Search This Blog

Tuesday, October 24, 2017

तळा मारणे: एक आनंदोत्सव


(पिरकोन मधील मासेमारीच्या अनोख्या परंपरेविषयक लेख)


लहानपणी आम्ही आणि गावातील म्हैशी दोघांचेही हक्काचे स्विमिंग पूल म्हणजे पिरकोनच्या पूर्वेकडील विस्तीर्ण तलाव, गावच्या भाषेत ‘तला’.  पोहण्याच्या सुविधेबरोबरच कपडे धुवण्यासाठीचा धोबी घाटही तोच, विसर्जन तलावही तोच आणि मरणोत्तर विधींसाठीचा घाटही तोच. लग्नसमारंभासाठी लागणारे मंगल जलसुद्धा याच तळ्याचे. गावातील सर्व प्रथा-परंपरांचे केंद्रस्थान म्हणजे हा तलाव. 
कालांतराने या नैसर्गिक स्विमिंग पूलमध्ये माझे पोहणे कमी झाले, मात्र म्हैशींनी अजूनही ही ‘सांस्कृतिक परंपरा’ जपली आहे. 

अशा या बहुढंगी तलावाला भेट देण्याचे माझे प्रमाण कमी झाले असले तरी काही महत्त्वपूर्ण प्रसंगी मी आजही आवर्जून हजेरी लावतो. हे प्रसंग म्हणजे गोपाळकाला आणि गणेश विसर्जन. या सणसमारंभांव्यतिरिक्त आणखी एक वेगळा दिवस, ज्यावेळेस  गावातील कर्तबगार मंडळी (त्यात मी सुद्धा आहे बरं का!)  वर्षातून एक दोन वेळा हजेरी लावतात आणि ज्या दिवसाची मी नेहमीच वाट पहात असतो. हा दिवस म्हणजे ‘तळा मारण्याचा’ दिवस. खरं म्हणजे हा साधासुधा दिवस नसून एक उत्सवच; आनंदोत्सव!
हे ‘तळा मारणे’ म्हणजे काय?
 तळा मारणे म्हणजे “गावाच्या सामाईक मालकीच्या तळ्यात सार्वजनिकरित्या मासे पकडणे!”

