Search This Blog

Thursday, July 13, 2023

रायगडचे ‘हेन्री-केन्री’

रायगडच्या हेन्री-केन्रीची साद ऐका!

“खांदेरी-उंदेरी या दोघीजणी जावा,
     मधीन कुलाबा तो कैसा झेलतंय हवा...”
      रायगड जिल्ह्यातील अलिबागसमोरील खोल समुद्रात असलेल्या खांदेरी- उंदेरी या दोन बेटांचे वर्णन करणारे हे गीत. दोन बेटांमधील नाते हे गीत स्पष्ट करते. मुंबई बंदराच्या दक्षिणेस सुमारे १७ कि.मी. वर व मुख्य भूमीपासून सुमारे चार कि.मी. वर असणारी ही बेटे. समकालीन इंग्रजी कागदपत्रांमध्ये हेन्री केन्री (Hendry Kendry किंवा Henry Kenry) असे नामोल्लेख असलेली ही ठिकाणे अभ्यासकांना नेहमीच खुणावत असतात.  परंतु ही बेटे व त्यावरील किल्ले पाहणे मात्र सहज शक्य नसते.
 उंदेरी बेटावर फारसे कोणी फिरकत नाहीत. तर खांदेरी बेट केंद्र सरकारच्या तटरक्षक दलाच्या अखत्यारीत असल्याने सामान्यजनांना ते सहज उपलब्ध नाही.  शिवकालीन जलदुर्गांपैकी एक असलेल्या या ठिकाणी जाण्यासाठी थळ या गावातून एखादी बोट ठरवून जाता येते. बोटीने निघाल्यास समुद्रात डावीकडे दीपगृह असलेली उंच टेकडी दिसते. हे खांदेरी बेट. त्याच्या उजवीकडे किरकोळ उंचीचे छोटे बेट म्हणजे उंदेरी.
खांदेरीत प्रवेश करताना सुरुवातीलाच ‘कान्होजी आंग्रे द्वीप’ अशी मोठी पाटी दिसते. चढण असलेल्या खडकावरून पायी चालत गेल्यावर वेताळदेव मंदिरात पोहोचता येते. शेंदूरचर्चित वेताळदेव हा इथल्या मच्छीमार कोळ्यांचे दैवत. ‘बॉम्बे पोर्ट ट्रस्ट’च्या ताब्यातील बेटावरील या ब्रिटिशकालीन दीपगृहाला कान्होजी आंग्रे यांचे नाव देण्यात आले आहे. हे संरक्षित क्षेत्र असल्याने दीपगृह आतून पाहता येत नाही.खांदेरीवरून उंदेरीला  बोटीने जावे लागते. पण इथल्या बेटाला धक्का नाही. यामुळे बेटावर उतरताना काळजीपूर्वक उतरावे लागते. नाही म्हणायला उंदेरीच्या ईशान्य टोकापाशी नौका नांगरता येण्याजोगी थोडी जागा आहे; बाकी भोवताली खडक आहेत. उंदेरीवरील किल्ल्याचे प्रवेशद्वार थोडे लहानच आहे. खांदेरीच्या मानाने हे बेट खूपच लहान आहे. त्याच्या मध्यभागी पठारासारखे सपाट मैदान दिसते. त्यावर अनेक इमारतींचे भुईसपाट झालेले अवशेष शिल्लक राहिलेले दिसतात. बेटावरून चहूबाजूला विशाल समुद्र दिसत राहतो. किल्ल्याच्या खालच्या अंगाला एक दुहेरी तटबंदी आहे. या तटबंदीला छोटे बुरुज असून, अखेरच्या बुरुजावर तीन तोफाही आहेत. त्याचबरोबर सुरुवातीच्या बुरुजावरही एक तोफ आहे.
 सध्या विस्मृतीत गेलेल्या या बेटांचे महत्त्व ब्रिटीशांच्या मुंबई कौन्सिलने सुरत कौन्सिलला पाठवलेल्या एका पत्रावरून लक्षात येईल.
    या पत्रात ते लिहितात  की,
    “हे (बेट) अशा ठिकाणी आहे की जर आपण कोणाला तिथे किल्ला बांधू दिला तर ते चालू देतील त्यापेक्षा अधिक व्यापार या (मुंबई) बेटावर होण्याची आशाच आपण ठेवता कामा नये.”

