Search This Blog

Tuesday, April 10, 2018

केसांची ‘बाल’कथा


      परवा रस्त्याने जाताना एक बोर्ड पाहिला-‘सीजर पार्लर’. नाव थोडं गंमतीदार वाटल्याने पुढे अशा नावांच्या फलकांकडे आपोआप लक्ष जाऊ लागले. जेन्टस् पार्लर, हेअर ड्रेसर, मेन्स सलून पासून ते केशकर्तनालय अशा विविध नावांखाली, चकचकीत काचांआड केस कापले जात होते. झाडाखाली मोडक्या लाकडी खुर्चीत तुटपुंज्या साहित्यासह मांडलेल्या लहानशा दुकानापासून ते तारांकीत इमारतीच्या सुखयोयीयुक्त स्पा पर्यंतचे वैविध्य या केशकर्तनाच्या व्यवसायात आहे. पुरूषांच्या दुनियेतला हा नविन झगमगाट पाहून मला जुन्या दिवसांची आठवण झाली.

    मी लहान असतानाच्या, केस कापण्याविषयक काही आठवणी आहेत. लहानपणी मी घरातही सर्वात लहान होतो. त्यामुळे घरातील ‘मोठे’ मानल्या जाणाऱ्या सर्वच व्यक्तींची आज्ञा पाळणे माझे परम कर्तव्य होते. केस कापण्यासारख्या वैयक्तिक बाबीतही वडीलधारी मंडळी सांगतील तोच आदेश पाळणे बंधनकारक होते. या आदेशान्वये एका व्यक्तीची निवड घरच्यांनी केली.  घरोघर जाऊन केस कापणारा एक कर्तनकार आमच्या केसांची निर्घृणपणे हत्या करायचा. शेजारच्याच गावातून येणाऱ्या या केशकर्तनकाराचे  दुकान एका तंगूसच्या पिशवीत सामावलेले होते. दोनपैकी एक टोक मोडलेली कात्री, काही दात शाबूत असलेला कंगवा, वाटी, वस्तरा आणि अर्धी मुठ नसलेला दाढी करण्याचा ब्रश अशा अर्ध्यामुर्ध्या आयुधांसह ही व्यक्ती गावात दाखल व्हायची.त्या काळी निसर्गनियमाने घरातील सर्वांचे केस एकाच वेळेस कापण्यालायक व्हायचे. इतरांचे नाही तरी किमान मी आणि माझा भाऊ दोघांचेही केस तरी एकाचवेळेस कापले जायचे. आमच्या अंग‌णात एका पायरीला टेकून तो पथारी पसरायचा. आम्ही केस कापण्याच्या पूर्वतयारीने म्हणजे उघड्या अंगाने त्याच्या समोर जाऊन बसायचो. अशावेळी ब्रॉयलर कोंबडीच्या चेहऱ्यावरील निरागस भाव आमच्या चेहऱ्यावर असायचे. जबरदस्तीने माना वळवत, अंगावर खेकसत तो आपली हत्यारे चालवायचा. त्याच्या लढाईच्या खुणा माझ्या मानेवर, कानाच्या वरच्या भागात उमटायच्या. हा संघर्ष संपवून मी आंघोळीला जायचो. थोडं बरं वाटायचं. या जुलूमापासून सुटका मिळवण्यासाठी काहीतरी मार्ग शोधणे गरजेचे होते. ‘मनापासून इच्छा असेल तर लवकरच मार्ग सापडतो’ असे एक सुप्रसिद्ध विधान मीच काही दिवसांपूर्वी केले होते. या विधानाचे मूळ एका जुन्या घटनेत आहे. एकदा या लढवय्या केशकर्तनकाराला माझ्या भावाचे केस कापत असताना मी चक्क डुलक्या देताना पाहीलं. मी आईला जाऊन हा प्रकार सांगीतला आणि दाखवलाही.  त्याच्या झोपेच्या सवयीमुळे त्याचे आम्ही पुढे ‘निजा नाही’ असे नामकरण केले आणि त्यालासुद्धा कायमचे नाही म्हटले.

