवळील राजापुरी हिलाच हे राजधानीचे ठिकाण मानतात. घारापुरी (Elephanta Caves) हेच राजधानीचे ठिकाण असावे हे नक्की. एकसारच्या विरगळांमध्ये मला रस असण्याचे कारणही हेच आहे. या राजवटीचा उरण परिसराशी असणारा संबंधच मला येथवर घेऊन आला.
पण मुंबई, ठाणे आणि रायगडच्या जलमार्गाने होणाऱ्या व्यापाराचा विचार करता या जलमार्गातील 
       शिलाहार राजवटीचे करंजा बेटावरील उरण नगरीशी असलेले संबंध दृढ करणारे तीन शिलालेखही सापडले आहेत. हे शिलालेख म्हणजे त्याकाळातील एक प्रकारचे चेकबुकच! उरण जवळील चांडिजे (चाणजे) गावात सापडलेल्या पहिल्या शिलालेखात अपरादित्यदेव नावाच्या शिलाहार राजाने नागुम (नागाव) गावातील आंबराई(आंबिवडी) येथील  जमिन श्रीधर नावाच्या व्यक्तीला इ.स. ११३९ मध्ये सूर्यग्रहणाच्या दिवशी दान केल्याचा उल्लेख आहे. तर याच गावात आढळलेल्या दुसऱ्या शिलालेखात ‘सोमेश्वरदेवाने’ इ.स.११८२ च्या सूर्यग्रहणाच्या दिवशी कोंथलेवाडी (काळधोंडा) येथील जमिन व काही आर्थिक मदत उत्तरेश्वर देवस्थानाला दिल्याचे संदर्भ आहेत.
आणखी एक शिलालेख उरणमधील रानवड या ठिकाणी आढळला आहे. हा शिलालेख इ.स.११८१ सालात  सोमेश्वरदेवाच्या संक्रांतीनिमित्त केलेल्या दानाचा असून, यात उरणे (उरण) व पडीवसे (पाणजे? फुंडे? पाणदिवे?) या गावांचा उल्लेख आहे.
सध्या हे तिनही शिलालेख छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय मुंबई येथे पहायला मिळतील.
     सूर्यग्रहणांच्या वेळी दान देणाऱ्या या शिलाहारांच्या राजवटीला तेराव्या शतकात मात्र ग्रहण लागले. यादव राजवटीच्या रुपाने या चारशे वर्षाहूनही अधिक काळ सत्ता गाजवलेल्या शिलाहारांवर संक्रांत आली. सोमेश्वराच्या अखेरच्या युद्धाचे वर्णन हेमाद्री पंडीताने आपल्या ‘चतुर्वर्ग चिंतामणी’ या ग्रंथातही केले आहे. देवगिरीच्या यादवसत्तेचा प्रभाव वाढू लागल्यावर यादवसम्राट कृष्ण याने आपला मल्ल नावाचा सरदार उत्तर कोकणच्या मोहिमेवर पाठवला. मल्लाने जरी सोमेश्वरचा युद्धात पराभव केला, परंतु उत्तर कोकणात सत्ता स्थापन करण्यात त्याला अपयश आले. पण कृष्णा राजाचा भाऊ आणि यादवांचा उत्तराधिकारी महादेव यादव या पराक्रमी राजाने ही मोहीम अशीच चालू ठेवली. इ.स. १२६५ मध्ये हत्तींचे प्रचंड सैन्यदळ घेऊन त्याने सोमेश्वरावर स्वारी केली. जमिनीवरच्या या युद्धात सोमेश्वर पराजित झाल्यामुळे त्याने आपल्या बचावासाठी अरबी समुद्रातील घारापुरी या बेटावर आश्रय घेतला. चहूबाजूंनी पाण्याने वेढलेल्या बेटावर आपल्या आरमाराच्या साह्याने आपले अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न सोमेश्वराने केला, मात्र महादेव यादवाने उत्तर किनार्‍यावरच्या अरब मांडलिकांची मदत घेऊन भर समुद्रातही सोमेश्वराचा पाठलाग करून आरमारी युद्धात त्याचा संपूर्ण पराभव केला आणि उत्तर कोकणच्या शिलाहारांचे राज्य खर्‍या अर्थाने समुद्रात बुडाले. सोमेश्वराचे अग्नीसंस्कार समुद्रकाठच्या एकसार गावात करण्यात आले. या महायुद्धाचे वीरगळरुपी स्मारक याच गावात उभे राहीले. एका राजसत्तेचा अस्त झाला. परंतु शिलाहारांना मुळापासून उखडणाऱ्या आणि आपल्या खड़गाने प्रसिद्ध पावलेल्या यादव राजा महादेवाचे काय झाले?या प्रश्नाचे उत्तर कदाचित सोमेश्वराच्या कथेपेक्षाही रहस्यमय आणि रंजक असू शकेल.
  आठशे वर्ष उलटून देखिल हे वीरगळ मुंबईच्या आधुनिकीकरणाच्या विळख्यात सन्मानाने उभे आहेत. ते आपल्याला इतिहासातील काही आठवणी संकेतांच्या आधारे, खुणांच्या आधारे सांगू पाहताहेत. आपण  या खुणांना ओळखण्याचा प्रयत्न करूया, त्यात दडलेला इतिहास जाणून घेऊया.
  समोर दिसत असलेल्या खुणा डोळ्यांत साठवण्याचा प्रयत्न केला. समाजात वावरण्यासाठी अत्यावश्यक असे सेल्फीयुक्त फोटोही काढले.
  घड्याळ पाहीलं, बराच वेळ झाला होता. स्मारकांजवळून पाय निघत नव्हता, पण लोकलच्या गर्दीतून मार्ग काढण्याचा संभाव्य समरप्रसंग आठवला. वॉचमनला थँक्यू म्हणालो आणि निघालो पुढील रहस्याच्या शोधात...🏇🏻

ⓒ- तुषार म्हात्रे, पिरकोन (उरण)

संदर्भ: _महाराष्ट्रातील वीरगळ-सदाशिव टेटविलकर,शिलाहार राजवंशाचा इतिहास आणि कोरीव लेख- वा.वि.मिराशी, कुलाबा गॅझेटिअर, चतुर्वर्ग चिंतामणी- हेमाद्री पंडीत_

#वीरगळ #शिलाहार #एकसार #घारापुरी #उरण #ठाणे #तुषारकी
#Herostones #Shilahar #Eksar #Elephantacaves #Gharapuri #Uran #Thane #Tusharki

No comments:

रायगडची लोहयुगीन संस्कृती

रायगडची लोहयुगीन संस्कृती मँडागोरा! ‘पेरिप्लस ऑफ इरिथ्रीयन सी’ या अत्यंत पुरातन आणि महत्त्वपूर्ण दस्ताऐवजांमध्ये नोंदवले गेलेले एक बंद...