      थोडक्यात मुंबईपासून ते रायगड किनारपट्टीने चालणाऱ्या सागरी व्यापारावर नियंत्रण ठेवण्याचे काम या बेटाद्वारे होऊ शकते.  यामुळेच इसवी सन १६७२ मध्ये शिवाजी महाराजांनी खांदेरी बेटावर किल्ला बांधण्याचा पहिला प्रयत्न केला, परंतु बहुधा पाण्याच्या तुटवड्यामुळे, त्यांना तो सोडून द्यावा लागला. यानंतर १६७९ मध्ये महाराजांनी थेट पावसाळ्यातच किल्ला बांधणीस सुरूवात केली. यासाठी मायनाक भंडारी १५० माणसे व चार छोट्या तोफा यांसह बेटावर दाखल झाला.   ही बातमी इंग्रजांना त्यांच्या पोर्तुगीज व हिंदू खबऱ्यांकडून समजली. इंग्रजांकडून ही बातमी ईस्ट इंडिया कंपनीच्या सुरत कौन्सिलला कळविण्यात आली.
     पुढे सुरत कौन्सिलने प्रत्युतरात पाठवलेल्या पत्रात म्हटले की,
  “गेल्या ऑगस्टमध्ये शिवाजीने तिथे किल्ला बांधण्याकरिता शेकडो माणसांची विविध प्रकारच्या साहित्यासह नेमणूक केली. हा बेत त्याने इतक्या त्वरेने व गुप्ततेने अमलात आणला की त्याची दखल घेतली जाण्यापूर्वी त्याने अनेक ठिकाणी छातीइतक्या उंच भिंती आपल्या माणसांच्या रक्षणाकरिता बांधल्या होत्या आणि काही लहान तोफाही लावल्या होत्या.”
       या पत्रावरून महाराजांनी मुत्सदीगिरीने केलेल्या किल्ला बांधणीच्या कामाची कल्पना येते. खांदेरी बेटावर किल्ला उभारण्याचा प्रयत्न केल्यामुळे शिवाजी महाराजांनी एकाच वेळेस तीन शत्रूंची नाराजी ओढवून घेतली. मुंबई परिसरातील समुद्रावर हक्क सांगणारे इंग्रज, महाराजांसोबत तात्पुरता समझोता असलेले पोर्तुगिज आणि पश्चिम सागरावर सत्ता स्थापण्याची महत्त्वकांक्षा असणारा सिद्धी या तिघांच्याही डोळ्यांत महाराजांचे प्रयत्न खुपू लागले. परंतु खांदेरीवर किल्ला बांधू देता कामा नये असे सर्वांनाच वाटत असले तरी इंग्रजांना एकट्यालाच शिवाजी महाराजांशी लढू द्यावे व आपण बाजूूला रहावे, असे धोरण पोर्तुगिज व सिद्धीने स्विकारले. पुढे कॅप्टन केग्विनच्या नेतृत्वाखाली इंग्रजांनी वारंवार खांदेरीची नाकेबंदी करण्याचा प्रयत्न केला. पोर्तुगिजांनी देखील इंग्रजांना वेळोवेळी सहाय्य केले. सिद्धीने तर उंदेरी बेटाचा ताबा मिळवून तिथे किल्ला बांधण्याचा प्रयत्न केला.
नाकेबंदी, दमदाटी, छुपे हल्ले यांद्वारे मराठ्यांना हरतऱ्हेने नामोहरम करण्याचे प्रयत्न झाले. परंतु दौलतखान, मायनाक भंडारी यांच्या नेतृत्वाखालील आरमार या तिन्ही समुद्रीसत्तांना पुरून उरले.
      वैतागलेला कॅप्टन केग्विन म्हणतो,
   “आम्हाला वाटते ते (सिद्धीचे लोक) त्यांची बंदुकीची दारु निष्कारणच खर्च करतात; आवाजानेच त्यांचे (खांदेरीवरील लोकांचे) काही नुकसान होत असले तर गोष्ट वेगळी!”
     तर कॅप्टन अॅडर्टनने मुंबईला कौन्सिलला कळविले,
   “सिद्धी व (खांदेरी) बेट यांनी परस्परांवर अनेक तोफगोळे उडविले, पण उपयोग काही झाला नाही. आमच्या शत्रूची खांदेरी येथील भिंत बरीच उंच झाली आहे आणि हे तिच्यावर अतिशय झटून काम करित आहेत.”
  पुढे १ जानेवारी १६८०च्या पत्रात मुंबई कौन्सिल म्हणते,
  “आम्हाला वाटते खांदेरी बेट शिवाजीच्याच ताब्यात राहणार कारण ते आश्चर्यकारकपणे टिकाव धरून आहे.”
   
या संघर्षात दोन्ही बाजूंची प्रचंड शक्ती खर्च झाली. ब्रिटीश सत्तेलाही हा खर्च परवडेनासा झाला. या कारणांमुळे अखेर ब्रिटीशांनी व मराठ्यांनी तह करायचा निर्णय घेतला. नाविक युद्धात पारंगत असलेल्या इंग्रज व सिद्दी यांच्यासारख्या शत्रूंना तोंड देऊन मराठ्यांनी खांदेरी बेटावर किल्ला बांधण्याचे काम तडीस नेले.               
भारताच्या इतिहासात यापूर्वी कोणत्याही  सत्तेने इंग्रजांसोबत नाविक युद्ध केले नव्हते आणि यापुढेही ही इतर कोणत्याही सत्तेने केले नाही. 
    शिवाजी महाराजांच्या सागरी पराक्रमाचा इतिहास सांगणाऱ्या रायगड जिल्ह्याच्या किनारपट्टीवरील या महत्त्वपूर्ण ठिकाणाला एकदा अवश्य भेट द्या.

                                          - तुषार म्हात्रे, पिरकोन (उरण)

No comments:

रायगडची लोहयुगीन संस्कृती

रायगडची लोहयुगीन संस्कृती मँडागोरा! ‘पेरिप्लस ऑफ इरिथ्रीयन सी’ या अत्यंत पुरातन आणि महत्त्वपूर्ण दस्ताऐवजांमध्ये नोंदवले गेलेले एक बंद...