Search This Blog

Wednesday, September 13, 2017

सामान्यांचे असामान्य टॉकीज

(‘विलक्षण अनुभवांचे लिखित क्षण’- तुषार म्हात्रे)

       अन्न, वस्त्र, निवारा आणि सिनेमा या आमच्यासारख्या सामान्य भारतीयाच्या मूलभूत गरजा. पहिल्या तीन गरजांपैकी एखादी अपूर्ण राहिली तरी चालेल पण ‘सिनेमा’ ही गरज पूर्ण व्हायलाच हवी हे नक्की. खोटं वाटत असेल तर खच्चून भरलेल्या ट्रेनमध्ये तल्लीन होऊन मोबाईलवर पायरेटेड सिनेमे पाहणाऱ्यांना विचारा. इतर प्रवासी दोन पायांवर सरळ उभे राहण्याचा आटोकाट प्रयत्न करत असताना भक्तीभावाने सिनेमे पाहणाऱ्यांना आठवा. पोटात भूक, कपडे विस्कटलेले आणि उभे राहण्यासाठीही जागा नसताना चित्रपटाचा आनंद घेतला जाणे ही बाब चित्रपटाला मूलभूत गरजांमध्येच नेऊन ठेवते. संपूर्ण जग या सिनेमांच्या प्रेमात पडला असताना मी सुद्धा त्याला कसा अपवाद असेन?

टी.व्ही, लॅपटॉप, मोबाईल, टॉकीज; शक्य होईल त्या मार्गाने मी माझी चित्रपट पाहण्याची हौस भागवत आलो आहे. माझ्या सिनेमॅटीक आठवणींमध्ये महाडच्या एका टॉकीजचे नाव चोवीस कॅरेट सुवर्णाक्षरांनी लिहलं जाईल. मी नोकरीच्या सुरूवातीच्या काळात पोलादपूर येथे वास्तव्यास होतो. रायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक महत्त्व असलेल्या पोलादपूर तालुक्यात एकही चित्रपटगृह नसल्याने माझ्यासारख्या अनेक सामान्य जनतेची गैरसोय होत होती. त्यामुळे माझी रुपेरी हौस भागवण्यासाठी जवळील महाड शहराकडे जावे लागले. महाडमधील या ‘असामान्य’ टॉकीजला पहिल्यांदा पाहिलं ते शाहिदच्या ‘कमिने’ चित्रपटाच्या निमित्ताने. रिकामा  रविवार पाहून अनिकेत दरेकर आणि सुमित असे दोन दरेकर बंधू चित्रपटाच्या नावासारखेच सोबती घेऊन महाडकडे कूच केली. दुपारी बाराच्या खेळाच्या अंदाजाने साडे अकराच्या सुमारास महाडात दाखल झालो. सुप्रसिद्ध शिवाजी चौकातून चालत जाऊन टॉकीजपर्यंत पोचलो. तिकीट टपरीपाशी (त्या प्रकाराला तिकीट खिडकी म्हणता येणार नाही.)धोनी सारखे लांब केस असणारा व्यक्ती हातात झाडू घेऊन उभा होता. चौकशी केली असता प्रेक्षक संख्येअभावी दुपारचा खेळ रद्द झाल्याचे कळले. थोडा निराश झालो पण सुमितने लगेचच दुसरीकडे फिरायला जाण्याचा बेत आखला आणि त्याच्या बाईकवर ट्रिपलसीट बसून प्लॅन बी ठरवला आणि ‘शिवथर घळ’ परीसराकडे रवाना झालो.

   पहिल्याच प्रयत्नात अपयश आल्याने पुढच्या वेळेस चित्रपट पाहण्यासाठी अधिक काळजीपूर्वक नियोजन करण्याचे ठरले. अनिकेत महाडजवळील कॉलेजमध्ये बी.एस.सी.आय.टी.ला होता. त्यामुळे त्याचे महाडला नेहमी येणे जाणे होते. वेळ मिळाल्यावर कधी कधी तो कॉलेजलाही जात असे. त्याला पुढील चित्रपटाची चौकशी करण्यास सांगीतले. एका शनिवारी त्याने ‘दिल बोले हडीप्पा’ या चित्रपटाचा दुपारी  अडीचचा शो असल्याचे सांगीतले. चित्रपटाविषयी फारशी उत्सुकता नव्हतीच, पण शाहिद कपूर आणि राणी मुखर्जी ही नावे पाहून पुन्हा थिएटरवर चालून गेलो. यावेळेस फक्त अनिकेत आणि मी असे दोघेच होतो. दुपारी दोनच्या सुमारास टॉकीजजवळ पोचलो. तिकीट टपरीवर जाऊन दोन तिकीटे मागीतली. पाकीटातल्या आतील कप्प्यात घडी घालून लपवलेली पाचशेची नोट काढली.