        केसकर्तनकाराला दिलेल्या नकाराशी आमच्या डोक्यावरच्या केसांना कसलेही देणे-घेणे नव्हते. ते महागाईप्रमाणे वाढतच होते. आता दुसरा पर्याय शोधणे गरजेचे होते. माझ्या मामाच्या गावात एक बऱ्यापैकी केस कापणारी व्यक्ती होती. आई त्यांना काका म्हणायची. फार दूर नसलेल्या मामाच्या गावाला वारंवार जायला मिळेल म्हणून मी हा पर्याय आनंदाने स्विकारला. केशकर्तनकार म्हणून काम करणारे हे काका ‘कर्तनकार’ कमी आणि ‘किर्तनकारच’ जास्त वाटायचे, इतके सुुंदर आणि मार्मिकपणे ते बोलायचे.  मामाच्या घरापासून दहा-वीस पावलांवर त्यांचे घर होते. ओसरीवरच एक खुर्ची कायमस्वरूपी बसवून त्यांचा व्यवसाय चालायचा. लहान मुलांसाठी याच खुर्चीवर फळी टाकून अॅडजेस्टमेंट केली जायची. वर ढेरी सुटलेसे उघडेबंब अंग आणि खाली जाड कापडाची हाफ पँट असा त्यांचा नेहमीचा पेहराव असायचा. नाही म्हणायला सणासुदीला ते अंगावर बनियनही घालायचे. निवांतपणे केस कापण्याच्या पद्धतीमुळे हे काका मात्र माझे आवडते कर्तनकार झाले. या काकांची अपॉईंटमेंट घेणे मोठे जिकीरीचे काम होते. दिवसाला मोजून दहा-बाराच गिऱ्हाईके त्यांच्याकडे येत असावीत, तरीही त्यांच्याकडे लवकर नंबर येत नसे. त्यांच्या प्रत्यक्ष व्यवसायाची वेळ खूपच कमी होती. म्हणजे सकाळी केस कापायला गेलो तर म्हणायचे ‘अजून आंघोळ नाही झाली’, थोडं उशीरा गेलो तर, ‘आत्ताच आंघोळ झाली’. दुपारी जेवतायत, जेवल्यावर झोपलेत अशी अनेक कारणे सांगायचे. सर्वात कहर म्हणजे एकदा ’पान खाल्लंय’ या सबबीवर त्यांनी नंतर ये म्हणून सांगीतले होते. त्यामुळे शनिवारी शाळा सुटल्यानंतर मामाकडे मुक्कामी गेलेला मी, प्रत्यक्षात केस कापेपर्यंत रविवार संध्याकाळपर्यंत तिथेच असायचो.  ते स्वत:च्या घरातून ओसरीवर आले की आपोआप दुकानाला ‘Open’ चा बोर्ड झळकल्याचा फील यायचा. या काकांकडे मी सर्वात जास्त काळ केस कापले.
         केस कापण्यासाठी मामाकडे जाण्याच्या  काळात कधीकधी इतरही ठिकाणी केस कापण्याचा योग आला. गावात ‘सरदारजी’ म्हणून ओळखला जाणारा एक बिना दाढीचा सरदार दाखल झाला होता. गावातील ग्रामपंचायतीच्या जुन्या गाळ्यात त्याने आपले ‘सलून’ थाटले होते. एकदा आमच्या अाप्पांसोबत(वडील) या सलूनमध्ये गेलो. तिथे आधीपासूनच पाच-सहा जण नंबरची वाट पहात बसले होते. मला पाहून त्याने अप्पांना विचारले, “इसके बाल काटना है क्या?” अप्पांनी होकारार्थी मान हलवली. त्याच्या बोलण्यातील ‘बाल’ या शब्दाचा अर्थ मी ‘बाळ’ म्हणजे ‘मी’ अशा अर्थाने घेतला. मला वाटले तो माझ्याविषयी बोलतोय म्हणजे मी लहान आहे म्हणून माझे केस इतरांच्या आधी कापेल.पण कसलं काय, बराच वेळ वाट पाहूनच ‘बाळाचा’ नंबर आला. शेवटी ‘हा सरदारजी बोलतो तसे करत नाही’ असा निष्कर्ष मी काढला. या व्यक्तीने साधारण वर्षभर काम केले असावे. नंतर काही कारणाने गाव सोडून तो निघून गेला. तो दुबईला गेल्याचे काहीजण म्हणायचे.  त्याला मी पुन्हा पाहीले ते दोन वर्षानंतर.  गावातील आमच्या एका नातेवाईकांशी त्याचे सौदार्हाचे संबंध होते. त्यांना भेटण्यासाठी तो गावात आला होता. हिंदी चित्रपटातील नायक परदेशातून साहेब बनून येतो तशाच अवतारात तो आला.  नवा गडद रंगाचा कुर्ता, डोळ्यांवर अनिल कपूरचा गॉगल, हातात सोनेरी घड्याळ अशा पेहरावात तो दिसला. पिशवीतून एक बॉक्स काढून म्हणाला, “ये लो, मिठाई खा लो!” आमच्या दृष्टीने मिठाई म्हणजे ‘साखरफुटाणे’. पण त्याच्या बॉक्समधून पेढे निघाले. त्याने मिठाई सांगून पेढे बाहेर काढले, हे पाहून मला नवल वाटले. ‘हा सरदारजी बोलतो तसे करत नाही’ या माझ्या निष्कर्षावर शिक्कामोर्तब झाले.

