Search This Blog

Monday, October 2, 2017

गांधी‘वादा’ची नांदी!

सुमारे चार वर्षापूर्वीचा प्रसंग.डिसेंबर महिन्याच्या कडाक्याच्या थंडीत फरिदाबाद येथील एक कॉन्फरन्स आटोपून दिल्लीकडे निघालो. दिल्लीत फिरण्यासाठी पुढील योजना आखत होतो. माझ्यासोबत आणखी चार सहकारी होते. सकाळी दहाच्या सुमारास लाल किल्ल्याजवळ पोहोचलो. सोमवार असल्याने किल्ल्याचे प्रवेशद्वार बंद. बाहेरूनच धुक्यामुळे पांढरा झालेला लाल किल्ला पाहिला आणि एक टुरिस्ट बस पकडून जिवाची दिल्ली करण्यास निघालो. एक दोन स्थळे पाहिल्यानंतर गाईडने पुढील स्थऴाचे नाव घोषित केले. राजघाट! नाव ऐकून डोळे चमकले.उत्साहाने हिरवळीतून मार्गक्रमण करत समाधीस्थळाजवळ पोहोचलो. महात्मा गांधींच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले.तेथील वातावरण पाहून भारावून गेलो.  सोबत असलेल्या राहुलला आवर्जून माझा फोटो काढायला लावला. माझ्या मनातील  एक  अपूर्ण इच्छा पूर्ण झाली.
‘तिरस्कार ते आदरभावना’ असा दोन विरूद्ध टोकांचा प्रवास सहज होत नाही. माझ्याबाबतीत तो घडलाय. याला कारणीभूत अाहे महात्मा गांधींची ‘कृतियुक्त विचारशैली’.
     शाळेत असल्यापासून भिंतीवर हसऱ्या छबीची गांधी प्रतिमा पाहत आलोय. जोडीला रंग उडालेल्या भिंतीवरील निर्जीव चित्रेही. ‘एक रुपाया चांदीचा, सारा देश गांधीचा’ या स्वरूपातल्या घोषणाही दिल्या-ऐकल्या. पण ‘गांधी’ नावाच्या माणसाचे विचार फारसे ऐकायला मिळाले नाहीत. नाही म्हणायला स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, गांधी जयंती-पुण्यतिथीला विद्यार्थ्यांनी रट्टा मारून केलेली रटाळ भाषणे ऐकायला मिळायची. शालेय जीवनात ‘महान व्यक्तींवरील’ सर्वाधिक विनोद, कुचेष्टा ‘गांधी’ नावाभोवतीच फिरणाऱ्या होत्या. त्यांच्या शरीरप्रकृतीवरून, कपड्यांवरून विनोद केले जायचे (अजूनही केले जातात). या  वातावरणातच ‘गांधी’ नावाची एक विशिष्ट प्रतिमा आपोआपच तयार होत गेली. पुढे थोडी समज यायच्या वयात ‘गांधींमुळे आपल्याला स्वातंत्र्य थोडे उशिराने मिळाले’ या आशयाचे वाक्य कानावर  पडायचे.  सत्य, अहिंसा वगैरे शब्द त्यावेळी खूपच तकलादू वाटायचे. उपलब्ध स्रोतांतून गांधींविषयी फार चांगले पहायला ऐकायला मिळत नव्हते. वाचनाची आवड पूर्वीपासून होतीच. पण तरीही ‘गांधी विचारधारा’ किंवा तत्सम  काही माझ्यापर्यंत पोहचत नव्हते. घरात गांधीजींवरील ‘ प्रेषित’ नाव असलेले कव्हर फाटलेले पुस्तक होते. पण मला ते कधिही उघडून वाचावेसे वाटले नाही. गांधीजींचा प्रत्यक्ष उल्लेख असलेले पहिले पुस्तक वाचले ते म्हणजे गोपाळ गोडसेंचे ‘गांधीहत्या आणि मी’; त्यानंतर बऱ्याच वर्षांनी ‘पंचावन्न कोटींचे बळी’. इथपर्यंतच्या सर्व वाचनातून आणि उपलब्ध माहितीवरून ‘मोहनदास करमचंद गांधी’ नावाची एक फसव्या व्यक्तिमत्त्वाची व्यक्ती भारतात होऊन गेली, हाच माझा समज होता. गांधीजींविषयी टोकाचा अनादर असताना, ‘राजघाटा’पर्यंतच्या प्रवासात असे काय घडले की मी केवळ त्या स्थळाचे नाव  ऐकल्याबरोबर उल्हासित झालो, समाधीचे दर्शन घेताना भारावून गेलो?
गांधी नावाचे गारूड माझ्याही विचारांवर कसे झाले?
     मला जरी गांधीजींचे विचार पटत नव्हते तरी प्राथमिक शाळेत असताना आमच्या शिक्षकांनी शिकवलेला ‘प्रथम श्रेणीच्या डब्यातला’ प्रसंग माझ्या मनावर बिंबला होता. अन्यायाविरूद्ध आवाज उठवणारा ‘गांधी’ मी त्या पाठात अनुभवला होता. माझ्या मनातील महात्म्याच्या कलुषित प्रतिमेला सर्वप्रथम छेद दिला तो नारायणभाई देसाईंच्या अचंबित करणाऱ्या बापूकथा या मथळ्याखालील ‘अज्ञात गांधी’ नावाच्या पुस्तकाने. समकालीन प्रकाशनने प्रकाशित केलेल्या नव्या कोऱ्या आणि सर्वार्थाने हटके अशा श्रेणीतील हे पुस्तक. नावातील वेगळेपणामुळे मी ते वाचले, पुन्हा पुन्हा वाचले. काहीतरी वेगळेपणा होता या पुस्तकात, लेखन शैलीत आणि बापूंच्या विचारांत.  