रायगडचे ‘हेन्री-केन्री’

रायगडच्या हेन्री-केन्रीची साद ऐका! “खांदेरी-उंदेरी या दोघीजणी जावा, मधीन कुलाबा तो कैसा झेलतंय हवा...” रायगड जिल्ह्यातील अलिबागसमोरील खोल समुद्रात असलेल्या खांदेरी- उंदेरी या दोन बेटांचे वर्णन करणारे हे गीत. दोन बेटांमधील नाते हे गीत स्पष्ट करते. मुंबई बंदराच्या दक्षिणेस सुमारे १७ कि.मी. वर व मुख्य भूमीपासून सुमारे चार कि.मी. वर असणारी ही बेटे. समकालीन इंग्रजी कागदपत्रांमध्ये हेन्री केन्री (Hendry Kendry किंवा Henry Kenry) असे नामोल्लेख असलेली ही ठिकाणे अभ्यासकांना नेहमीच खुणावत असतात. परंतु ही बेटे व त्यावरील किल्ले पाहणे मात्र सहज शक्य नसते. उंदेरी बेटावर फारसे कोणी फिरकत नाहीत. तर खांदेरी बेट केंद्र सरकारच्या तटरक्षक दलाच्या अखत्यारीत असल्याने सामान्यजनांना ते सहज उपलब्ध नाही. शिवकालीन जलदुर्गांपैकी एक असलेल्या या ठिकाणी जाण्यासाठी थळ या गावातून एखादी बोट ठरवून जाता येते. बोटीने निघाल्यास समुद्रात डावीकडे दीपगृह असलेली उंच टेकडी दिसते. हे खांदेरी बेट. त्याच्या उजवीकडे किरकोळ उंचीचे छोटे बेट म्हणजे उंदेरी. खांदे...