          या आठवणीतल्या कर्तनकारांसह केसांच्या क्षेत्रातील इतरही कलाकार-कारागीरांच्या हाती डोकं सोपवण्याचे प्रसंग आलेच, पण स्वत:चं डोकं ठिकाणावर नसल्यासारखे प्रयोगही एकदा केला. कॉलेजला सुट्टया लागल्या असतानाचा प्रसंग आहे. त्यावेळी ‘दिल चाहता है’ नावाचा सुंदर चित्रपट आला होता. या चित्रपटात आमिर खानने नविन हेअरस्टाईल केली होती. इतकी सुंदर केशरचना सोडून आम्हाला (म्हणजे माझ्यासारखेच डोकं ठिकाणावर नसलेले आणखी मित्र) अक्षय खन्नासारखा झीरो कट करण्याची इच्छा झाली. बर इच्छा होणे इथपर्यंत ठीक आहे, ती इच्छा आम्ही स्वहस्ते पूर्ण केली. आमच्या कंपूपैकी दोन स्वयंघोषित हेअर ड्रेसर्सनी आम्हाला ‘अक्षय खन्ना’ बनवले.(यातील एकाने तर केस कापण्याच्या नादात आमच्यापेक्षा लहान मित्राचा कानही कापला होता.)  केस कापून झाल्यानंतर आरशात पाहील्यावर आपण गाढवपणा केल्याचे लक्षात आले. झीरो कट आणि अक्षय खन्ना कट या दोघांच्या समन्वयाने खूपच भयंकर असे रुप प्राप्त झाले होते.  सावधगिरीचा उपाय म्हणून सोबत टोपी आणली होती. घरी शांतपणे आलो. सगळ्यांची बोलणी ऐकली. जवळपास पंधरा दिवस टोपी घालून फिरलो. पुन्हा कधी असले उद्याेग न करण्याचा निश्चय केला.
    अतिशय सामान्य वाटणाऱ्या पण आपल्या दर्शनी व्यक्तीमत्वावर परिणाम करणाऱ्या केस कापण्यासारख्या घटनेचे कित्येक बहुरंगी प्रसंग आयुष्यात आले. यातील काही प्रसंगांना पुनर्जिवीत करण्याचा प्रयत्न केलाय. पुढे जसे वय वाढत गेले तसे केस वाढण्याऐवजी कमी होत गेले आणि लहानपणीच्या आठवणीही डोक्यावरील केसांप्रमाणे होऊ लागल्या.

-तुषार म्हात्रे, पिरकोन (उरण)

#केशकर्तनकार
#haircutting
#hairdresser

No comments:

रायगडची लोहयुगीन संस्कृती

रायगडची लोहयुगीन संस्कृती मँडागोरा! ‘पेरिप्लस ऑफ इरिथ्रीयन सी’ या अत्यंत पुरातन आणि महत्त्वपूर्ण दस्ताऐवजांमध्ये नोंदवले गेलेले एक बंद...