हे वेगळेपणच मला भावले. ग्रंथालयाचे पुस्तक परत केल्यानंतर मी दादरच्या आयडीयल मधून ‘अज्ञात गांधी’ विकत  घेतले, माझ्यासाठी. लगेचच काही दिवसांनी बापूंची आत्मकथा म्हणजेच सत्यकथा वाचली. हे पुस्तकही माझ्या संग्रही आहे. यानंतर ‘महात्मा गांधी’ नावाने मिळालेले चांगले वाईट सर्व प्रकारचे साहित्य वाचले. माझ्यावरील गांधी विचारांचा प्रभाव वाढला. तिरस्काराच्या भावनेचे रुपांतर ‘कुतूहलयुक्त आदरात’ झाले.  यापूर्वी सुमती देवस्थळेंचे 'टॉलस्टॉय: एक माणूस’ हे पुस्तक वाचले होते. यातील ‘टॉलस्टॉय आणि गांधीजी’ यांचे पत्रनाते माहिती होते. गांधीजींचे सत्याचे प्रयोग टॉलस्टॉयच्याच विचारांनी प्रेरित होते.  हे वाचन चालू असतानाच एके दिवशी हॉलीवूडचा आयर्न मॅन ‘बेन किंग्जले’ने अजरामर केलेला ‘गांधी’ नावाचा चित्रपट पाहीला. शटर आयलंड, आयर्न मॅन, प्रिंस ऑफ पर्शिया मध्ये पाहिलेला हा अॅक्शन हिरो एका योग्याची भूमिका अक्षरश: जगत होता. दोन चार दिवसांनीच लोकसत्तात या चित्रपटाचे दिग्दर्शक रिचर्ड अॅटनबरोंची ‘गांधी’ चित्रपटनिर्मितीमागची दोन दशकांची संघर्ष कथा वाचायला मिळाली. या चित्रपटाविषयीचा आणि महात्म्याविषयीचा आदर दुणावला. हा आदर टिकूनही राहीलाय. भारतातील स्वातंत्र्यलढ्यापेक्षाही अधिक त्यांचे दक्षिण आफ्रीकेतील कार्य मला प्रेरीत करते. त्यांचे अन्यायाविरूद्ध आवाज उठवणारे संघर्षमय प्रसंग मला प्रेरणा देतात. कोणत्याही तत्वज्ञानाची सूत्रबद्ध मांडणी न  करता  स्वत:च्या कृतीतून तत्वज्ञानाला आचरणात आणणारे बापू मला आवडतात.   बापूंची आत्मकथा वाचल्यानंतर मी माझा  संयम तपासण्यासाठी एक वर्षाहूनही अधिक काळ शाकाहारी राहीलो होतो.(मला वैयक्तिकरित्या ओळखणाऱ्यांना हे माझ्यासाठी किती कठीण आहे याची कल्पना असू शकेल). अर्थात हा प्रयोग केवळ प्रतिकात्मक होता. मी जसजसे त्यांच्याविषयी वाचत चाललोय तसतसे समोर येणारे नविन पैलू मला गांधीविचारांकडे झुकवत चालले आहेत.   बापूंभोवती रेंगाळणाऱ्या गैरसमजांचे धुके दूर करण्यात ‘अक्षरनामा’ या वेब पोर्टलचा सुद्धा मोठा वाटा आहे. यातील प्रत्येक महिन्याच्या दोन तारखेला येणारे सदर मी नियमितपणे वाचतोय.
एक खंत वाटतेय, ती म्हणजे शांतीचे प्रतिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या माणसाला शांतीचे नोबेल पारितोषक मिळाले नाही. गांधींच्या विचारांनी प्रेरित झालेल्या नेल्सन मंडेला, बराक ओबामा यांना नोबेल मिळाले पण गांधींना नाही. असो, बहुतेक नोबेलच्या नशिबात गांधीजी नसावे.
येत्या काही वर्षात गांधी जयंतीचे ‘शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्ष’ सुरू होईल. या निमित्ताने आपल्या जाणिवा पुन्हा एकदा तपासून पाहूया. कोणताही विचार परिपूर्ण नसतो. त्याला काळाच्या कसोटीवर घासून पहाणे गरजेचे असते. हे पाहताना विचारातील संदिग्धता, विसंगती  शोधता येते. गांधीविचाराबाबत असहमती दर्शवूनही आपण त्याचा कालसुसंगत विचार करू शकतो. एखाद्या विचारधारेबाबत असहमती दर्शवणे अथवा समज-गैरसमजाचे थर साचत जाणे म्हणजे त्या विचारधारेला विरोध करणे नसते तर विचार तपासण्याची ती एक संधीही असते. यासाठीच सांगोवांगीच्या कथांवर विश्वास न ठेवता चिकीत्सक वृत्तीने गांधी शोधूया. जर त्यांचे  विचार सोन्यासारखे असतील तर आगीतून तावून सुलाखून निघाल्यानंतर अधिकच चमकतील. पण त्यासाठी चिकीत्सक वृत्तीची धग आणि विवेकबुद्धीची नजर गरजेची आहे. यातूनच सत्य काय ते सापडू शकेल. गांधीविचारांना अभ्यासण्याची आणखी एक संधी स्वत:ला देऊया, स्वत:साठी.

- तुषार म्हात्रे, पिरकोन (उरण)

No comments:

रायगडची लोहयुगीन संस्कृती

रायगडची लोहयुगीन संस्कृती मँडागोरा! ‘पेरिप्लस ऑफ इरिथ्रीयन सी’ या अत्यंत पुरातन आणि महत्त्वपूर्ण दस्ताऐवजांमध्ये नोंदवले गेलेले एक बंद...