_“चाळीस रूपये सुट्टे द्या!”_ धोनीसारखे लांब केस असणाऱ्या व्यक्तीने तिकीट-टपरीच्या आतून आवाज दिला.

चाळीस रूपये प्रत्येकी म्हणजे दोघांचे ऐंशी रुपये या हिशेबाने मी शंभर रुपये दिले. आतून साठ रुपये परत आले. मी पैसे हातात घेऊन आश्चर्याने पहात असताना आतून पुन्हा आवाज आला, _“बराबर झाले, वीस रुपये तिकीट आहे.”_
 मला आश्चर्याचा पण आनंददायी धक्का बसला.

टपरीतला आवाज ऐकून अनिकेत पुढे येऊन म्हणाला , _“वीस रुपये? मागच्या महिन्यात तर पंधरा रुपये होते!”_
 हा दुसरा धक्का.
 ही सात वर्षापूर्वीची गोष्ट आहे आणि इतक्या कमी दरात चित्रपट दाखवणारे दुसरे कोणतेही टॉकीज मला तरी माहित नाही. तिकीटे खिशात घालून गेट उघडण्याची वाट पहात उभा राहिलो. आधीचा शो संपायला पाच एक मिनीटे बाकी होती. आतल्या चित्रपटाचे संवाद स्पष्टपणे बाहेर एेकू येत होते. थिएटर बाहेर येणारा आवाज ऐकून मला लहाणपणी गावाकडे शेतातील ओपन थिएटरमध्ये लावल्या जाणाऱ्या पडद्यावरील चित्रपटांची आठवण झाली. त्या काळी पडद्यावरील चित्रपट पाहण्यासाठी गेल्यावर लांबूनच आवाज ऐकून उत्सुकता वाढायची, तशीच काहीशी अवस्था झाली होती. आधीचा शो संपला, मोजकेच प्रेक्षक बाहेर पडले. नव्याने रंगकाम केलेला जुना लोखंडी गेट उघडला गेला. उघड्या मोठ्या लाकडी दाराला लागून असलेला एक सरकवता येणारा जाड काळा पडदा बाजूला सारून आम्ही थिएटरमध्ये शिरलो. आतील अर्धवट प्रकाशात मी तिकीटावरील सीट क्रमांक पाहू लागलो. मला अनिकेतने थांबवलं आणि आपण इतरांच्या आधी आत आलो आहोत त्यामुळे पाहिजे त्या सीटवर बसता येईल असा नियम सांगीतला. लाकडाचे मजबूत बांधकाम असलेल्या या थिएटरमध्ये पंखा आणि स्वच्छ खुर्ची पाहून बसलो. बाहेरच्या वातावरणापेक्षा आतमध्ये थंड वाटत होतं. आम्ही ज्या रांगेत बसलो होतो त्या रांगेत आणखी काही प्रेक्षक बसले, परंतु आमच्या पुढच्या आणि पाठीमागच्या रांगेत कोणीच बसत नव्हतं. बाल्कनीची सुविधा असलेलं जुन्या काळातलं हे टॉकीज बऱ्यापैकी मेंटेन केलेलं वाटत होतं. इथल्या बाल्कनीचं तिकीट महाग होतं. (तब्बल पंचवीस रुपये! ) त्यामुळे आम्ही स्टॉलचंच तिकीट घेतलं होतं.  मी  संपूर्ण थिएटर न्याहाळत असताना तिकीट टपरीवरच्या धोनीनं धावत येऊन दरवाजाचा काळा पडदा सरकवून अंधार केला आणि राष्ट्रगीत सुरू झालं. चित्रपटाला सुरूवात झाली. चित्रपट अपेक्षेप्रमाणेच कंटाळवाणा होता. पण पडद्यावरील चित्रपट पाहताना बाजूच्या परिस्थितीचा विसर पडला. पिक्चर क्वालिटी चांगलीच होती. साऊंड सिस्टीमबद्दल वेगळे बोलायची गरज नाही, गेटवर असतानाचा बाहेर आवाज येण्याचा प्रसंग वर उल्लेखलेलाच आहे. थोड्या वेळाने अनिकेतने मला आजूबाजूला बघायला सांगितले. आमच्या पुढे मागे कोणीच का बसले नाही या प्रश्नाचे उत्तर मला मिळाले. प्रेक्षकांमधील प्रत्येकजण ‘दिवार’मधील अमिताभ सारखे पुढच्या सीटवर पाय ठेऊन रेलून बसले होते. मी पण त्यांचाच कित्ता गिरवला. क्रिकेटवर आधारीत चित्रपट असल्याने आणि पैसे भरलेले असल्याने चित्रपट मन लावून पाहू लागलो. इंटर्व्हलला एक-दोन मिनीटे बाकी असताना धोनीने दरवाजासमोरील काळा पडदा सरकवला आणि पळत निघून गेला. अचानक उजेड आल्याने सर्वजण वैतागले, पण इंटर्व्हल झाल्याचे कळल्याने शांत झाले. मोकळे होण्यासाठी बाहेर आलो. खूप मोठ्या पिंपळाच्या वृक्षाच्या छायेत असलेल्या, दरवाजे व छप्पर नसलेल्या खुल्या मुतारीमध्ये जाऊन आलो. समोर पाहतोय तो लांब केसांचा धोनी एका टेबलवर पॉपकॉर्न,शेंगदाणे विकायला बसलेला!