या दिवशी गावातील सर्वजण मिळून एकाच वेळेस मासे पकडण्याची बहुमोल कामगिरी बजावतात. हा दिवस सहसा ‘होळी अथवा धुळीवंदन’ या दोघांपैकी एक.  या दोन दिवसांपैकी उपवास नसणारा वार निवडला जातो.(इथे उपवास म्हणजे, फक्त मांसाहार न करण्याचा वार!). त्यानंतर कधीकधी पावसाळा सुरू होण्यापूर्वीसुद्धा तळा मारला जातो. खरं तर तळा मारण्याच्या उत्सवाची लगबग आधीच्या दिवसापासूनच सुरू होते. गावातील बरेचसे लोक इतर गावांतील आपल्या ओळखीपाळखीच्यांकडे धाव घेतात. ही सगळी धावपळ असते ‘आसू’ मिळवण्यासाठीची. कारण ‘तळा मारण्यासाठीचा’ एकमेव नियम म्हणजे फक्त आसूचा वापर. आसू हे एकाच व्यक्तीला वापरता येण्याजोगे मासेमारीचे साधन आहे. लवचिक वेताला गोलाकार वाकवून त्याभोवती विणलेले मासे पकडण्याचे जाळे म्हणजे आसू. याचा आकार गणितातल्या अल्फा या चिन्हासारखा. गावातील जवळपास सर्वच कुटूंबाकडे हे साधन असते. परंतु या आसूचा व्यास जितका जास्त तितका मासे मिळण्याची शक्यताही जास्त. या कारणामुळेच मोठ्यात मोठी आसू आणण्याकडे लोकांचा कल असतो. संध्याकाळी आसवा (आसूचे अनेकवचन) आल्या की तळा मारण्याविषयक चर्चा सुरू होतात. सगळेजण पूर्ण तयारीत असूनही एकमेकांना विचारत राहतात, "हांक मारली काय?” आमच्या गावात अजूनही एखादी सूचना/निर्णय कळवण्यासाठी दवंडीसदृश हाक मारण्याची पद्धत आहे.
“आरं ...उंद्या सकालचे आट वात्ता... गावाचा तला माराचा हाय रंय!” अशी हाक ऐकू आली की ‘तळा मारण्याचा’ दिवस व वेळ निश्चित होते. दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजल्यापासूनच तळ्यावर गर्दी जमा होऊ लागते. ही गर्दी हौशा नवशांची. तळा मारल्यानंतर पाणी गढूळ होऊन कपडे धुवण्यालायक राहणार नाही म्हणून या दिवशी काही महिला सकाळी सहापासूनच कपडे धुवण्यासाठी येऊन जातात. हातात आसू आणि मासे साठवण्यासाठी पिशवी, बरणी, डोबुकरी (वेताने बनलेले मासे ठेवण्याचे भांडे), आखी (कमरेला बांधता येणारी जाळ्याची पिशवी) यांसह मंडळी तयार असतात. मासे सांभाळण्यासाठी कुटुंबातील एखादी व्यक्ती अथवा लहान मुलगाही असतो. प्रत्यक्ष मासेमारांसह उत्साही प्रेक्षकही जमलेले असतात. गावातील सरपंचाच्या हस्ते तळ्याच्या काठावरील दगडी कपारींतल्या म्हशेश्ववराला (म्हसोबा?) नारळ अर्पण केला जातो . काजवीच्या (बेशरमीच्या) झुडूंपांआड पडून राहिलेल्या या म्हशेश्वराला या  दिवशी मान मिळतो. नारळ फोडल्याची हाकाटी झाली की तळ्याच्या काठावरील लोक तळ्यात प्रवेश करून मासे पकडण्यास सुरूवात करतात. एकाच वेळेस शेकडो लोक पाण्यात उतरल्याने पाणी ढवळले जाते. या ढवळण्यामुळे तळ्यातील मासे वर येऊ लागतात. समुद्रमंथनातून जशी समुद्रातील संपत्ती वर आली होती, तसाच काहीसा हा प्रकार. इथे आम्हाला  अमृताहून चविष्ट मासे मिळतातच, जोडीला तळ्यातला खवराही (गाळ) वर येत राहतो. हा गाळ अंगावर बसून आमचाही अवतार खर्पूरगौरा होत जातो. या गाळाला अंगावर घेत लोकं अक्षरश: हल्लाबोल करतात. सुरूवातीला कटल्यांसारखे मोठे मासे मिळतात. पाण्यातील ढवळाढवळ सहन झाल्याने ते वेगाने वर येत राहतात. ‘लाईफ ऑफ पाय’ चित्रपटात मासे पाण्याच्या वर वेगाने उडण्याचा एक नेत्रदिपक प्रसंग आहे , असा प्रसंग देखिल मी या तळ्याच्या साथीने अनुभवला आहे. हे उडणारे मासे नशिबवान लोकांच्या जाळ्यात ते आयतेच सापडत राहतात. या वेळेस मासेमारीतले ‘हेवीवेट्स’ ओळखल्या लोकांकडे प्रेक्षकांचे लक्ष असते. हे ‘हेवीवेटस्’ म्हणजे असे लोक जे मासेमारीला गेल्यावर कधीही रित्या हाती परत न येणारे. त्यांच्या अंगाला ‘वईस’(माशांचा वास) असल्याने त्यांना नेहमीच मासे मिळतात, अशीही चर्चा असते.  