दुपानी लता: अमर्याद सागराला मर्यादा

दूरवर पसरलेल्या अथांग सागराच्या लाटा किनाऱ्यावर निरंतर येऊन आदळत असतात. आपल्या फेसाळत्या लाटांनी तो भूमीवर सातत्याने आक्रमण करतच राहतो. ओहोटीच्या वेळेस पीछेहाट झाली तरी भरतीच्या वेळेस हे आक्रमण अधिकच विशाल होत जाते. लाटांच्या प्रत्येक हल्ल्यात किनाऱ्याची झीज होत राहते. कधीकधी समुद्राचे पाणी वेस ओलांडून लोकवस्त्यांमध्ये घुसते. मानवाच्या दृष्टीने या निरंकुश पाण्याला अंकुश लावणे गरजेचे असते. त्याला रोखण्यात मानवी प्रयत्न तोकडे पडत असताना, बऱ्याच वेळेस निसर्गच सहाय्य करतो. सागरकिनारी वसलेल्या सजीवसृष्टीतील काही वनस्पती या अमर्याद सागराला आपल्यापरीने मर्यादा घालण्याचे काम करतात; ‘ मर्यादा वेल ’ ही त्यातलीच एक. ‘मॉर्निंग ग्लोरी’ अशी ओळख असणाऱ्या आणि हजारो जाती असणाऱ्या वनस्पती प्रकारातील ही वेेेल. समुद्रकिनारी उगवते म्हणून ती ‘बीच मॉर्निंग ग्लोरी’. आयपोमोई पीस-कॅप्रे ( Ipomoea pes-caprae ) हे तिचे शास्त्रीय नाव. यातील ‘आयपोमोई’ हा ग्रीक शब्द वेलीचे ‘वळवळणाऱ्या ...