‘जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी’ तोच!

अनिकेतने शेंगदाणे घेतले. दोन रुपयांना एक पुडी.

_“सर, हा धोनीच बहुतेक टॉकीजचा मालक असावा!”_ अनिकेत शेंगदाणे खात म्हणाला. _“मलाही तसंच वाटतंय”_, मी मान हलवून सहमती दर्शवली. मी मनातल्या मनात विधात्याचे आणि थिएटर मालकाचे आभार मानले ज्याच्या  कृपेने या महागाईच्या दिवसांत अशी स्वस्ताई पहायला मिळत होती.

धोनीने टेबलवरील सामान आवरून पुन्हा काळा पडदा सरकवला आणि चित्रपट सुरू झाला. शाहिद-राणी नसलेल्या कथानकामध्ये जीव ओतण्याचा प्रयत्न करत होते आणि आम्ही दोघे एकेका प्रेक्षकाचे निरीक्षण करत चित्रपटगृह एंजॉय करत होतो. अखेर ज्या क्षणाची आम्ही आतुरतेने वाट बघत होतो तो क्षण आला.चित्रपट संपला (एकदाचा!). संध्याकाळी रूमवर आलो आणि टॉकीजचे एकेक किस्से आठवून खूप हसलो. अनिकेतने विचारलं, _“सर पुन्हा जायचं का?”_ मी हसून होकार दिला.

पुन्हा जायचा योग दोन महिन्यांनी आला. माझ्या आवडत्या रणबीर कपूरचा ‘अजब प्रेम की गज़ब कहानी’ लागला होता. मागच्या अनुभवातून धडा घेत चाैकशी करुन टॉकीज गाठले. थिएटरमधील ‘अवतारी पुरूष’ स्वागताला हजर होताच. तिकीट काढून पंखा आणि स्वच्छ खुर्चीच्या शोधात निघालो. तेवढ्यात धोनीचा बाहेरून आवाज आला, _“तिकीटावरच्या नंबरवरच बसायचा!”_

    ह्या सीट नंबरचा नियम पाळण्याच्या आदेशाचे कारण आधीच्या महिन्यात दडले होते. महिन्याभरापूर्वी सलमान खानचा ‘वाँटेड’ रिलीज झाला होता. सलमानच्या चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीला पुन्हा एकदा सोन्याचे दिवस दाखवणाऱ्या या चित्रपटाने महाडमधील गरीबांच्या टॉकीजलाही तारले. दिवसाला एक शो व्हायची मुसिबत असणाऱ्या थिएटरमध्ये ‘वाँटेड’ चे शो ‘मोस्ट वॉंटेड’ ठरले. दिवसाला चार-चार शो होऊ लागले; ते ही हाऊसफुल्ल! या चित्रपटाने टॉकीजमध्ये महिनाभर धुमाकूळ घातला. हातावर पोट असणाऱ्यांना दोन घटका करमणूकीसाठी अॅक्शन पॅक्ड सलमान खान नेहमीच हवा असतो. या चित्रपटामुळे बऱ्याचशा प्रेक्षकांचे पाय चित्रपटगृहाकडे वळले. त्याचाच परिणाम होऊन टॉकीजमध्ये पुन्हा शिस्तीचे वारे वाहू लागले.