त्यांच्या आसूमध्ये फडफड झाली की दर्शक लांबूनच माशाच्या वजनाचा अंदाज बांधतात. आमच्यासारखे नवशिके हळू हळू प्रयत्न करत राहतात. वर येणारे मोजकेच मासे मिळायचे बंद झाल्यावर जो तो आपल्या परीने दुसरी योजना राबवतो. एखादा तळ्याच्या कडेकडेने मासे पकडतो, तर दुसरा ‘चफा’ मारतो. चफा मारण्याचे एक विशेष कौशल्य असते. या प्रकारात आसू दोन्ही हातांनी पकडून वेगाने पाण्यातून फिरवली जाते. आणखी एक कौशल्य म्हणजे ‘वऱ्हा’. हा शब्द खरं म्हणजे ओढणे या क्रियापदातून तयार झालाय. ‘वऱ्हा’ म्हणजे ‘ ओढा’. आसू पाण्याखालून ओढत न्यायची, म्हणजे त्या मार्गात येणारे मासे जाळ्यात सापडतील. हे सर्व काही करण्याला प्रचंड ताकद लागते. कारण पोहत जाऊन पाण्याखाली बुडी मारणे आणि चफा मारून पुन्हा काठावर येणे हा दमछाक प्रकार असतो. पण या धडपडीतून एक जरी मोठा मासा सापडला तरी सगळी मेहनत सार्थकी लागते. तळ्याचा काही भाग उथळ आहे. बरेचजण या भागातच मासे पकडत राहतात. मात्र तळ्याच्या पूर्वेकडचा भाग खोल आहे. या दिशेला मोठे वडाचे झाड असल्याने त्याला ‘वडाची पाली’ म्हणतात. काही ‘खतरो के खिलाडी’ या भागातच मासे पकडतात.(यातही मी आहेच!) कधी कधी आसू बाजूला ठेवून हाताने मासे पकडण्याचे प्रयोगही केले जातात. या प्रयोगात खोल पाण्यात दीर्घ श्वास घेऊन तळाला जायचे. तळाच्या चिखलात इंग्लिश मासे(डुक्कर मासा,फंटूश या नावानेही ओळखला जातो) दडून बसलेले असतात. चिखलात हाताने चाचपून मासे शोधायचे, सापडल्यावर वर आणायचे. मात्र हा जोखमीचा मार्ग चोखळणारे लोकही कमीच. 
काही वेळेस गावाच्या वतीने पावसाळ्यात ‘मत्स्यबीज’ सोडले जाते, त्यामुळे संकरीत जातीचे मासेही सापडतात. तसा मासेमारीसुद्धा शेतीप्रमाणेच बेरभरवशाचा प्रकार असल्याने ‘तळा मारताना’ आपले जाळे रिते राहण्याचेही प्रसंगही येतात. जोरदार पावसामुळे मासे वाहून जाणे, थंडीच्या लाटेत मासे मरून काठावर येणे, कपडे धुवण्याचा परिणाम होऊन देखील मासे मरतात. अशा वेळेस मासे न मिळाल्यावर कोणाच्यातरी नावाने एक नेहमीचा संवाद ऐकायला मिळतो
“यायी यक मासा नाय ठेवला रं!”
मोजक्याच जातींचे मासे पकडत असताना, एका माशाचा उल्लेख करायलाच हवा. या माशाला हाताने पकडण्याचे धारिष्ट्य कोणीच दाखवत नाही.या माशाची दहशत इतकी आहे की ‘हेवीवेट्स’ म्हणून उल्लेख केलेले देखिल हा मासा जाळ्यात सापडल्यावर त्याचे तोंड दगडाने  ठेचून नंतरच हात लावण्याची हिंमत दाखवतात. हा मासा म्हणजे ‘नारशिंगाली’! कॅटफीश प्रजातीतला हा मासा म्हणजे तळ्यातील दहशतवादीच. याच्या कल्ल्याजवळील काटे अत्यंत जहाल असतात. या माशाने काटा मारल्यावर भयंकर कळा येतात. टोचलेल्या जागेत सूज येऊन असह्य वेदना होतात. हा मासा चविष्ट असल्याने काही ‘खतरो के खिलाडी’ जोखीम पत्करतात आणि नंतर सुजलेले हात घेऊन डॉक्टरांकडे रांगा लावतात.(सुदैवाने अजून तरी यात मी नाही)
तास-दोनतासाने माशांची गाठोडी भरून ही दमलेली ‘कर्तबगार मंडळी’ आनंदाने घराकडे परतू लागते. प्रेक्षक या लोकांना खुणेनेच किती मिळाल्याची चौकशी करतात. मासे पकडून येणाऱ्यास किती मिळाले असे विचारल्यास एक नेहमीचे उत्तर ऐकू येते- “मिललाय जवापुरता!”
म्हणजे जेवणापुरते. स्वत:ला न पेलवणारे मासे सापडल्यावरही हेच उत्तर आणि कमी असेल तरीही हेच. दमले भागलेले मासेमार घरी आल्यावर मत्स्यकमाई पाहून आनंदी होतात. सगळा शीण निघून जातो. ज्यांची आसू आणलेली असते अशांना, नातेवाईक, मित्रमंडळींना वाटा काढून उरलेल्या माशांना पोटाची वाट दाखवली जाते.


विविधरंगी, बहुढंगी आणि अतरंगी लोकांना एकत्र करणारा उत्सव...
कोण किती ‘पानी में’ हे प्रत्यक्षात दाखवणारा उत्सव...
मासेमारीच्या पारंपारिक कौशल्याला जीवंत ठेवणारा उत्सव...
गावच्या पाण्यातला आनंदोत्सव!
हा  आनंदोत्सव अनुभवायचा असेल तर जरूर या...
आम्ही वाट पाहतोय!

-तुषार म्हात्रे, पिरकोन (उरण)

2 comments:

Unknown said...

खूपच छान सर

ATUL JAGTAP said...

मासे पकडन्याच्या इतक़या पद्धति असतात हे पाहुन खूप आश्चर्य वाटले!

रायगडची लोहयुगीन संस्कृती

रायगडची लोहयुगीन संस्कृती मँडागोरा! ‘पेरिप्लस ऑफ इरिथ्रीयन सी’ या अत्यंत पुरातन आणि महत्त्वपूर्ण दस्ताऐवजांमध्ये नोंदवले गेलेले एक बंद...