     आम्ही धोनीच्या आदेशाकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले आणि पुन्हा पंखा आणि स्वच्छ खुर्ची असा दुर्मिळ संयोग शोधून आसनस्थ झालो. चित्रपट खूपच मनोरंजक होता. चित्रपटाच्या जोडीला आमचे प्रेक्षक निरीक्षण चालूच होते. चित्रपट सुरू होऊन अर्धा तास झाला असतानाच बाहेरचं वास्तव आणि आतील स्वप्नं यांना विलग करणारा काळा पडदा उघडला गेला. इंटर्व्हलशिवाय सहसा न सरकणारा पडदा सरकल्याने सर्वांचे लक्ष दरवाजाकडे गेले. धोनीने दोन नविन प्रेक्षकांना आमच्यात सामील केले. एखाद्या बांधकाम कामगारांप्रमाणे वेश असणारे दोघे अंधारात चाचपडत पहिल्यांदा जमिनीवरच बसले. नंतर एकाने त्यांना मोबाईल फोनच्या प्रकाशात रिकामी खुर्ची दाखवली. त्या आधारे ते आमच्या रांगेत येऊन बसले.  आमच्या जवळच्या खुर्चीत बसल्याने त्यांच्या हातातल्या कोल्ड्रींकच्या काचेच्या(!) बाटल्या मला स्पष्टपणे दिसल्या. मी अनिकेतला बाटल्यांकडे पाहण्यास सांगीतले. त्यात शीतपेयच असावे, पण आश्चर्याची बाब म्हणजे या टॉकीजच्या जवळपास एकही दुकान, हॉटेल किंवा टपरी नव्हती. त्यामुळे या दोघांनी आणलेल्या बाटल्या दहा ते पंधरा मिनीटे चालत जावे लागेल इतक्या लांबून आणलेल्या असणार हे नक्की. इतक्या लांबून झाकण उघडलेल्या काचेच्या बाटल्या घेऊन चित्रपट पाहण्यास येणे हे खरे कौशल्याचेच काम आहे.

 चित्रपट पैसा वसूल होताच त्यातच मनोरंजनाचा अतिरीक्त डोस थिएटर मधील गंमतीदार प्रसंगांद्वारे वेगऴ्याच पद्धतीने मिळत होता.

अशा अनेक गंमती-जंमती या टॉकीजमध्ये पहायला मिळायच्या. ‘कुर्बान’ चित्रपटाच्या वेळेस तर पाठीमागच्या रांगेत बसलेल्या एका टोळक्याने चित्रपटाला कंटाळून मोबाईलवर व्हिडीओ पाहण्यास सुरूवात केली होती. या व्हिडीओला मूळ चित्रपटापेक्षा अधिक हिट्स मिळाले असतील. खरं तर टॉकीज मालकांनी आमच्याकडून या अतिरिक्त मनोरंजनाचे शुल्क घ्यायला हरकत नव्हती.

     तांत्रिकदृष्ट्या गैरसोयीचे पण महागाईच्या काळात परवडणाऱ्या या असामान्य टॉकीजला आम्ही नेहमीच ‘एंजॉय’ केलंय. एका ‘शो’ साठी  प्रतिव्यक्ती पाचशेच्या घरात जाणाऱ्या मल्टीफ्लेक्समध्ये गेल्यावर पन्नास रुपयांत दोघांचा खर्च भागवणाऱ्या या थिएटरच्या आठवणीने गदगदून येते. कष्टकऱ्यांच्या रक्त आटवणाऱ्या जीवनात, पैशाच्या पाठीमागे धावताना अगदी कमी पैशामध्ये मनाला स्वप्नांच्या दुनियेत घेऊन जाणाऱ्या या टॉकीजची भूमिका कमी महत्त्वाची नाही.

 “नसतील या टॉकीजमध्ये सोयीसुविधा, नसेल एअरकंडीशनरचा खोटा थंडावा... नसेल चटपटीत पॉपकॉर्नची चव, नसेल कोल्ड्रिंगची सर...

पण या टॉकीजला माणसं यावीशी वाटताहेत... टाईमपास वाटणाऱ्या फसव्या स्वप्नांमध्ये इथला कष्टकरी आनंदी होतोय... आपले दु:ख विसरतोय... काहीही म्हणा तुम्ही आम्हाला...

पण सर्वसामान्यांना इथे आजही आनंद वाटतोय...

उद्याही वाटेल...

वाटेल ना?”

- तुषार म्हात्रे, पिरकोन (उरण)

1 comment:

Tushar Mhatre said...

http://epaper.lokprabha.com/m5/1475173/Lokprabha/29-12-2017#issue/54/1

रायगडची लोहयुगीन संस्कृती

रायगडची लोहयुगीन संस्कृती मँडागोरा! ‘पेरिप्लस ऑफ इरिथ्रीयन सी’ या अत्यंत पुरातन आणि महत्त्वपूर्ण दस्ताऐवजांमध्ये नोंदवले गेलेले एक बंद...